शिवसेना संपणार? महाविकास आघाडीचं भवितव्य काय?; महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या प्रश्नावर भुजबळ काय म्हणाले?

| Updated on: Mar 20, 2023 | 1:00 PM

पण काही का होईना प्रत्येक राजकीय पक्ष कधीही निवडणुकीला तयार असतो. तिन्ही पक्ष एकत्र आहोत. आम्ही लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढणार आणि जिंकणारच, असा दावाही छगन भुजबळ यांनी केला.

शिवसेना संपणार? महाविकास आघाडीचं भवितव्य काय?; महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या प्रश्नावर भुजबळ काय म्हणाले?
chhagan bhujbal
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नांदेड : शिवसेनेत आजवरची सर्वात मोठी फूट पडली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडील निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नावही गेलं. फूट पडल्यानंतरही सहा महिने उलटले तरी ठाकरे गटातील गळती सुरूच आहे. ठाकरे गटातून जाणारे भाजपमध्ये जात नाहीत. थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जात आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचं काय होणार? असा प्रश्न संपूर्ण महा
राष्ट्राला पडला आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता महाविकास आघाडीचं काय होणार? महाविकास आघाडी अस्तित्वात राहणार का? हा दुसरा प्रश्नही महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात चमकून गेला आहे. या दोन्ही प्रश्नावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी रोखठोक मत मांडलं आहे. आपल्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाच्या आधारे भुजबळ यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने त्यांच्या गौरव सोहळ्याचं काल नांदेडमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी भुजबळ यांची मुलाखत घेत त्यांना महाराष्ट्राला भेडसावणारे हे दोन कळीचे प्रश्न विचारले. त्यावर भुजबळ यांनी रोखठोक मते व्यक्ती केली. माझ्या मनातून शिवसेना अजून गेली नाही, असं भुजबळ यावेळी म्हणाले. तेव्हा कोणती शिवसेना? असा मिश्किल प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर बाळासाहेबांची शिवसेना. मातोश्रीवर राहत होते, त्या बाळासाहेबांची शिवसेना, असं उत्तर देत भुजबळ यांनी हा प्रश्न परतवून लावला.

हे सुद्धा वाचा

शिवसेना प्रत्येक व्यक्तीच्या मनात

बाळासाहेब गेल्यानंतर मला अनेक जण विचारत होते. शिवसेनेचं काय होईल? शिवसेना संपली… मी तेव्हाही सांगत होतो, शिवसेना संपणार नाही. कारण शिवसेना काही असली तरी मराठी माणसाच्या मनामनात आणि गावागावात रुजलेली आहे. मराठी माणूस मतदान कदाचित कुणालाही करेल. पण त्याच्या मनातून शिवसेना कधीच जाणार नाही. पण मराठी माणसासाठी निर्माण झालेली शिवसेना ही प्रत्येक व्यक्तीच्या मनाच्या कोपऱ्यात असते. त्यामुळेच शिवसेना संपणार नाही. मागेही शिवसेनेत इतकी पडझड झाली. अनेक मोठे नेते सोडून गेले. पण उद्धव ठाकरे यांनी पक्ष उभा केला. स्वत:ला सिद्ध केलं, असं भुजबळ यांनी सांगितलं.

मी शिवसैनिक असा झालो

यावेळी छगन भुजबळ यांनी ते शिवसैनिक कसे झाले याचा किस्सा सांगितला. शिवसेनेच्या पहिल्या सभेला मी गेलो होतो. काँग्रेसचे नेते रामराव आदिक त्या सभेला आले होते. प्रबोधनकार ठाकरे होते. आम्ही कॉलेजात होतो. कॉलेजातून बाहेर पडल्यावर आपल्यालाही नोकरी हवी म्हणून आम्हीही सभेला गेलो. तिथल्या वक्त्यांची भाषणं ऐकली आणि आम्ही शिवसैनिक झालो. त्यानंतर शाखाप्रमुखांचा शिवसेनेचा जो पहिला लॉट होता. त्यात आम्ही होतो.

शिवसेनेतून कसे बाहेर पडलो

बाळासाहेब ठाकरे यांचं मंडल आयोगाबाबत वेगळं मत होतं. आम्ही मंडल आयोगाच्या समर्थन करत होतो. आदिवासी आणि दलित समाजाला आरक्षण मिळालं. त्यांना केंद्रापासून ते राज्यापर्यंत फंड मिळतो. त्यातून त्यांचा उत्कर्ष होत होता. 54 टक्के असलेल्या ओबीसी समाजालाही काही तरी मिळालं पाहिजे म्हणून मी मंडल आयोगाला समर्थन दिलं. त्यातूनच मी शिवसेनेपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. शरद पवार हे मंडल आयोगाच्या बाजूचे होते. त्यामुळे तिकडे जाण्याचा निर्णय घेतला, असं ते म्हणाले.

महाविकास आघाडी भवितव्य काय?

यावेळी भुजबळ यांना महाविकास आघाडीचं भवितव्य काय? असा सवाल केला. त्यावर, महाविकास आघाडीचं भवितव्य चांगलं राहील. एक पक्षाचं सरकार असतं तिथेही ऑलवेल नसतं. त्यांच्यात आपआपसात काही ना काही चालू असतं. इथे तर तीन पक्ष आहेत. यात वेगळ्या आयडॉलॉजीचे लोक आहेत. पण आपला शत्रू ठरलेला असेल तर एकत्र राहून लढलं जातं. ती एक गरज निर्माण होते. इथे आमचाही शत्रू ठरलेला आहे. त्याला आम्हाला पराभूत करायचं आहे. म्हणून महाविकास आघाडी निर्माण झाली. विधान परिषदेच्या निवडणुका, नागपूर, अमरावती आणि कसबा आम्ही जिंकलं. ही लिटमस टेस्ट होती. लोकांच्या मनात काय आहे हे दिसून आलं. त्यांचे वर्षानुवर्षाचे गड महाविकास आघाडीने ढासळले आहेत. एकत्र राहिलं तर हे होऊ शकतं हा आशावाद निर्माण झाला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

निवडणुका का होत नाहीत?

महापालिका निवडणुका होत नाहीत. त्यावरून त्यांनी भाजपला फटकारलं. महापालिकेच्या निवडणुका घेत नाहीत. कारण अमरावती, नागपूर आणि कसबा तर आपला होणार नाही ना अशी कुणाच्या मनात भीती असू शकते. त्यामुळे निवडणुका पुढे पुढे ढकलल्या जात आहेत. कदाचित कोर्टाचीही काही कारणं असतील. कदाचित हे सरकार कायदेशीर आहे की बेकायदेशीर त्याचाही निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे, त्याचीही वाट पाहत असतील,  असा चिमटा त्यांनी काढला.