पबमध्ये नाचणं ते विदेशी गाड्यांचा प्रवास, शिवसेनेकडून पार्थ पवारांची खिल्ली
पुणे : पबमध्ये नाचणारा अचानक रथयात्रेत नाचू लागतो, बघा काय जादू आहे लोकशाहीची, असं म्हणत राज्यमंत्री विजय शिवतारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे उमेदवार पार्थ पवारांची खिल्ली उडवली. युतीचे मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचा नारळ फोडताना पार्थवर तोफ डागण्यात आली. विदेशी गाड्यांमध्ये फिरणारा रेल्वेत बसू लागतो, शेतकऱ्यांच्या शेतात जायला लागतो. बिघडलेल्या पोराला सुधारवण्याचं काम यानिमित्ताने होतंय. पार्थ […]

पुणे : पबमध्ये नाचणारा अचानक रथयात्रेत नाचू लागतो, बघा काय जादू आहे लोकशाहीची, असं म्हणत राज्यमंत्री विजय शिवतारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे उमेदवार पार्थ पवारांची खिल्ली उडवली. युतीचे मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचा नारळ फोडताना पार्थवर तोफ डागण्यात आली.
विदेशी गाड्यांमध्ये फिरणारा रेल्वेत बसू लागतो, शेतकऱ्यांच्या शेतात जायला लागतो. बिघडलेल्या पोराला सुधारवण्याचं काम यानिमित्ताने होतंय. पार्थ निवडून तर येणार नाही, पण वडील अजित पवारांची चिंता कमी झाली तरी ही निवडणूक सार्थकी लागेल, असं म्हणत शिवतारेंनी खिल्ली उडवली.
शिवाय आजोबा म्हणतो नातवाला निवडून द्या, आणि नातू म्हणतो आजोबांना पंतप्रधान करायचंय. माझी प्रगती म्हणजे तुमची प्रगती. म्हणजे निव्वळ स्वार्थाचं राजकारण, अशा विघातक लोकांना लोकशाहीतून हद्दपार करायला हवं. त्याची संधी या लोकसभेच्या निमित्ताने आल्याचं शिवतारे म्हणाले.
बारामतीचा जनरल डायर आज मुलाला मतं द्या म्हणतोय, मावळमधून राष्ट्रवादी काँग्रेसला एक मतही देऊ नका. मावळ गोळीबारातील शहिदांना हीच खरी श्रद्धांजली असेल, असं आवाहन शिवतारेंनी केलं.
पार्थ पवारला निवडणुकीत उतरवलंय म्हणजे भरपूर लक्ष्मी दर्शन होणार, असं सूचक वक्तव्य शिवसेना उपनेत्या निलम गोऱ्हेंनी केलं. नुकतंच बारामतीत गेले होते, तेव्हा इच्छुकाला उमेदवारी मिळाली नाही तर ते टीव्ही फोडून टाकतात असं एकाने सांगितलं. मग आता आपला विजय घोषित होईल तेव्हा आपले टीव्ही सुरक्षित ठेवावे लागतील, असा टोला निलम गोऱ्हेंनी लगावला. त्या मावळ लोकसभेत बारणेंच्या प्रचारात बोलत असल्याने साहजिकच त्यांचं बोट पार्थकडे होतं.