BREAKING | शिवसेना नेते अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा

| Updated on: Nov 11, 2019 | 8:28 AM

खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत आहे' अशा शब्दात अरविंद सावंत यांनी संताप व्यक्त केला.

BREAKING | शिवसेना नेते अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा
Follow us on

मुंबई : शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. अरविंद सावंत यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात घोषणा केली. ‘शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे?आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत आहे’ अशा शब्दात अरविंद सावंत (Arvind Sawant resigns as Cabinet Minister) यांनी संताप व्यक्त केला.

‘लोकसभा निवडणुकीआधी जागावाटप आणि सत्तावाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता. आता हा फॉर्म्युला नाकारुन शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत आहे. या संदर्भात आज सकाळी 11 वा. दिल्ली येथे मी पत्रकार परिषद (Press Conference) घेणार आहे.’ असं अरविंद सावंत यांनी लिहिलं आहे.

कोण आहेत अरविंद सावंत?

67 वर्षीय अरविंद सावंत हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर खासदारपदी निवडून आले आहेत. मोदी 2.0 सरकारमध्ये सावंत यांना अवजड उद्योग मंत्रालय सोपवण्यात आलं. शिवसेनेच्या वाट्याचं हे एकमेव केंद्रीय मंत्रिपद आहे. पहिल्या मोदी सरकारमध्येही हेच खातं शिवसेनेला मिळालं होतं. त्यावेळी अनंत गिते या मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत होते.

1995 मध्ये त्यांनी नोकरीला रामराम ठोकून पूर्णवेळ पक्षासाठी झोकून दिलं. 1996 मध्ये अरविंद सावंत विधानपरिषदेवर आमदारपदी निवडून आले. 2010 मध्ये अरविंद सावंत यांना शिवसेने प्रवक्ते म्हणून बढती मिळाली.

2014 मध्ये अरविंद सावंत लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरले. काँग्रेसचे तत्कालीन खासदार मिलिंद देवरा यांच्याविरोधात त्यांनी शड्डू ठोकला होता. त्यावेळी सावंत यांचा विजय कठीण मानला जात होता. परंतु देवरांचा तब्बल एक लाख 20 हजारांच्या मताधिक्क्याने पराभव करुन ते खासदारपदी निवडून आले. 2019 मध्ये पुन्हा त्यांनी मिलिंद देवरांचा एक लाखांच्या मताधिक्क्याने पराभव केला.

पाठिंब्याबाबत चर्चा करायची झाल्यास शिवसेनेने भाजपशी सर्व संबंध तोडावेत, एनडीएमधून आणि पर्यायाने सत्तेतून बाहेर पडावं, अशी अट राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी घातली होती. त्यानंतर शिवसेनेने तातडीने पावलं (Arvind Sawant resigns as Cabinet Minister) उचलल्याचं दिसत आहे.

शिवसेनेचे केंद्रातील एकमेव मंत्री अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार, हेही जवळपास निश्चित झालं आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राची वाटचाल ‘महासेनाआघाडी’ अर्थात शिवसेना + राष्ट्रवादी + काँग्रेस अशा आघाडीकडे होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

शिवसेनेला सत्तास्थापनेचं निमंत्रण, ‘मातोश्री’वर रात्रभर खलबतं

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. सत्तास्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी सेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ‘मातोश्री’ निवासस्थानी रात्रभर खलबतं सुरु होती.

‘मातोश्री’वर रात्री चार तास शिवसेना नेत्यांची बैठक चालली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर यांच्यात ही बैठक झाली. मात्र या सभेनंतर कोणत्याही नेत्याने प्रतिक्रिया देणं टाळलं.

‘मी ‘मातोश्री’वर नव्हतो त्यामुळे मला काहीही माहीत नाही. उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची अधिकृत भूमिका सांगतील. शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण होणार? दिल्लीला कोण जाणार हे सगळं उद्धव ठाकरे ठरवतील, असं शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितलं.

काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिल्यास…

पर्याय 1

शिवसेना- अपक्षांच्या पाठिंब्यासह (64) + काँग्रेस (44) + राष्ट्रवादी (54) = 162
बविआ (3) + समाजवादी पक्ष (02) + स्वाभिमानी (01) = 162+06 = 168
बहुमताचे संख्याबळ – 145

पर्याय 2

राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आणि काँग्रेस तटस्थ राहिली तर
सभागृहाचे संख्याबळ 288 वजा 44 = 244
शिवसेना – अपक्षांच्या पाठिंब्यासह (64) + राष्ट्रवादी (54)+ काँग्रेस समर्थक अपक्ष (04)  =  122
बहुमताचे संख्याबळ – 123

काँग्रेस-राष्ट्रवादीने अद्याप आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे. आपल्याला जनादेश नसल्याचं सांगत काँग्रेस-राष्ट्रवादीने विरोधी बाकांवर बसण्याची तयारी दर्शवली आहे. काँग्रेस आमदारांनी सेनेला पाठिंबा देण्यास सकारात्मकता दर्शवली असली, तरी अंतिम निर्णय हा हायकमांड सोनिया गांधी यांचा असेल. भाजपला सत्तेपासून दूर राखण्यासाठी सेनेला पाठिंबा देण्याची खेळी काँग्रेस-राष्ट्रवादी खेळू शकते, अशी चर्चा आहे.