उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदापासून वंचित, शिवसैनिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

| Updated on: Nov 24, 2019 | 6:21 PM

वाशिम जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या शिवसेना समर्थकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांनी दिली

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदापासून वंचित, शिवसैनिकाचा आत्महत्येचा प्रयत्न
Follow us on

वाशिम : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष शिगेला पोहचला असतानाच वाशिममधील शिवसैनिकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची न मिळाल्याने नाराज झालेल्या एका तरुणाने हे टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न (Shiv Sena supporter attempts suicide) केला.

वाशिम जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या शिवसेना समर्थकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांनी दिल्याचं वृत्त ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिलं आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदापासून वंचित राहावं लागल्यामुळे त्याने हा अविचार केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. सुदैवाने त्याला वाचवण्यात यश आलं.

देवेंद्र फडणवीस यांनी काल (शनिवारी) सकाळी मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवार यांनी बंड पुकारत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आदल्या रात्रीपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीकडून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद देण्याबाबत सहमती झाल्याचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सांगत होते. सत्तास्थापनेचा दावा करण्याबाबत जुळवाजुळवही झाली होती. त्यामुळे महाविकासआघाडीचं सरकार आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद निश्चित मानून झोपी गेलेले सर्व जण सकाळी येऊन थडकलेल्या वृत्ताने अवाक झाले.

 

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाने वेगळंच वळण घेतल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपासून विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि समर्थक, राजकीय नेते, विश्लेषकही आश्चर्यचकित झाले आहेत. परंतु कोणीही आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन (Shiv Sena supporter attempts suicide) केलं जात आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीने भाजपच्या सत्तास्थापनेला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयाचे दारं ठोठावली. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षकारांना नोटीस देत त्यांची बाजू मांडण्यास सांगितलं. न्यायालयाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांना राज्यपालांकडील बहुमताची कागदपत्रं सादर करण्याचेही निर्देश दिले. त्यामुळे आज भाजपला दिलासा मिळाला असला तरी उद्या (25 नोव्हेंबर) भाजपची कसोटी लागणार आहे.