गुजरात निवडणुकीत भाजप सर्व रेकॉर्ड मोडणार, ‘आप’ तर कुठेच नाही…, अमित शहांनी केला सत्तेचा दावा

| Updated on: Nov 07, 2022 | 8:03 PM

गुजरातमध्ये आपने विजयाचा दावा केला असला तरी भाजपची खरी लढत ही काँग्रेसबरोबरच असल्याचे अमित शहांनी म्हटले आहे.

गुजरात निवडणुकीत भाजप सर्व रेकॉर्ड मोडणार, आप तर कुठेच नाही..., अमित शहांनी केला सत्तेचा दावा
Follow us on

नवी दिल्लीः गुजरात विधानसभा निवडणुका जस जशा जवळ येत आहेत, तस तशी त्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. गुजरात निवडणुकीबाबत भाजपला प्रचंड आशा असल्याने अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रचाराचा धडाका लावण्यात आला आहे. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी मोठा दावा केला आहे. गुजरात निवडणुकीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, 2022 च्या निवडणुकीत भाजप सर्व रेकॉर्ड मोडणार असून भाजप प्रचंड बहुमताने सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या निवडणुकीत मतांची टक्केवारीही वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 2017 च्या निवडणुकीविषयी बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाने जातीयवादी आंदोलन केले होते, तरीही भाजपचाच विजय झाला होता असंही त्यांनी सांगितले.

आम आदमी पक्षाविषयी बोलताना ते म्हणाले की, गुजरातमध्ये आप हा विरोधी पक्षच नाही. त्यामुळे येथे तिसऱ्या पक्षाला स्थान मिळणारच नाही असंही त्यांनी सांगितले. चिमण पटेल यांच्यापासून ते केशूभाईंपर्यंत सर्वजण अपयशी ठरले असल्याचा दाखलाही त्यानी यावेळी दिला. त्यामुळे आमची खरी लढाई ही काँग्रेसबरोबर असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान यांच्या आईबद्दल केलेल्या टिप्पणीला उत्तर देताना ते म्हणाले की, प्रत्येक पक्ष आपापल्या चालीरीती आणि संस्कृतीनुसार काम करतो. पण एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन कोणी शेरेबाजी करत राजकारण करत असेल तर गुजरातची जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

समान नागरी कायद्यावर बोलताना अमित शहा म्हणाले की, समान नागरी कायद्याचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. जनसंघाच्या काळापासून हा मुद्दा आमच्या जाहीरनाम्यात आहे. कोणत्याही बाजूने आक्षेप असेल तर हा आक्षेप लोकांसमोर ठेवावा, जनता न्याय देईल.

काँग्रेसकडून निराधार आरोप केले जात असल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. कोरोनामध्ये सरकारचे काम खूप चांगले झाले असून काँग्रेसकडे दुसरा विषयच नसल्याची टीकाही त्यानी केली.

काँग्रेसमध्ये लोकांना गुदमरल्यासारखे वाटते, म्हणूनच लोक भाजपमध्ये येतात. हार्दिक पटेलबाबत अमित शहा म्हणाले की, सरकारविरोधात आंदोलन चुकीचे असल्याचे हार्दिकला वाटत होते.

त्यांना पक्षाच्या विचारसरणीत सामील व्हायचे होते म्हणून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हार्दिकला तिकीट द्यायचे की नाही हा संसदीय मंडळाचा निर्णय आहे.जयनारायण व्यासांवर अमित शहा म्हणाले की, कोणी आले की गेले, विजय असो की पराभव याने फरक पडत नाही.

काँग्रेसमध्ये नेत्यांची मुस्कटदाबी चालू असल्यानेच ते भाजपमध्ये येत असल्याचे त्यांनी टीका केली. हार्दिक पटेलविषयी बोलताना ते म्हणाले की, हार्दिकला सरकारविरोधात आंदोलन करणे चुकीचे त्याला वाटत असल्यानेच त्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र हार्दिकला तिकीट द्यायचे की नाही हा संसदीय मंडळाचा निर्णय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गुजरातमध्ये 25 वर्षांपूर्वी गुजरातमध्ये वीज नव्हती मात्र आता वीज आहे. गुजरातमध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातील गुन्हेगारीला आळा बसला आहे. तसेच उद्योगात गुजरात आघाडीवरही आहे. तर विदेशी गुंतवणुकीत गुजरात आघाडीवर असल्याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला आहे.

पंतप्रधानांच्या सततच्या गुजरात दौऱ्यावर अमित शहा म्हणाले की, ‘निवडणूक’ हे जनतेशी थेट संवादाचे माध्यम आहे. पंतप्रधानांनी गुजरातमध्ये येण्याचे एकमेव कारण म्हणजे जनतेबरोबर त्यांना संवाद साधायचा आहे. त्यामुळेच ते सतत गुजरात दौरा करत असल्याचेही त्यांनी सांगितले.