
मांडवामध्ये बैलजोडी अन् घोडी: गेल्या 24 वर्षांपासून अशा प्रकारचा मांडव दरवर्षी उन्हाळ्यात पवळे कुटुंबातील सदस्य बनवतात. सध्या येथे सहा बैल आणि एक घोडी आहे. या मांडवावर शिवराजमुद्रा, ढाल-तलवारी, तोफांची प्रतिकृती बसवली आहे.

पंचक्रोशीतील शेतकरी पवळे यांच्या शेतात : बैलजोडीसाठी थेट रायगडावरील मेघडंबरीची प्रतिकृती यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. मात्र, हा अनोखा उपक्रम आता या पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनला आहे. पवळे यांचे बैल आणि ही मेघडंबरीची प्रतिकृती पाहण्यासाठी शेतकऱ्यांचीच नाही तर सर्वसामान्य नागिरकांची गर्दी होत आहे.

बैलासाठी कायपण: दिलीप पवळे यांचे बैल हे बैलगाडा शर्यतीमध्येही असतात. बैलगाडा शर्यतीचा छंद ते गेल्या अनेक वर्षापासून जोपासत आहेत. हा केवळ छंदच नाही तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग असून त्याचे संवर्धन होत असल्याचे पवळे यांचे म्हणणे आहे.

24 वर्षाची परंपरा यंदाही कायम: आंबेगाव तालुक्यातील पेठ येथील शेतकरी दिलीप पवळे हे पशूधनासाठी दरवर्षी उन्हाळ्यात वेगवेगळ्या प्रकारचा मांडव तयार करतात. गेल्या 24 वर्षापासून ही परंपरा आहे. यामुळे जनावरांचे उन्हामुळे संरक्षण तर होतेच शिवाय मांडव तयार करण्यात वेगळाच आनंद असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

अशी ही 'बॅनर'बाजी : बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने नियम-अटींसह परवानगी दिलेली आहे. या नियमांचे फलक या मांडवाजवळ लावण्यात आले आहेत. यामुळे जनजागृती होऊन एकप्रकारे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. बैलगाडा शर्यतीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला सध्या बळकटी आली आहे.

रायगडावरील मेघडंबरीची प्रतिकृती: यंदा पेठच्या शिवारामध्ये पवळे यांनी रायगडावरील मेघडंबरीची प्रतिकृती साकारली आहे. हा मांडव बनवण्यासाठी तब्बल 1600 हून अधिक ज्वारी कडब्याच्या पेंढ्या, तीनशेहून अधिक बांबू, पारंब्यांचा वापर केला असून, हा मांडव बांधण्यासाठी अडीच महिन्यांचा कालावधी लागला आहे.