JP Nadda: नड्डा म्हणतात, ‘परिवार पार्ट्यां’चा शेवट होतोय पण त्यांना चालवणारे जातायत कुठं? वास्तव डोळ्यात अंजन घालणारं

| Updated on: Aug 01, 2022 | 6:20 PM

2019 च्या लोकसभा निवडणुकीतील भाजप उमेदवारांची यादी पाहिली तर भाजपनेही घराणेशाहीवरच जोर दिल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावेळी तशा अनेक बातम्याही विविध माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे भाजपाध्यक्षांचं भाषण आणि वास्तव यात तफावत असल्याचं दिसून येतं.

JP Nadda: नड्डा म्हणतात, परिवार पार्ट्यांचा शेवट होतोय पण त्यांना चालवणारे जातायत कुठं? वास्तव डोळ्यात अंजन घालणारं
जे. पी. नड्डा, भाजपाध्यक्ष
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं एक भाषण सध्या चांगलंच गाजत आहे. महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रात (Maharashtra) सुरु असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर तर हे भाषण अधिकच चर्चेचा विषय ठरलं आहे. जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांच्या हस्ते बिहारच्या काही जिल्ह्यातील भाजप कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना नड्डा यांनी देशात केवळ भाजपच राहणार असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिलीय. भाजपशी दोन हात करण्याची क्षमता कोणत्याही पक्षात नाही. भाजपची लढाई वंशवाद (Racism) आणि परिवारवादाशी आहे, असा दावा नड्डा यांनी केलाय. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील भाजप उमेदवारांची यादी पाहिली तर भाजपनेही घराणेशाहीवरच जोर दिल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावेळी तशा अनेक बातम्याही विविध माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे भाजपाध्यक्षांचं भाषण आणि वास्तव यात तफावत असल्याचं दिसून येतं.

भाजपची लढाई वंशवाद आणि परिवारवादाशी आहे. उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष घराणेशाहीचा पक्ष आहे. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलासोबत दोन हात करत आहोत. ओडिशामध्ये नवीन पटनाईक यांचा पक्ष एका व्यक्तीचाच आहे. महाराष्ट्रातही शिवसेना आता संपतेय, त्या पक्षात घराणेशाही आहे. काँग्रेसही आता बहिण-भावाचा पक्ष झाला असल्याची जोरदार टीका भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बिहारमध्ये बोलताना केलीय.

लोकसभेला 23 उमेदवारांपैकी 9 उमेदवार घराणेशाहीतील!

असं असलं तरी भाजपची 2019 मधील उमेदवारांची यादी पाहिली तर भाजपही घराणेशाहीला खतपाणीच घालत असल्याचं दिसून येतं. महाराष्ट्रातील भाजपच्या 23 उमेदवारांपैकी 9 उमेदवार घराणेशाहीतील होते. त्यात,

1. हिना गावित – नंदुरबार – माजी मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या
2. सुभाष भामरे – धुळे, माजी आमदार गोजराताई भामरे यांचा मुलगा
3. रक्षा खडसे – रावेर, माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या स्नुषा
4. भारती पवार – दिंडोरी, माजी आमदार ए. टी. पवार यांच्या कन्या
5. पूनम महाजन – मुंबई उत्तर मध्य, भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या
6. कांचन कुल – बारामती, रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी
7. सुजय विखे पाटील – अहमदनगर, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा
8. प्रीतम मु्ंडे – बीड, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या
9 . रणजितसिंह नाईक निंबाळकर – माढा, माजी खासदार हिंदुराव निंबाळकर यांचा मुलगा

काँग्रेसमधील अनेक दिग्गजांना भाजप प्रवेश

दुसरीकडे दोन महिन्यापूर्वीच रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीनं दिल्लीत घराणेशाहीमुळे लोकशाहीसमोर आव्हान निर्माण झालंय, या विषयावर भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एका चर्चा सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचवेळी काँग्रेसचे दिवंगत नेते बलराम जाखड यांचे चिरंजीव आणि पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांना भाजपनं पक्षात प्रवेश दिला.

मध्य प्रदेशातही भाजपनं काँग्रेसचे दिवंगत नेते माधवराव शिंदे यांचे चिरंजीव ज्योतिरादित्य शिंदे यांना पक्षात प्रवेश देत काँग्रेसचं सरकार पाडलं. इतकंच नाही तर ज्योतिरादित्य शिंदे यांना केंद्रीत मोठं मंत्रिपदही दिलं. तसंच काँग्रेसचे दिवंगत नेते जितेंद्र प्रसाद यांचे चिरंजीव जितिन प्रसाद यांनाही भाजपमध्ये प्रवेश देण्यात आलाय. त्यामुळे भाजपमध्ये घराणेशाहीला स्थान नाही असा दावा करणारे भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं वक्तव्य किती पोकळ आहे हे दिसून येत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.