आदित्य ठाकरेंचा नाशिक, जळगाव दौरा तात्पुरता रद्द, शिवसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा पुढे ढकलला, नेमकं कारण काय?

| Updated on: Aug 08, 2022 | 3:49 PM

आदित्य ठाकरे यांचा जळगाव आणि नाशिकचा दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे आजारी असल्याने हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळतेय.

आदित्य ठाकरेंचा नाशिक, जळगाव दौरा तात्पुरता रद्द, शिवसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा पुढे ढकलला, नेमकं कारण काय?
आदित्य ठाकरे, युवासेना प्रमुख
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेला मोठी घरघर लागलीय. अशावेळी राज्यभरातील संघटन अधिक मजबूत करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बैठका आणि मेळाव्यांचा धडाका लावला आहे. त्याचाच भाग म्हणून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची शिवसंवाद यात्रा सुरु आहे. या यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात आदित्य ठाकरे जळगाव आणि नाशिकच्या दौऱ्यावर जाणार होती. तशी घोषणा शिवसेनेकडून (Shivsena) करण्यात आली होती. मात्र, आदित्य ठाकरे यांचा जळगाव आणि नाशिकचा दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे आजारी असल्याने हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळतेय.

ठाकरे पिता-पुत्रांचा बैठका, मेळाव्यावर भर

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना दुभंगलीय. अशावेळी शिवसेना आपलीच असल्याचं उद्धव ठाकरे यांना सिद्ध करावं लागणार आहे. आमदार, खासदार,नेते गेले तरी मूळ संघटना आणि शिवसैनिक आपल्यासोबत असल्याचा दावा ठाकरे पितापुत्रांकडून करण्यात येतोय. ठाकरे पिता पुत्रांकडून राज्यभरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. तसंच राज्यात विविध ठिकाणी मेळावेही घेण्यात येत आहेत. या मेळाव्यातून आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांना गद्दार म्हणून जोरदार टीका करताना दिसत आहेत.

आदित्य ठाकरेंची प्रकृती बिघडल्यानं दौरा रद्द

शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या शिवसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा 9 आणि 10 ऑगस्ट रोजी जळगाव, मालेगाव, नाशिक आणि भिवंडी ग्रामीणमध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र, त्यांचा हा दौरा तात्पुरता रद्द करण्यात आलाय. आदित्य ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे शिवसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आलीय. दरम्यान, त्यांची कोविड चाचणी केली असता ती निगेटीव्ह आली आहे. दौरा तात्पुरता रद्द करण्यात आल्यामुळे आदित्य ठाकरे यांनी जळगाव, मालेगाव, नाशिक, आणि भिवंडीकरांची दिलगिरी व्यक्त केलीय. तसंच लवकरच दौऱ्याच्या नवीन तारखा जाहीर करण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं आहे.