केबलचालक ते बेस्ट कर्मचारी, एकाच दिवशी ‘राज’दरबारी रिघ, ‘कृष्णकुंज’वर पक्षप्रवेशही सुरुच

| Updated on: Nov 09, 2020 | 5:45 PM

पक्षातील इन्कमिंगही वाढत असल्याने जनतेचे प्रश्न आणि पक्षप्रवेशांच्या समीकरणामुळे 'कृष्णकुंज' चर्चेत आहे

केबलचालक ते बेस्ट कर्मचारी, एकाच दिवशी राजदरबारी रिघ, कृष्णकुंजवर पक्षप्रवेशही सुरुच
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) पक्ष म्हणून फार मोठा होताना दिसत नसली, तरी मात्र जनतेच्या समस्या सोडवताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) नेहमीच अग्रेसर दिसतात. कोरोना परिस्थितीमध्ये जनतेचे अनेक प्रश्न ‘कृष्णकुंज’वर (Krishnakunj) सोडवले जात आहेत. प्रश्न सुटले की राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी रिघ लागते, तर दुसरीकडे पक्षातील इन्कमिंगही हळूहळू वाढताना पाहायला मिळत आहे. जनतेचे प्रश्न आणि पक्षप्रवेशांच्या समीकरणामुळे ‘कृष्णकुंज’ चर्चेत आहे. (Raj Thackeray residence Krishnakunj flooded with volunteers joining MNS)

जिओ कंपनीमुळे केबल व्यवसाय धोक्यात आल्याचे सांगत आज केबल मालकांनी राज ठाकरे यांच्याकडे धाव घेतली. “इन मुंबई, हॅथवे, डीजे, सिटी केबल यासारख्या मोठ्या कंपन्या याआधीही भारतात आल्या, पण त्यांनी केबलचालकांना हाताशी धरुन आपला व्यवसाय पुढे नेला आणि त्यांचा उदरनिर्वाह चालू ठेवला. पण आता जिओ कंपनीमुळे केबल मालकांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. कारण जिओ अनधिकृतरित्या विनापरवाना व्यक्तींना संपर्क करुन कनेक्शन देण्याचे काम करत आहे. जिओने केबल व्यवसायात येण्याआधी केबल व्यावसायिकांना सोबत घेण्याचं सांगितलं होतं” असं गाऱ्हाणं केबल मालकांनी ‘राज’दरबारी मांडलं. याबाबत लक्ष घालतो, असं आश्वासन राज ठाकरे यांनी दिलं आहे.

सिडकोच्या  सोडतधारकांना दिलासा

नवी मुंबईतून विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, तरुण यांनीही आजच मोठ्या संख्येने मनसेत प्रवेश केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेने पक्ष वाढवायला सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही लवकरच मनसेचा एक मेळावा नवी मुंबईत घेऊ, अशी ग्वाही दिली.

‘सिडको’च्या 14 हजार 500 सदनिका सोडत धारकांकडून लाखो रुपये मुद्रांक शुल्क आकारण्यात आले होते. ते आता एक हजार रुपये करण्यास मनसेने सिडकोला भाग पाडले. याचे आभार मानण्यासाठी सिडको सोडत धारक आले होते. त्यांनीही राज ठाकरे यांचे आभार मानले.

बेस्टमध्ये हंगामी पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांना आता बेस्टमध्ये कायमस्वरुपी घेतले जाणार आहे. हा मुद्दा गेले अनेक दिवस मनसेच्या कर्मचारी सेनेने उचलून धरलेला होता. अखेर या कर्मचाऱ्यांना बेस्टमध्ये सामाविष्ट केले जाणार आहे. याच निमित्ताने बेस्ट कर्मचाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी जाऊन आभार मानले. (Raj Thackeray residence Krishnakunj flooded with volunteers joining MNS)

एकंदरीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. जनतेचे वेगवेगळे प्रश्न असो किंवा पक्षप्रवेश, राज ठाकरे यांनी संबंधित मंत्र्यांना फोन केल्याने काही दिवसात प्रश्न सुटल्याचं अनेक जण सांगतात. त्यामुळे ‘राज’दरबार हा जनतेचा दरबार होताना दिसत आहे.

संबंधित बातम्या :

राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये; मनसेचा डिसेंबरमध्ये नवी मुंबईत मेळावा

जिओ कंपनीमुळे आमचा धंदा धोक्यात; मुंबईतील केबलचालक गाऱ्हाणे मांडण्यासाठी ‘राज’दरबारी

(Raj Thackeray residence Krishnakunj flooded with volunteers joining MNS)