“कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची ‘मन की बात’ समजून घेतली असती, तर गटांगळय़ा खाण्याची वेळ आली नसती”

| Updated on: Apr 26, 2021 | 8:15 AM

आज कोरोनाच्या त्सुनामीत देशाला गटांगळय़ा खाण्याची वेळ आली नसती, असा टोला शिवसेनेनं केंद्र सरकारला लगावला आहे. (Saamana Editorial on PM Modi Mann Ki Baat)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची मन की बात समजून घेतली असती, तर गटांगळय़ा खाण्याची वेळ आली नसती
PM-Modi
Follow us on

मुंबई : पंतप्रधान मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’मधून कोरोनाची दुसरी लाट, त्याविरुद्ध केंद्र व राज्य सरकारे लढा देण्याचा पूर्ण प्रयत्न करीत असल्याबाबत ग्वाही दिली. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपल्या देशातील आरोग्य यंत्रणा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना, ऑक्सिजन बेडअभावी कोरोना रुग्णांचे जीव जाताना जग पाहत आहे. हे सगळेच चित्र भयंकर आहे. पण मोदींनी दुसऱ्या लाटेची ‘मन की बात’ वेळीच समजून घेतली असती तर आज कोरोनाच्या त्सुनामीत देशाला गटांगळय़ा खाण्याची वेळ आली नसती, असा टोला शिवसेनेनं केंद्र सरकारला लगावला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून वाढता कोरोनाबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. (Shivsena Saamana Editorial on PM Narendra Modi Mann Ki Baat Corona Cases)

सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलं? 

पंतप्रधान मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’मधून कोरोनाची दुसरी लाट, त्याविरुद्ध केंद्र व राज्य सरकारे लढा देण्याचा पूर्ण प्रयत्न करीत असल्याबाबत ग्वाही दिली. ही लढाई सुरू आहे हे खरेच, पण ती सुरू होण्यापूर्वी केंद्राने काही गोष्टींची पूर्वखबरदारी, पूर्वतयारी केली असती तर? तज्ञांनी खूप आधी दिलेला इशारा गांभीर्याने घेतला असता आणि आता येईल ती ‘त्सुनामी’च असेल ही दुसऱ्या लाटेची ‘मन की बात’ वेळीच समजून घेतली असती तर आज कोरोनाच्या त्सुनामीत देशाला गटांगळय़ा खाण्याची वेळ आली नसती, अशी खोचक टीका शिवसेनेनं केली आहे.

वॉशिंग्टनच्या संस्थेने दिलेला इशारा केंद्र सरकारने गांभीर्याने घ्यायला हवा

देशात गेल्या 24 तासांत सलग चौथ्या दिवशी तीन लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद झाली तर 2767 रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या आठवडय़ात 24 तासांतील कोरोना रुग्णवाढीचा दर दोन-अडीच लाखांच्या आसपास होता. गेल्या चार दिवसांपासून तीन लाखांच्या वर गेला आहे. दुसऱ्या कोरोना तडाख्याने सर्वच व्यवस्थांची अवस्था हतबल करून टाकली आहे. जसा कोरोना रुग्णवाढीचा रोज उच्चांक गाठला जात आहे, तसा मृत्यूचा आकडाही भयंकर प्रमाणात वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिटय़ूट फॉर हेल्थ मेट्रिक्स ऍण्ड इव्हॅल्यूशनने दिलेला इशारा काळजाचा ठोका चुकविणाराच आहे. या संस्थेने काढलेल्या निष्कर्षानुसार मे महिन्यात भारतात रोजचा कोरोना मृतांचा आकडा पाच हजारांवर पोहोचू शकतो. 12 एप्रिल ते 1 ऑगस्ट 2021 या कालावधीत देशातील कोरोना मृतांची संख्या तीन लाखांच्या पार जाऊ शकते. वॉशिंग्टनच्या या संस्थेने दिलेला हा इशारा आता तरी केंद्र सरकारने गांभीर्याने घ्यायला हवा, असा सल्ला शिवसेनेनं दिला आहे.

