Mumbai Bank : सत्तांतरानंतर महाविकास आघाडीला अजून एक धक्का बसणार, मुंबै बँकेतही फासे पलटणार?

| Updated on: Aug 04, 2022 | 5:58 PM

सिद्धार्थ कांबळे (Sidharth kamble) यांनी गेल्या आठवड्यात अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. तर विठ्ठल भोसले यांनीही उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर अवघ्या सहा महिन्यातच पुन्हा मुंबै बँकेच्या अध्यक्षपदावर विराजमान होण्याची शक्यता आहे.

Mumbai Bank : सत्तांतरानंतर महाविकास आघाडीला अजून एक धक्का बसणार, मुंबै बँकेतही फासे पलटणार?
मुंबई बँक, प्रवीण दरेकर
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यात सत्तांतर झालं. या सत्तांतरानंतर आता मुंबै बँकेतही (Mumbai Bank) फासे पलटणार असल्याचं पाहायला मिळतंय. कारण आता मुंबै बँकेतही सत्तांतर होणार असं दिसतंय. मुंबै बँकेच्या उद्या पार पडणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम होणार आहे. त्यावेळी भाजप आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) पुन्हा मुंबै बँकेचे अध्यक्ष होण्याची शक्यता होणार आहे. सिद्धार्थ कांबळे (Sidharth kamble) यांनी गेल्या आठवड्यात अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. तर विठ्ठल भोसले यांनीही उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर अवघ्या सहा महिन्यातच पुन्हा मुंबै बँकेच्या अध्यक्षपदावर विराजमान होण्याची शक्यता आहे.

अध्यक्ष, उपाध्यक्षांचे राजीनामे

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुंबै बँकेचे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे आणि उपाध्यक्ष विठ्ठल भोसले यांनी अचानक पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या पदांसाठी आता 5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत नव्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड होणार आहे. अशावेळी मजूर म्हणून अपात्र ठरलेले भाजप आमदार आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पुन्हा अध्यक्षपदी विराजमान होणार? की यावेळी दरेकरांकडून प्रसाद लाड यांचं नाव पुढे केलं जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरेकरांची बिनविरोध निवड होणार?

मुंबै बँकेत एकूण 21 संचालक आहेत. दरेकर हे मजूर म्हणून अपात्र ठरल्यानंतर आता संचालकांची संख्या 20 झाली आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी 11 मतं मिळवणारा उमेदवार विजयी ठरणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मिळून 10 संचालक आहेत. मात्र, आता राज्यात भाजपची सत्ता असल्यानं मुंबै बँकेचा अध्यक्ष बिनविरोध काढण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न आहे.

मुंबै बँक घोटाळा प्रकरण काय?

मुंबै बँकेच्या मुंबईतील ठाकूर व्हिलेज, कांदिवली, दामुनगर आणि अंधेरी पूर्व येथील शाखांमध्ये बनावट कर्ज घेतल्याची माहिती उघड झाली आहे. हे कर्ज वाटप करताना कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. प्रवीण दरेकर हे त्यावेळी मुंबै बँकेचे अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांचा या घोटाळ्याशी संबंध असल्याचं बोललं जात आहे. बँकेच्या काही सदस्यांनी नाबार्डकडे या कर्ज वाटप प्रकरणाची तक्रार केली होती. त्यानंतर चौकशी करण्यात आली असता केवळ कांदिवली पूर्व आणि अशोक वनमधील शाखांमधूनच 55 बोगस कर्जप्रकरणे उघडकीस आली होती.