कर्नाटक सरकार अखेर मराठी भाषिकांपुढे झुकलंच, कन्नडींचा विरोध झुगारुन घेतला ‘हा’ मोठा निर्णय

| Updated on: Feb 06, 2023 | 9:33 PM

मराठी भाषिकांना बेळगावमध्ये कन्नडी संघटनांकडून प्रचंड विरोध केला जातो. पण यावेळी भाजपने कन्नडींचा विरोध झुगारुन मराठी भाषिकांचा विचार केलाय.

कर्नाटक सरकार अखेर मराठी भाषिकांपुढे झुकलंच, कन्नडींचा विरोध झुगारुन घेतला हा मोठा निर्णय
Follow us on

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन (Maharashtra Karnataka Border Dispute) काही दिवसांपूर्वी प्रचंड संघर्ष बघायला मिळाला. हा संघर्ष इतका विकोपाला गेला की महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या वाहनांवर हल्ला करण्यात आला होता. काही गाड्यांच्या काचाही फोडण्यात आल्याची माहिती समोर आली होती. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून सातत्याने आक्रमक भूमिका मांडली जात होती. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना या प्रकरणात मध्यस्थी करावी लागली. त्यामुळे संबंधित प्रकरण निवळलं. पण या घडामोडींमुळे बेळगावातील मराठी जनता आणि महाराष्ट्रातील जनता नाराज झालीय. याची जाणीव भाजपला देखील झालीय. त्यामुळे भाजपने बेळगावात महापौर आणि उपमहापौरपदी मराठी माणूस बसवला आहे की काय? अशी चर्चा आता सुरु झालीय.

विशेष म्हणजे मराठी भाषिकांना बेळगावमध्ये कन्नडी संघटनांकडून प्रचंड विरोध केला जातो. पण यावेळी भाजपने कन्नडींचा विरोध झुगारुन मराठी भाषिकांचा विचार केलाय.

बेळगाव महापालिका निवडणूक झाल्यानंतर तब्बल 17 महिन्यांनी बेळगावकरांना महापौर-उपमहापौर मिळाला आहे. बेळगाव महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या महापौर आणि उपमहापौरपदी मराठी भाषिक महिलांची निवड झालीय.

हे सुद्धा वाचा

महापौरपद खुल्या वर्गातील नगरसेविकेसाठी राखीव होते. महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी अनगोळ येथील मराठा नगरसेविका शोभा सोमनाचे तर शाहूनगरच्या नगरसेविका रेश्मा पाटील यांनी सकाळीच नामांकन दाखल केलं होतं.

महापौर पदासाठी काँग्रेसने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. महापौर निवडणुकीसाठी भाजपच्या अनगोळच्या प्रभाग 57 च्या नगरसेविका शोभा मायाप्पा सोमनाचे यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणाचाही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे शोभा सोमनाचे यांची बेळगाव महापौरपदी निवड झाली.

उपमहापौर पदासाठी प्रभाग 33 च्या रेश्मा प्रवीण पाटील आणि 9 च्या नगरसेविका वैशाली सिद्धार्थ भातकांडे अशा दोघाजणांनी अर्ज केले होते.

वैशाली भातकांडे यांना 4 मते तर रेश्मा पाटील यांना 42 मते पडली. त्यामुळे रेश्मा पाटील या 38 मतांच्या मोठ्या फरकाने उपमहापौरपदी निवडून आल्या आहेत.

विशेष म्हणजे या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तीनही नगरसेवकांनी मतदान केले; मात्र नगरसेविका भातकांडे यांना चौथेही मत पडले.

हा मराठा समाजाला खूश करण्याचा प्रयत्न?

आगामी विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून मराठी मतदारांना खूश करण्यासाठी भाजपने मराठा समाजाला महापौर-उपमहापौरपद दिले आहे. कन्नड संघटनांच्या दबावाला झुगारून भाजप नेत्यांनी दोन्ही मराठा समाजातील उमेदवारांना प्राधान्य देत मनपावर पुन्हा मराठीचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यामुळे कन्नडिगांचा हिरमोड झालाय.

महापालिकेवर भाजपची सत्ता

महापालिका सभागृहात भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. 58 पैकी 35 नगरसेवक भाजपचे असून पदसिद्ध 7 सदस्यांपैकी 5 सदस्य त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे भाजपचे संख्याबळ 40 आहे. सत्तारूढ गट नेते पदी लिंगायत समाजातील राजू डोणी यांची भाजप कोअर कमिटीने निवड केली असल्याचे समोर येत आहे.