PHOTO: ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातील तोफा मुंबईच्या उद्यानात
तब्बल १६४ वर्षे जुन्या असणाऱ्या, पण तरीही भरभक्कम असणाऱ्या दोन पोलादी तोफा | Artillery east india company

समुद्राने वेढलेल्या मुंबई नगरीचे संरक्षण करण्यासाठी ब्रिटिशांनी अनेक ठिकाणी तोफा बसविल्या होत्या. यापैकी तब्बल १६४ वर्षे जुन्या असणाऱ्या, पण तरीही भरभक्कम असणाऱ्या दोन पोलादी तोफा महापालिकेच्या घाटकोपर परिसरात असणाऱ्या 'लायन्स चिल्ड्रन पार्क'मध्ये आहेत. या तोफांना एक नवी झळाळी मिळावी, या दृष्टीने या दोन्ही तोफा भव्य-दिव्य पद्धतीने पुन्हा स्थापित करण्याच्या प्रस्तावास अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांनी मंजुरी दिली आहे.

आता लवकरच घाटकोपर पूर्व परिसरातील टिळक पथावर असणाऱ्या 'लायन्स चिल्ड्रन पार्क' मध्ये निसर्गाशी जवळीक साधण्यासोबतच तोफारुपी ऐतिहासिक ठेवाही अनुभवता येणार आहे.

घाटकोपर पूर्व परिसरातील 'लायन्स चिल्ड्रन पार्क' हे सन 1971 पासून मुंबईकरांच्या सेवेत असणारे उद्यान आहे. 55 हजार 843 चौरस फुटांच्या जागेत विकसित असलेल्या या उद्यानात असणाऱ्या हिरवाई सोबतच 'ईस्ट इंडिया कंपनी'च्या काळातील दोन तोफा देखील या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. या दोन्ही तोफांची लांबी 3.10 मीटर असून तोफांचा आतील घेर हा 0.64 मिटर आणि बाहेरील घेर 1.17 मीटर इतका आहे.

या दोन्ही तोफांवर रोमन लिपी मध्ये 'एन सी पी सी' अशी अक्षरे कोरण्यात आली आहेत. साधारणपणे 1964 वर्षे जुन्या असणार्या या दोन्ही तोफांना नवी झळाळी देण्यात येणार आहे.