निकालाआधीच भाजपचा पहिला विजय, पाहा कोणाची झाली बिनविरोध निवड

| Updated on: Apr 22, 2024 | 3:58 PM

लोकसभा निवडणुकीची रंगत वाढत चालली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी होणार आहे. त्यानंतर शेवटी ४ जूनला निकाल लागणार आहे. असं असलं तरी भाजपला पहिला विजयी उमेदवार मिळाला आहे. निकालाआधीच भाजपचं खातं उघडले आहे.

निकालाआधीच भाजपचा पहिला विजय, पाहा कोणाची झाली बिनविरोध निवड
bjp win
Follow us on

Loksabha election : देशात लोकसभा निवडणुकीचा सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. अनेक ठिकाणी कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. देशात पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी होणार आहे. ज्याचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. पण असं असलं तरी लोकसभा निवडणुकीआधीच भाजपने पहिला विजय नोंदवला आहे. सुरतमधील भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यानंतर भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांचा बिनविरोध विजय झाला. आता निवडणूक आयोगाकडून याची घोषणा होणे बाकी आहे.

काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद

सुरतमध्ये आधी काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज रद्द झाल्याने समीकरणे बदलली होती. बसपाचे उमेदवार प्यारे लाल भारती यांनी अर्ज मागे घेतला. मुकेश दलाल हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जातात. दलाल हे सुरतच्या इतिहासात बिनविरोध निवडून आलेले पहिले खासदार ठरले आहेत.

मुकेश दलाल सुरत लोकसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले. दलाल यांच्या विजयाची औपचारिक घोषणा निवडणूक आयोगाकडून केली जाणार आहे. आता गुजरातमध्ये 25 जागांसाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे, मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अशा स्थितीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत पूर्ण झाल्यानंतर मुकेश दलाल विजयी झाले आहेत.

प्रचार सुरुच होता

सुरतमध्ये काँग्रेस उमेदवार नीलेश कुंभानी आणि त्यांच्या डमी उमेदवाराचे अर्ज रद्द झाल्यानंतर घडामोडी वेगाने बदलल्या, त्यानंतर भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांच्या बिनविरोध विजयाची शक्यता निर्माण झाली. तरीही मुकेश दलाल प्रचारात व्यस्त होते. बिनविरोध विजयी होण्याच्या प्रश्नावर त्यांनी ७ मेपर्यंत जनतेत राहून प्रचार करणार असल्याचे सांगितले होते.

कोण आहेत मुकेश दलाल?

सुरत लोकसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले मुकेश दलाल हे सुरत भाजपचे सरचिटणीस आहेत. मोझ व्यापारी समाजातील मुकेश दलाल हे भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांचे विश्वासू मानले जातात. ते सध्या SDCA समितीचे सदस्य आहेत. ते सुरत महानगरपालिकेचे (SMC) माजी स्थायी समिती अध्यक्ष देखील राहिले आहेत. याआधी दलाल यांनी भाजप युवा मोर्चामध्ये राज्य पातळीवर काम केले होते. दलाल तीन वेळा एसएमसीचे नगरसेवक आणि पाच वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष होते. दलाल हे सुरत पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे ​​माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी घेतली असून एलएलबी, एमबीए फायनान्सचे शिक्षण घेतले आहे. दलाल हे 1981 पासून भाजपशी संबंधित होते. दर्शना जरदोश या सध्या सुरतच्या खासदार आहेत. यावेळी पक्षाने मुकेश दलाल यांना उमेदवारी दिली आहे.