मी पुन्हा आलो, पण दोन पक्षांना फोडून आलो, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले

| Updated on: Mar 17, 2024 | 2:59 PM

कॉंग्रेस न होती तो क्या होता ? या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईतील फोर सिझन हॉटेलमध्ये झाले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकारणावर आपली स्पष्ट मते व्यक्त केली.

मी पुन्हा आलो, पण दोन पक्षांना फोडून आलो, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले
devendra fadnavis
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

 मुंबई | 17 मार्च 2024 : ‘मी पुन्हा येईन’ अशा माझ्या वक्तव्यावरुन नेहमीच प्रश्न केला जातो. मी पुन्हा येईन हे केवळ वाक्य नव्हतं, त्यात मी कोणासाठी पुन्हा येईन, काय काम करेन? हे सगळं होतं.. पण, हे एक वाक्य खूप प्रसिद्ध झालं असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. लोकांनी आम्हाला निवडून दिलं होतं. पण, उध्दवजी यांनी स्वार्थासाठी पाठीत खंजीर खुपसला. आम्ही पुन्हा आलो तेव्हा कौतुक झालं, नव्हतो आलो तेव्हा टीका झाली, मला पुन्हा यायला अडीच वर्षे लागली पण, जेव्हा आलो तेव्हा दोन पक्ष फोडून आलो, असेही देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत सांगितले.

कॉंग्रेस न होती तो क्या होता ? या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईतील फोर सिझन हॉटेलमध्ये झाले. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की अब की बार 400 पारच्या घोषणे मागे पंतप्रधानांच्या भावना समजून घेतल्या पाहीजेत. पंतप्रधानांनी म्हटले आहे की, आम्ही शिवरायांना मानणारे लोक आहोत. शिवरायांनी स्वतःला छत्रपती म्हणून घेतले. परंतू राज्याभिषेक झाला तेव्हापासून एकदाही गादीची मजा घेतली नाही. त्यांनी राज्याभिषेक केवळ यासाठी केला की, जगाला कळावं की, आम्ही गुलामीतून बाहेर आलोय. मोदीजी सुद्धा हेच म्हणाले की, आम्हाला सुद्धा विश्वास आहे की आम्ही तिसऱ्यांदा निवडून येऊ, पण, सत्तेसाठी नाही तर, लोकांसाठी, हा विश्वास आहे यात अहंकार नाही. मोदीजी यांना विश्वास दिसतो आहे असेही फडणवीस यांनी सांगितले.

भविष्यात परिवारवाद नसेल, तरुणांना संधी

शरद पवार यांनी मुलीला पुढे आणले तिला आपला वारसदार जाहीर केले आणि राष्ट्रवादी फुटली. तसाच प्रकार उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना पुढे आणण्यासाठी केला. त्यामुळे शिवसेना फुटली. परिवारवादामुळेच हे सगळे झाले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सक्षम व्यक्तीला डावलून नातेवाईकांना संधी देणे म्हणजेच परिवाद आहे. कॉंग्रेसमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष खरगे स्वत: काही निर्णय घेऊ शकत नाहीत. निर्णय राहुल गांधीच घेतात हे लोकांना माहीती आहे. काल गृहमंत्री म्हणाले की राष्ट्रवादी का फुटली. कारण पवारांनी पक्ष पुतण्याला नाही तर मुलीला दिला. मला विश्वास आहे की, भविष्यात राजकारण्यांची मुलं राजकारणात दिसली तरी स्वतःच्या सामर्थ्यावर आलेल असतील असे देवेंद्र फडणवीस यांना सांगितले.

गुंडांशिवाय राजकारण होतं हे मोदींनी दाखविले

सत्तेतून पैसा, पैशातून ताकद आणि त्यातून सत्ता असे राजकारण आतापपर्यंत सुरु होते, सुरुवातीच्या काळातील राजकारण पाहीले तर 30 कुटुंबांभोवती देशातील राजकारण फिरत होते. काही परिवारांनी समाजकार्यही केली. पण काहींनी केले नाही. बाहुबली, गुन्हेगारांची गरज भासू लागली. मग सर्वांचा राजकारणात प्रवेश सुरु झाला. परंतू 2014 नंतर पंतप्रधानांनी देश आणि महाराष्ट्रातील चित्र बदलले. ही व्यवस्था तोडण्याचे काम पंतप्रधानांनी केल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. गुंडांशिवाय राजकारण होऊ शकतं हे दहा वर्षांत मोदीजींनी दाखविले आहे, 100 टक्के यश मिळालेले नाही. पण काम सुरु आहे. आणखी काही स्वच्छता करायची असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विरोधक हवेच परंतू….

इंडिया आघाडीत सर्व इंजिन्स आहेत. एकही बोगी नाही. सगळी इंजिन्स आपआपल्या दिशेने जात आहेत हे भाऊ तोरसेकर याचं विश्लेषण योग्यच आहे. विरोधक असलेच पाहीजेत. आम्ही विरोधी पक्षात होतो. आम्ही असताना आणि आताच्या विरोधी पक्षात फरक आहे. सुप्रीम कोर्ट यांच्या बाजूने निर्णय देतात तेव्हा ते न्यायालयाचे गुणगाण गातात. आणि विरोधात निर्णय आला की शिव्या देतात असे विरोधकांचे काम आहे अशी टीका एका प्रश्नावर देवेद्र फडणवीस यांनी केली आहे.