हुडव्यातील शेणी चोरल्याशिवाय होळीला मजा येत नव्हती, पण सकाळी मात्र…

| Updated on: Mar 26, 2023 | 10:31 AM

ग्रामीण भागातलं आयुष्य जगत असताना येणाऱ्या अडचणी, शेणीचे हुडवे तुम्हाला फक्त काही जिल्ह्यात पाहायला मिळतात. सध्या तिथं गेल्यानंतर अनेक सेल्फी काढताना पाहायला मिळतात...

हुडव्यातील शेणी चोरल्याशिवाय होळीला मजा येत नव्हती, पण सकाळी मात्र...
Facebook
Image Credit source: tv9marathi
Follow us on

फेसबुकवरती (Facebook) शेणीचा हुडवा पाहिला अन गावाकडच्या होळीची (Holi 2023) आठवण झाली. मी मुळचा सांगली (Sangli) जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चरण गावचा, आमच्या पश्चिम महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात शेणीचा हुडवा रचला जातो. तो हुडवा इतका भारी रचला जातो, की काही लोकं सध्या तिथं जाऊन त्याचा फोटो काढतात. त्याचबरोबर असं काम तुम्हाला जमेल का ? अशा पद्धतीच्या पोस्ट टाकतात.

थळोबा एक असं ठिकाण हिवाळा आणि उन्हाळा आम्ही तिथं बसायला असायचो. देवाच्या बाजूने असलेल्या दगडावर गप्पांचा फड रंगायचा. तिथं असलेल्या आग्या मव्हाची भीती असून सुद्धा पोर तिथ बिनधास्त झोपायची. तिथं असलेलं भलं मोठं शेवरीचं झाड कित्येक वर्षाचं आहे, कुणालाच माहित नाही.
होळीच्या दिवशी भावकीत पोत्यान शेणी गोळा केल्या जायच्या. जो कोणी शेणी द्यायला नकार देईल. त्याच्या दारात पोर बोंबलायची…

शेणी गोळा केल्यानंतर थळोबा गाठायचो, त्यामध्ये आम्ही सगळी पोर असायचो. शेवरीच्या झाडाचा पाला आणि सुकलेली फुल गोळा करायचो. त्यानंतर होळी रचायला सुरुवात व्हायची.

हे सुद्धा वाचा

एक टोळी पोत घेऊन वरच्या आळीला जायची, तर दुसरी टोळी खालच्या आळीला जायची. शेण्याचा हुडवा चोरून आणायची. शेण्या चोरताना सुद्धा काळजी घेतली जायची. प्रत्येकाच्या हुडव्यातील थोड्या थोड्या शेण्या घ्यायचे.

होळी रचत असताना पडणार नाही याची काळजी घ्यायचे. त्यामध्ये यरुंड नावाचं झाड लावायचं. सगळं झाल्यावर… चंद्र दिसायला लागल्यावर होळी पेटवायची. काहीजण त्यामध्ये पैसे टाकायचे. काहीजण पोळीचा नैवैद्य दाखवायचे. सगळे बोंबलत होळीच्या बाजूने फिरायचे. मग ठरलेली घोषणा “होळी र होळी पुरणाची पोळी…….”

रात्री कुणाच्या हुडव्यात जास्त शेण्या चोरल्या, तो सकाळी महिलांचा थरार पाहून घरातून बाहेर पडायचा नाही.