रोखठोक अत्रेंकडून यशवंतरावांचा निपुत्रिक उल्लेख, नंतर यशवंतरावांनी जे केलं, ते अत्रे कधीही विसरले नाहीत!

| Updated on: Aug 29, 2021 | 7:38 AM

आज नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात मोठा संघर्ष सुरुये. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव आणि आचार्य अत्रेंमधला हा प्रसंग महत्त्वाचा आहे. आपल्याला राडा संसकृती पुढे न्यायची? की यशवंतराव-अत्रेंची नीती हा ज्याचा त्याचा प्रश्न......!

रोखठोक अत्रेंकडून यशवंतरावांचा निपुत्रिक उल्लेख, नंतर यशवंतरावांनी जे केलं, ते अत्रे कधीही विसरले नाहीत!
यशवंतराव चव्हाण आणि आचार्य अत्रे
Follow us on

अक्षय आढाव, टीव्ही 9 मराठी, मुंबई : सध्या केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेना यांच्यात टोकाचा संघर्ष सुरु आहे. राजकीय संघर्ष आपण समजू शकतो, पण हा संघर्ष वैयक्तिक पातळीला जाऊन पोहोचलाय… एकमेकांची उणीदुणी काढणं, जाहीर धमक्या देणं, खालच्या पातळीला जाऊन एकमेकांवर चिखलफेक करणं, असं सगळं सुरु आहे… या सगळ्यात कोण मुस्काडीत मारण्याची भाषा करतं तर कुणी कोथळा काढण्याची…. पण एवढं सगळं होऊनही कुणी कुणाची दिलगीरी व्यक्त करत नाही, माफी तर फार लांबची गोष्ट…..

पण आज आम्ही तुम्हाला असा प्रसंग सांगणार आहे की जो प्रसंग ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा अंदाज देखील…………!

महाराष्ट्राचें पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आजही महाराष्ट्र ‘सह्याद्री’ या नावाने ओळखतो. किंबहुना ‘महाराष्ट्राचा सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावला’, ही म्हणही यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वामुळेच पुढे रुढ झाली. यशवंतरावानी घालून दिलेले नैतिकतेचे धडे आजही शिकवले जातात. राजकीय आणि सामाजिक जीवनात तसंच वैयक्तिक आयुष्यात नैतिकता आणि सदाचाराचा महामेरु म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या याच नैतिकतेचा हा किस्सा….

आचार्य अत्रे (Acharya Atre)….. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बिनीचे शिलेदार, पत्रकार, संपादक, फर्डे वक्ते, ज्यांच्या सभांना हजारो माणसांची गर्दी व्हायची… ज्यांचे विचार ऐकायला माणसं ऊन वारा पाऊस कशाचीही तमा बाळगायची नाहीत… अशा आचार्य अत्रेंचा एकदा यशवंतराव चव्हाणांवर टीका करताना तोल ढळला. अगदी वैयक्तिक तसंच खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यावर टीका केली. पण संयमी आणि नीतीवान यशवंतराव चव्हाणांनी अत्रेंना फोन करुन सत्य परिस्थिती सांगितली… सत्य परिस्थिती कळाल्यावर आचार्य अत्रेंना गदगदून आलं… त्यांना आपली चूक कळली आणि जाहीररित्या त्यांनी यशवंतराव आणि त्यांच्या पत्नी वेणूताईंची माफी मागितली…!

 असं काय घडलं की आचार्य अत्रेंनी यशवंतराव चव्हाण यांची माफी मागितली…??

संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रिपदी यशवंतराव चव्हाण विराजमान झाले होते. काही जणांकडून कौतुक तर काही जणांकडून त्यांना टीकेचं धनी व्हावं लागलं. संयुक्त महाराष्ट्र लढ्याची चवळवळ ज्यांच्या लेखणीशिवाय अधुरी आहे, अशा आचार्य अत्रेंना मात्र यशवंतराव मुख्यमंत्री झालेत, हे काही रुचलं नव्हतं. त्यांनी यशवंतरावांविरोधातल्या आपल्या भावना कागदावर उतरवल्या.

आचार्य अत्रेंनी ‘निपुत्रिक यशवंतरावांच्या हातात महाराष्ट्राची धुरा’ या मथळ्याखाली मोठा अग्रलेख लिहिला. या अग्रलेखात यशवंतराव चव्हाण यांच्यावर खालच्या भाषेत टीका करण्यात आली होती. कुणालाही राग यावा, अशी ही टीका होती. या अग्रलेखाने सर्वत्र खळबळ माजली. जेव्हा यशवंतरावांनी हा अग्रलेख वाचला तेव्हा त्यांनाही खूप वाईट वाटलं. पण यशवंतरावांनी अत्रेंना थेट उत्तर देणं टाळलं.

यशवंतरावांचा अत्रेंना फोन…

दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाण यांनी अत्रेंना फोन केला. यशवंतराव म्हणाले, “अत्रे साहेब तुम्ही म्हणता मी निपुत्रिक… पण अहो मी निपुत्रिक नाही… चले जाव चळवळीवेळी मला पकडण्यासाठी पोलिसांनी माझ्या घरावर धाड टाकली होती. त्यावेळी माझी पत्नी वेणू गरोदर होती. इंग्रजांच्या हाताला मी लागलो नाही. त्याचा राग त्यांनी माझ्या पत्नीवर म्हणजेच वेणूवर काढला. त्यांनी वेणूच्या पोटावर काठीने मारलं. या सगळ्यात तिच्या पोटात असलेला गर्भ पडला. तसंच गर्भशयाला देखील दुखापत झाली आणि त्याचमुळे पुन्हा मला मुल होण्यात अडचण आली.

यशवंतराव चव्हाण यांचं फोनवरील बोलणं ऐकून आचार्य अत्रेंचं मन हेलावून गेलं. त्यांना आपली चूक लक्षात आली. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी यशवंतराव चव्हाणांची माफी मागितली. आणि यशवंतरावांच्या घरी जाऊन वेणूताईसमोर अत्रेंनी पश्चातापही व्यक्त केला. पुढे जाहीरसभेतही त्यांनी यशवंतरावांची माफी मागितली.

यशवंतराव चव्हाण हा नेताच विरळा… ज्यांच्या नैतिकतेची सर कोणत्याच राजकीय नेत्याला येणार नाही. आजच्या काळात अनेक राजकीय पक्ष यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊन राजकारण करत आहेत. मात्र त्यांनी घालून दिलेला नैतिक आणि सुसंस्कृत राजकारणाचा वसा कोण किती पाळतो?, हा संशोधनाचा विषय राहील….!

मात्र, इथे प्रश्न हा आहे की आपल्याला राडा संस्कृती पुढे न्यायची की यशवंतराव-आचार्य अत्रेंची निती पुढे न्यायची…. हे आता राजकारणी मंडळी आणि कार्यकर्त्यांनी ठरवावं……!

(Yashwantrao Chavan Birth Anniversary Acharya Atre had apologized to Yashwantrao Chavan)

हे ही वाचा :

Special story | स्वातंत्र्यलढ्याच्या धगीत प्रेमाचे धुमारे, इंदिरा-फिरोझ यांची अनोखी प्रेमकहाणी