राज्यसभेसाठी शिवसेनेतील जुनेजाणते शर्यतीत, ‘काँग्रेस रिटर्न’ प्रियंका चतुर्वेदीही इच्छुक

| Updated on: Feb 20, 2020 | 9:07 AM

लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, अनंत गिते यांची नावेही राज्यसभेसाठी चर्चेत आहेत.

राज्यसभेसाठी शिवसेनेतील जुनेजाणते शर्यतीत, काँग्रेस रिटर्न प्रियंका चतुर्वेदीही इच्छुक
Priyanka Chaturvedi
Follow us on

मुंबई : एप्रिल महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेत चुरस पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी संसदेत पाऊल ठेवण्यास इच्छुक आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेतील जुनेजाणते नेतेही शर्यतीत (Shivsena leader in race for Rajyasabha) आहेत.

राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी उत्सुक असल्याचं म्हटलं जातं. त्यादृष्टीने चतुर्वेदींनी प्रयत्न सुरु केल्याचीही माहिती आहे. विशेष म्हणजे प्रियंका चतुर्वेदी या पर्यावरण-पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. चतुर्वेदींनी थेट ‘फील्डिंग’ लावल्याने राज्यसभेच्या एका जागेच्या शर्यतीत त्या पुढे दिसतात.

अन्य पक्षातून आलेल्या नेत्यांपेक्षा जुन्या जाणत्या नेत्यांनाच संधी मिळाली पाहिजे असाही पक्षात मतप्रवाह आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, अनंत गिते यांची नावेही चर्चेत आहेत. याशिवाय विधानपरिषदेचे आमदार दिवाकर रावतेही उत्सुक असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीचे शरद पवार, अ‍ॅड. माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे अमर साबळे, रिपाइंचे रामदास आठवले आणि अपक्ष संजय काकडे या सात जणांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत मार्च महिन्यात संपत आहे.

शरद पवार मैदानात, पुन्हा संसदेत जाणार!

राज्यसभेत राजकुमार धुत यांची यंदा पुन्हा वर्णी लागण्याची शक्यता कमी आहे. पण पक्षनेतृत्वाने त्यांच्या नावावर अद्याप फुली मारली नसल्याचं सांगितलं जातं. 42 मतांचा कोटा असल्याने शिवसेनेचा एक खासदार हमखास निवडून जाणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत आल्याने महाविकासआघाडीची ताकद वाढली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीकडून शरद पवार यांचं नाव निश्चित झालं आहे. तर भाजपकडून उदयनराजेंचं तिकीटही जवळपास कन्फर्म असल्याचं बोललं जातं. आता शिवसेनेच्या कोट्यातून कोणाची वर्णी लागणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

राज्यसभा नियुक्तीसाठी निकष काय?

राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची 37 मतं आवश्यक आहेत. त्यामुळे आघाडीचे चार तर भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येतील. शिल्लक राहिलेल्या मतांमधून आणखी एक उमेदवार निवडून आणण्याचा आघाडीचा आणि भाजपचा प्रयत्न राहणार आहे.

राज्यसभेच्या सात जागांबाबत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित बसून निर्णय घेणार आहेत. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत सातव्या जागेसाठी भाजपने उमेदवार दिल्यास चुरस पाहायला मिळेल. पण छोटे आणि अपक्ष सत्ताधारी पक्षाच्या बाजूने राहिल्याचं दिसून येतं. त्यामुळे भाजपला एका जागेचा फटका बसू शकतो. (Shivsena leader in race for Rajyasabha)