भाजप गमावणार, शिवसेना कमावणार? सत्तेच्या भागीदारीतले चार फॉर्म्युले कोणते?

| Updated on: Oct 28, 2019 | 10:57 AM

निवडणुकीत भाजपला 105, तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या आहेत. 145 ची मॅजिक फिगर स्वबळावर गाठण्यात भाजप अपयशी ठरला. हेच गणित सोडवण्यासाठी पुन्हा एकदा नवनवे फॉर्म्युले पुढे येणार आहेत.

भाजप गमावणार, शिवसेना कमावणार? सत्तेच्या भागीदारीतले चार फॉर्म्युले कोणते?
Follow us on

मुंबई : बहुमताच्या पेचामुळे शिवसेना-भाजप सत्तेचं गणित रखडलं आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस सत्तेच्या वाट्यासाठी सेना-भाजपात पुन्हा एकदा नवनवीन फॉर्म्युले समोर येणार आहेत. काय असतील ते फॉर्म्युले, शिवसेनेला काय मिळणार? भाजप काय गमावणार? की त्याउलट सत्तेत वाटा देऊनही भाजप कमावणार, आणि सेना गमावणार का? (Shivsena BJP Formula) असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

निवडणुकीआधीही बराच काळ सेना-भाजपचा जागावाटपाचा फॉर्म्युला चर्चेत अडकला होता. मात्र आता निकालानंतरही युतीची सत्ता आकड्यांमध्ये फसली आहे. कारण निवडणुकीत भाजपला 105, तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या आहेत. 145 ची मॅजिक फिगर स्वबळावर गाठण्यात भाजप अपयशी ठरला. हेच गणित सोडवण्यासाठी पुन्हा एकदा नवनवे फॉर्म्युले पुढे येणार आहेत.

फॉर्म्युला नंबर 1
अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद
खात्याचंही समान वाटप

फॉर्म्युला नंबर 2
मुख्यमंत्री भाजपचा
उपमुख्यमंत्री शिवसेनेचा
खात्यांचं समान वाटप

फॉर्म्युला नंबर 3
मुख्यमंत्री भाजपचा
शिवसेनेकडे गृह, महसूल आणि
सार्वजनिक बांधकाम सारखी महत्वाची खाती

फॉर्म्युला नंबर 4
मुख्यमंत्री भाजपचा
शिवसेनेला सर्वात जास्त खाती
महामंडळंही सर्वाधिक शिवसेनेला

वेगवेगळे फॉर्म्युले पुढे येत असले तरी सेना फिफ्टी-फिफ्टीवर (Shivsena BJP Formula) ठाम आहे. म्हणून भाजपवर दबाव टाकण्यासाठी शिवसेनेने विरोधकांच्या गाठीभेटीही सुरु केल्या आहेत. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 15 जण आपल्या संपर्कात असल्याचा दावा करत आहेत, तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही यापुढे अनेक जण ‘मातोश्री’वर दिसणार असल्याचे संकेत दिले आहेत.

मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंशिवाय ‘ही’ दोन नावं चर्चेत

अर्थात, भाजप सहजासहजी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देईल, असं वाटत नाही. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपाल भाजपला सत्तास्थापनेचं आमंत्रण देतील. त्यामुळे आधी शपथविधी आणि मग मंत्रिपदांचं वाटप अशी खेळी होऊ शकते. ज्यामुळे सेनेवर दबावही वाढेल आणि विरोधकांनाही शह मिळेल.

गेल्या वेळेसही सुरुवातीच्या काळात भाजपचं सरकार अल्पमतात होतं. मात्र राष्ट्रवादीने भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर करुन शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी केली. म्हणूनच तुलनेने कमी महत्त्वाची खाती शिवसेनेला मिळाली.

गेल्या वेळेस शिवसेनेकडे आरोग्य, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम, उद्योग ही चारच खाती होती. या वेळेस मात्र शिवसेना नक्की यापेक्षा जास्तीचा वाटा (Shivsena BJP Formula) सत्तेत घेईल, यात शंका नाही.

सत्ता मिळवण्यासाठी जेवढी सेना-भाजपला मेहनत घ्यावी लागली, तेवढीच मेहतन आणि मुरब्बीपणा सत्ता समीकरणांचा पेच सोडवण्यात लागणार आहे. इथंच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा कस लागेल.