SpiceJet Flight Status : स्पाइसजेटचे पंख छाटले, 8 आठवडे 50 टक्के उड्डाणांवर बंदी; डीजीसीएचे आदेश

| Updated on: Jul 27, 2022 | 7:42 PM

SpiceJet Flight Status : डीजीसीएने स्पाइसजेटला नोटीस बजावली होती. एअरलाइन विमान नियम, 1937च्या 11व्या अनुसूची आणि नियम 134च्या अटी शर्तींनुसार सुरक्षित, दक्ष आणि विश्वसनीय हवाई सेवांना सुनिश्चित करण्यात स्पाइसजेट अपयशी ठरली आहे.

SpiceJet Flight Status : स्पाइसजेटचे पंख छाटले, 8 आठवडे 50 टक्के उड्डाणांवर बंदी; डीजीसीएचे आदेश
स्पाइसजेटचे पंख छाटले, 8 आठवडे 50 टक्के उड्डाणांवर बंदी; डीजीसीएचे आदेश
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: स्पाइसजेटच्या विमानात (SpiceJet Airline) गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक बिघाड होत असल्याने नागरी उड्डान महासंचालनालयाने (DGCA) मोठा निर्णय घेतला आहे. डीजीसीएने स्पाइसजेटच्या 50 टक्के उड्डानांवर आठ आठवड्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. 19 जुनपासून स्पाइसजेटमध्ये तांत्रिक बिघाड होत होता. या कमीत कमी आठ घटना घडल्या. त्यामुळे डीजीसीएने स्पाइसजेटला 8 जुलै रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या कालावधीत डीजीसीएकडून स्पाइसजेटच्या विमानांवर अतिरिक्त लक्ष देणार आहे. विविध स्थळांची पाहणी, निरीक्षण आणि स्पाइसजेटने कारणे दाखवा नोटिशीला दिलेलं उत्तर या पार्श्वभूमीवर सुरक्षित आणि विश्वासनीय परिवहन सेवांसाठी स्पाइसजेटच्या 50 टक्के उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे, असं विमानन नियामकाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आठ आठवडे स्पाइसजेटला (SpiceJet Flight) केवळ 50 टक्के विमामांचेच उड्डाण करता येणार आहे.

डीजीसीएने स्पाइसजेटला नोटीस बजावली होती. एअरलाइन विमान नियम, 1937च्या 11व्या अनुसूची आणि नियम 134च्या अटी शर्तींनुसार सुरक्षित, दक्ष आणि विश्वसनीय हवाई सेवांना सुनिश्चित करण्यात स्पाइसजेट अपयशी ठरली आहे. सर्व परिस्थितीची पाहणी आणि समीक्षा केल्यानंतर अंतर्गत सुरक्षा आणि देखभाल करण्यासाठी स्पाइसजेटने काहीच पावले उचलली नसल्याचं दिसून आलं आहे, असं डीजीसीएने आपल्या नोटिशीत म्हटलं आहे. तसेच नोटिशीला उत्तर देण्यासाठी स्पाइसजेटला तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

सर्वात आधी प्रवाशांची सुरक्षा

नोटिशीनुसार, डीजीसीएने सप्टेंबर 2021मध्ये आर्थिक समीक्षा करण्यात आली होती. त्यात एअरलाईनद्वारे विक्रेत्यांना नियमितपणे भरपाई केली जात नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे विमानांचे पार्ट मिळणे कठिण झाले आहे. विमानाच्या संचलनासाठी आवश्यक एमईएलची वारंवार मागणी केली जात आहे, असं या नोटिशीत म्हटलं आहे. त्यावर नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रवाशांची सुरक्षा हे पहिलं प्राधान्य आहे, असं ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.

निर्धारीत कालावधीत उत्तर देणार

दरम्यान, एअरलाइनकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. डीजीसीएच्या नोटिशीला निर्धारीत कालावधीत उत्तर दिलं जाईल. आमचे प्रवासी आणि चालक दलाच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही एक आयएटीए-आयओएसए प्रमाणित एअरलाईन आहोत. डीजीसीएद्वारा त्याचे नियमित ऑडिट केले जात आहे, असंही एअरलाईनने स्पष्ट केलं आहे.