PM Modi in Gujrat : पावागड टेकडीवरील दर्गा हटवला, महाकाली मंदिरावर 500 वर्षांनी फडकला भगवा ध्वज, पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

| Updated on: Jun 18, 2022 | 7:20 PM

महाकाली मंदिरावर बनवण्यात आलेला दर्गा त्याची सेवा करणाऱ्यांच्या सहमतीने तिथून हलवण्यात आला. त्यानंतर आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते पावागड मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकवण्यात आला.

PM Modi in Gujrat : पावागड टेकडीवरील दर्गा हटवला, महाकाली मंदिरावर 500 वर्षांनी फडकला भगवा ध्वज, पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण
पंतप्रधान मोदींनी पावागड इथल्या महाकाली मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकावला
Image Credit source: ANI
Follow us on

अहमदाबाद : गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील प्रसिद्ध महाकाली मंदिरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते पारंपरिक भगवा ध्वज फडकावण्यात आला. तब्बल 500 वर्षांनी महाकाली मंदिरावर (Mahakali Temple) हा भगवा ध्वज फडकला आहे. महाकाली मंदिरावर बनवण्यात आलेला दर्गा त्याची सेवा करणाऱ्यांच्या सहमतीने तिथून हलवण्यात आला. त्यानंतर आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते पावागड (Pavagadh) मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकवण्यात आला. हा शिखर ध्वज केवळ आमची आस्था आणि आध्यात्माचं प्रतिक नाही. तर हा शिखर ध्वज शतकं बदलतात, युगे बदलतात, पण श्रद्धेचे शिखर चिरंतन राहतं याचंही प्रतिक आहे, असं मोदी यावेळी म्हणाले.

‘भारताचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक गौरव पुन्हा एकदा स्थापित होतोय’

पंतप्रधान मोदी म्हणाले की आज भारताचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक गौरव पुन्हा एकदा स्थापित होत आहे. आज नवा भारत आपल्या आधुनिक आकांक्षांसह आपली प्राचिन ओळखही जपतोय, त्याबाबत अभिमान बाळगतोय. मोदी पुढे म्हणाले की, आई, मलाही आशीर्वाद दे की मी अधिक ऊर्जेसह, अधिक त्याग आणि समर्पणासह देशातील जनतेचा सेवक बनून त्यांची सेवा करेल. माझं जे ही सामर्थ्य आहे, माझ्या जीवनात जे काही पुण्य आहे, ते देशातील माता-भगिनींच्या कल्याणासाठी, देशासाठी समर्पित करत राहीन.

महाकालीचे आशीर्वाद घेऊनच विवेकानंद जनसेवेतून प्रभुसेवेत लीन झाले होते, असंही मोदी यावेळी म्हणाले. तसंच पूर्वी पावागडची यात्रा इतकी कठीण होती की लोक म्हणत असत आयुष्यात एकदा तरी आईचे दर्शन होऊ दे. आज इथे वाढणाऱ्या सुविधांमुळे दर्शन सुलभ झाले आहे, असा दावाही मोदींनी केलाय.

पावागड हे सर्वधर्म समभावाचं केंद्र

पावागडमध्ये आध्यात्मही आहे, इतिहासही आहे, प्रकृतीही आहे, कला-संस्कृतीही आहे. इथे एकीकडे महाकालीचं शक्तीपीठ आहे. तर दुसरीकडे जैन मंदिर आहे. म्हणजेच पावागढ एकप्रकारे भारताच्या ऐतिहासिक विविधतेसह सर्वधर्म समभावाचं एक केंद्र आहे, असंही मोदींनी सांगितलं.

महाकाली मंदिरावर 500 वर्षांनी फडकला ध्वज

गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील प्रसिद्ध महाकाली मंदिराचे विश्वस्त अशोक पंड्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 500 वर्षापूर्वी सुलतान महमूद बेगडा याने मंदिराचे शिखर नष्ट केलं होतं. 11 व्या शतकात पावागड टेकडीवर बांधण्यात आलेल्या या मंदिराच्या शिखराची पुनर्स्थापना पुनर्विकास योजनेअंतर्गत करण्यात आली. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शनिवारी महाकाली मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी मोदींनी नव्याने उभारण्यात आलेल्या शिखरावर भगवा ध्वज फडकावला.