
सांगली जिल्ह्यातील सांगली कासेगाव येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या विचारवंत, लेखिका डॉ. गेल ऑम्वेट यांचे नुकतेच निधन झाले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कासेगाव येथील त्यांच्या घरी जाऊन त्यांचे पती डॉ. भारत पाटणकर व कन्या प्राची यांची भेट घेऊन सांत्वन केले.

डॉ. गेल या आंबेडकरांच्या साहित्याचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेतून भारतात आल्या व येथे दलित मुक्तीचा लढा उभारला.

मराठवाडा विद्यापीठास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या चळवळीत त्या आमच्या सोबत होत्या. त्यांचा आम्हाला आदर वाटतो. अशा शब्दांत रामदास आठवले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

भारत पाटणकर यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या लढ्याच्या अग्रभागी गेल ऑम्व्हेट राहिल्या. मोर्चे, आंदोलनात चळवळीचा झेंडा खांद्यावर घेऊन त्यांनी कामगार कष्टकऱ्यांचं नेतृत्व केलं. परिश्रमातून कमावलेले ज्ञानच नव्हे तर आपलं सारं आयुष्य इथल्या कष्टकऱ्यांच्या चळवळीसाठी गेल यांनी समर्पित केलं.