सर्व खापर फक्त कोरोनाच्या त्सुनामीवर फोडता येणार नाही

गेल्यावर्षीही कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी परदेशी संस्थांनी असे इशारे दिले होते. पण सुदैवाने परिस्थिती आटोक्यात राहिली होती. त्यामुळे या इशाऱयांबाबत सरकार समर्थक मंडळींकडून शेरेबाजीही करण्यात आली होती. मात्र सध्याची परिस्थिती तशी नाही हे सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे. कोरोनाची दुसरी लाट म्हणजे त्सुनामी ठरेल. या तज्ञांच्या इशाऱ्यांनाही गांभीर्याने घेतले नाही. त्याचाच परिणाम म्हणून आज नवे कोरोना रुग्ण आणि मृतांची संख्या याचे जागतिक विक्रम नोंदविले जात आहेत. ऑक्सिजनअभावी रुग्णांचे तडफडून मृत्यू होत आहेत. या सगळय़ाच परिस्थितीचे खापर फक्त कोरोनाच्या त्सुनामीवर फोडता येणार नाही, असेही यात म्हटले आहे.

रुग्णांचे मृत्यू आणि त्यांच्या उद्ध्वस्त कुटुंबांचे काय?

आता सरकारतर्फे देशभरात ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेद्वारे केला जात आहे, त्यासाठी लष्कराचेही सहाय्य घेतले जात आहे. कोरोना लस, वैद्यकीय दर्जाचा प्राणवायू आणि त्याच्याशी संबंधित उपकरणे यांच्या सीमाशुल्कात सूट देण्याचाही निर्णय केंद्राने घेतला आहे. रेमडेसिवीरसारख्या अत्यंत तुटवडा जाणवणाऱ्या इंजेक्शनचाही पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न असल्याचे केंद्र सरकार सांगत आहे. हे सगळे ठीकच आहे, पण बेकाबू होऊ पाहणाऱ्या कोरोनाचे काय? हतबल झालेली आरोग्य व्यवस्था, उपचारांअभावी होणारे रुग्णांचे मृत्यू आणि त्यांच्या उद्ध्वस्त कुटुंबांचे काय? असा सवालही शिवसेनेनं केला आहे.

आग्रा येथील एक बातमी मन विषण्ण करणारी आहे. बेड न मिळाल्याने ऑक्सिजनअभावी तडफडणाऱया पतीला रिक्षातच आपल्या तोंडाने श्वास देऊन त्याचे प्राण वाचविण्याचे केविलवाणे प्रयत्न त्याची पत्नी करीत होती. ही बातमी कोरोनाबाबतच्या सर्वच सरकारी दाव्यांचा पर्दाफाश करणारी आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत मैलोन्मैल पायपीट करीत आपल्या गावी निघालेले स्थलांतरितांचे लोंढे जगाला दिसले. आता कोरोनाच्या दुसऱया लाटेत आपल्या देशातील आरोग्य यंत्रणा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना, ऑक्सिजन बेडअभावी कोरोना रुग्णांचे जीव जाताना जग पाहत आहे. हे सगळेच चित्र भयंकर आहे. सरकारकडून जे उपाय केले जात आहेत त्यामुळे भविष्यात कोरोना त्सुनामीचा प्रकोप कमी होईलही, पण तोपर्यंत ना गेलेले जीव परत येतील, ना त्यांची उद्ध्वस्त कुटुंबे सावरले जातील, असेही शिवसेनेनं यात म्हटले आहे.  (Shivsena Saamana Editorial on PM Narendra Modi Mann Ki Baat Corona Cases)

संबंधित बातम्या : 

Anupam Kher | ‘येणार तर मोदीच’ केंद्र सरकारवरील टीकेला अनुपम खेर यांचं उत्तर

Coronavirus: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; डबलिंग रेटचा कालावधी ‘इतक्या’ दिवसांनी वाढला

कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय की हा लॉकडाऊनचा परिणाम ?, पाहा मुंबईतील आकडेवारी काय सांगते