संजय राठोडांना ‘ती’ एक घोडचूक भोवली, ज्यामुळे ठाकरेंचा विश्वास उडाला?

| Updated on: Feb 28, 2021 | 4:18 PM

अखेर शिवसेना नेते संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी आपल्या वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलाय.

संजय राठोडांना ती एक घोडचूक भोवली, ज्यामुळे ठाकरेंचा विश्वास उडाला?
उद्धव ठाकरे-संजय राठोड
Follow us on

मुंबई : अखेर शिवसेना नेते संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी आपल्या वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलाय. त्यामुळे संजय राठोड यांच्या राजकीय कारकीर्दच संकटात सापडली आहे. संजय राठोड यांना राजीनामा का द्यावा लागला याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, राजकीय जाणकारांच्या मते पूजा आत्महत्येप्रकरणी 15 दिवस गायब राहून थेट शक्तीप्रदर्शन करत राजकीय दबाव निर्माण करण्याची राठोड यांची कृती त्यांची सर्वात मोठी घोडचूक होती. त्यातूनच त्यांनी मातोश्रीचा विश्वास गमावला. अशा प्रकरणात ठाकरे सरकारची कोंडी होत असताना राठोड यांनी या प्रकरणाचा तपास होऊपर्यंत पद सोडण्याऐवजी सरकारवरच दबाव निर्माण केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा राजीनामा घेतल्याचंही बोललं जातंय (Which is Biggest mistake of Sanjay Rathod in Pooja Rathod Suicide case).

महाविकासआघाडीच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच आघाडी सरकार आणि विशेषतः शिवसेनेची इतक्या मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. याला संजय राठोड जबाबदार असल्याचीही भावना अनेक शिवसैनिकांमध्ये तयार झाली. कारण संजय राठोड यांनी आपलं पद वाचवण्यासाठी पक्षाची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लावली. यामुळे भाजपला थेट हल्ला करण्यासाठी मोठं निमित्त मिळालं, असंही मत शिवसैनिकांचं तयार झालं. याशिवाय संजय राठोड मातोश्रीपेक्षा मोठे आहेत का असाही प्रश्न विचारला जाऊ लागला.

समोर आले तर थेट शक्तीप्रदर्शनच केलं

गंभीर आरोप झाल्यानंतर 15 दिवसांनी संजय राठोड माध्यमांसमोर आले. मात्र, त्यांनी यावेळी आपल्या भोवतीचं संशयाचं धुकं कमी करण्याऐवजी शक्तीप्रदर्शन केलं. विशेष म्हणजे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधत गर्दी न करता नियम पाळण्याचं आवाहन केलं होतं. त्याला संजय राठोड यांनी हरताळ फासत मोठी गर्दी जमवली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची नाचक्की झाली. कोरोनाचा विचार करुन मुख्यमंत्र्यांसह शरद पवार आणि इतर अनेकांनी आपले दौरे रद्द केले होते. मात्र, संजय राठोड यांनी या काळातही गर्दी जमवत शक्ती प्रदर्शन केल्यानं आघाडी सरकारबाबत चुकीचा संदेश केला. यावरुन भाजपनेही सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी केली.

मातोश्रीचा विश्वास गमावला

संजय राठोड यांनी सुरुवातीपासून या प्रकरणात संशयास्पद भूमिका घेतली. त्यांच्यामुळे महाविकासआघाडीला घेरण्यासाठी विरोधी पक्षाच्या हाती मोठा मुद्दा सापडला. विशेष म्हणजे या मुद्द्यावरुन भाजपने शिवसेनेवर मोठे हल्ले चढवले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अशातच संजय राठोड यांनी या प्रकरणाची चौकशी होऊन निकाल येऊपर्यंत स्वतःहून पदापासून दूर होण्याऐवजी शक्तीप्रदर्शन करत शिवसेनेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राठोड यांनी मातोश्रीचा विश्वासही गमावला.

संबंधित बातम्या वाचा :

LIVE | मी माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे, संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया

जे उद्धव ठाकरेंनी केलं ते शरद पवारांनीही करावं, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा: चंद्रकांत पाटील

संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला! ‘वर्षा’ बंगल्यावर नेमकं काय घडलं?

संबंधित व्हिडीओ पाहा :

Which is Biggest mistake of Sanjay Rathod in Pooja Rathod Suicide case