महाराष्ट्राच्या तिसऱ्या मुख्यमंत्र्यांचा विक्रम देवेंद्र फडणवीसांनी मोडला

| Updated on: Nov 26, 2019 | 5:41 PM

देवेंद्र फडणवीस हे इतिहासातील सर्वात अल्पकालीन मुख्यमंत्री ठरले आहेत. आतापर्यंत पी. के. सावंत यांच्या नावे विक्रम होता.

महाराष्ट्राच्या तिसऱ्या मुख्यमंत्र्यांचा विक्रम देवेंद्र फडणवीसांनी मोडला
Follow us on

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे फडणवीस सरकार ‘औट घटकेचं’ ठरलं. शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर अवघ्या तीन दिवसांतच म्हणजे 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता त्यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात अल्पकालीन मुख्यमंत्री (Devendra Fadnavis Records) ठरले आहेत. आतापर्यंत पी. के. सावंत (नऊ दिवस) यांच्या नावे सर्वात कमी कालावधीच्या मुख्यमंत्रिपदाचा विक्रम होता. सावंत हे महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री होते.

देवेंद्र फडणवीस यांच्या नावे आता तीन विक्रम झाले आहेत. ते सर्वात कमी काळ मुख्यमंत्रिपद भूषवणारे नेते ठरले आहेतच, सोबत सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदावर राहणारे बिगरकाँग्रेसी नेतेही ठरले आहेत. याशिवाय, सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदावर येणारे बिगरकाँग्रेसी नेतेही ते आहेत.

विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस हे गेल्या 45 वर्षांत वसंतराव नाईक यांच्यानंतर (1975) पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत. सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या नेत्यांच्या यादीत ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. म्हणजेच कार्यकाळानुसार क्रम लावल्यास त्यांचा नंबर वरुन दुसराही येतो आणि सर्वात तळालाही.

एकाच दिवशी वाढदिवस, एकाच दिवशी शपथ, एकाच दिवशी राजीनामा

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तूर्तास काळजीवाहू मुख्यमंत्रिपदाची धुरा देण्यात आली आहे. फडणवीस दुसऱ्यांदा काळजीवाहू मुख्यमंत्री ठरले आहेत. गेल्या महिन्यात देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांनी त्यांना तशी विनंती केली होती. यावेळीही पुन्हा त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास सांगितलं.

मुख्यमंत्री आणि कार्यकाळ

यशवंतराव चव्हाण – 1 मे 1960 ते 19 नोव्हेंबर 1962- 2 वर्ष 202 दिवस (काँग्रेस)
मारोतराव कन्नमवार – 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963- 1 वर्ष 4 दिवस (काँग्रेस)
पी. के. सावंत – 25 नोव्हेंबर 1963 ते 4 डिसेंबर 1963 – 9 दिवस (काँग्रेस)
वसंतराव नाईक – 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 – 11 वर्ष 77 दिवस (काँग्रेस)
शंकरराव चव्हाण – 21 फेब्रुवारी 1975 ते 16 मे 1977 – 2 वर्ष 84 दिवस (काँग्रेस)
वसंतदादा पाटील – 17 मे 1977 ते 18 जुलै 1978 – 1 वर्ष 62 दिवस (काँग्रेस)
शरद पवार – 18 जुलै 1978 ते 17 फेब्रुवारी 1980 – 1 वर्ष 214 दिवस (पुलोद)
राष्ट्रपती राजवट – 17 फेब्रुवारी 1980 ते 8 जून 1980 – 112 दिवस
अब्दुल रहमान अंतुले – 9 जून 1980 ते 12 जानेवारी 1982 – 1 वर्ष 217 दिवस (काँग्रेस)
बाबासाहेब भोसले – 21 जानेवारी 1982 ते 1 फेब्रुवारी 1983 – 1 वर्ष 11 दिवस (काँग्रेस)
वसंतदादा पाटील – 2 फेब्रुवारी 1983 ते 1 जून 1985 – 2 वर्ष 119 दिवस (काँग्रेस)
शिवाजीराव निलंगेकर पाटील – 3 जून 1985 ते 6 मार्च 1986 – 276 दिवस (काँग्रेस)
शंकरराव चव्हाण – 12 मार्च 1986 ते 26 जून 1988 – 2 वर्ष 106 दिवस (काँग्रेस)
शरद पवार – 26 जून 1988 ते 25 जून 1991 – 2 वर्ष 364 दिवस (काँग्रेस)
सुधाकरराव नाईक – 25 जून 1991 ते 22 फेब्रुवारी 1993 – 1 वर्ष 242 दिवस (काँग्रेस)
शरद पवार – 6 मार्च 1993 ते 14 मार्च 1995 – 2 वर्ष 8 दिवस (काँग्रेस)
मनोहर जोशी – 14 मार्च 1995 ते 31 जानेवारी 1999 – 3 वर्ष 323 दिवस (शिवसेना)
नारायण राणे – 1 फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोबर 1999 – 258 दिवस (शिवसेना)
विलासराव देशमुख – 18 ऑक्टोबर 1999 ते 16 जानेवारी 2003 – 3 वर्ष 90 दिवस (काँग्रेस)
सुशीलकुमार शिंदे – 18 जानेवारी 2003 ते 30 ऑक्टोबर 2004 – 1 वर्ष 286 दिवस (काँग्रेस)
विलासराव देशमुख – 1 नोव्हेंबर 2004 ते 4 डिसेंबर 2008 – 4 वर्ष 33 दिवस (काँग्रेस)
अशोक चव्हाण – 8 डिसेंबर 2008 ते 9 नोव्हेंबर 2010 – 1 वर्ष 336 दिवस (काँग्रेस)
पृथ्वीराज चव्हाण – 10 नोव्हेंबर 2010 ते 26 सप्टेंबर 2014 – 3 वर्ष 319 दिवस (काँग्रेस)
राष्ट्रपती राजवट – 28 सप्टेंबर 2014 ते 30 ऑक्टोबर 2014 – 32 दिवस
देवेंद्र फडणवीस – 31 ऑक्टोबर 2014 ते 8 नोव्हेंबर 2019 – 5 वर्ष 8 दिवस (भाजप)
राष्ट्रपती राजवट – 12 नोव्हेंबर 2019 ते 23 नोव्हेंबर 2019 – 11 दिवस
देवेंद्र फडणवीस- अजित पवार – 23 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019 – 3 दिवस (भाजप)

देवेंद्र फडणवीस यांच्यावर मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजीनामा देण्याची नामुष्की आली. याआधी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे फडणवीस यांना देखील राजीनामा द्यावा लागेल असा अंदाज वर्तवला जात होता. तो खरा ठरत फडणवीसांनी बहुमत चाचणीत पराभव टाळण्यासाठी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली. Devendra Fadnavis Records