Special story | स्वातंत्र्यलढ्याच्या धगीत प्रेमाचे धुमारे, इंदिरा-फिरोझ यांची अनोखी प्रेमकहाणी

राजकारणातही अशा कित्येक लव्ह स्टोरीज होऊन गेल्यायत ज्या 'अजरामर प्रेमकहाणी' म्हणून नोंदवल्या जाव्यात अशा आहेत. (love Indira Gandhi Feroze Gandhi)

Special story | स्वातंत्र्यलढ्याच्या धगीत प्रेमाचे धुमारे, इंदिरा-फिरोझ यांची अनोखी प्रेमकहाणी
फिरोझ गांधी आणि इंदिरा गांधी
prajwal dhage

|

Sep 12, 2021 | 5:18 PM

मुंबई : राजकारणी म्हटलं तर त्याचं आयुष्य जनसेवा, शह-काटशह, लोकांचा गराडा अशा गोष्टींनी व्यापलेलं असेल असा आपला समज असतो. मात्र, त्यांनाही खासगी आयुष्य आहे, त्यांच्या मनातही कधीतरी वसंत बहरत असावा हे आपण विसरून जातो. राजकारणातही अशा कित्येक लव्ह स्टोरीज होऊन गेल्यायत ज्या ‘अजरामर प्रेमकहाणी’ म्हणून नोंदवल्या जाव्यात अशा आहेत. भारतीय राजकारणातील इंदिरा-फिरोझ यांची (Indira Gandhi and Feroze Gandhi) प्रेमकहाणीसुद्धा त्यापैकीच एक. (love story of Indira Gandhi and Feroze Gandhi)

मूळात इंदिरा गांधी (Indira Gandhi) आणि फिरोझ गांधी ( Feroze Gandhi) यांच्या प्रेमकहाणीला अनेक पदर आहेत. त्यांच्या प्रेमकहाणीत आपुलकी आहे. एकमेकांविषयीची तळमळ आहे. त्याचबरोबर राजकीय महत्वाकांक्षा, रोजच्या जीवनात होत असलेल्या कुचंबनेमुळे नात्याची फरफटसुद्धा इंदिरा-फिरोझच्या प्रेमात आहे. स्वातंत्र्य लढ्याच्या धगीमध्ये देशप्रेमाची आग कित्येकांच्या मनात पेटली होते, अगदी याच काळात इंदिरा-फिरोझच्या मनातही स्वतंत्र्यासोबतच प्रेमाचा अंकूरही बहरत राहिला.

फिरोझ आणि कमला नेहरु

इंदिरा-फिरोजच्या प्रेमकहाणीत स्वतंत्र्याची चळवळ खुप महत्त्वाचा भाग आहे. 1930 साल उजाडलं होतं. स्वातंत्र्यलढ्याचं आंदोलन संपूर्ण देशभर पेटलं होतं. कित्येक तरुण-तरुणी शाळा, कॉलेज सोडून स्वातंत्र्यलढ्यात स्वत:तला झोकून देत होते. नवं रक्त असल्यामुळे साहजीकच फिरोजही स्वातंत्र्यलढ्याकडेआकर्षित झाले. 26 जानेवारी 1930 रोजी काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने पंडित जवाहरलाल यांनी सर्व देशवासीयांना सविनय कायदेभंग चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाने देशभरात ब्रिटिश कायद्याचा भंग केला जाऊ लागला. 6 एप्रिल 1930 रोजी महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह केला आणि मिठाचा कायदा मोडला. त्यानंतर 14 एप्रिलला पंडित नेहरुंना अटक करण्यात आली.

इंदिरा गांधी

फिरोझ गांधींचा आनंदवनात प्रवेश

नेहरुंना अटक केल्यामुळे देशभरात आंदोलन चिघळलं महिला उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभागी होऊ लागल्या. नेहरु यांच्या पत्नी कमला नेहरु यासुद्धा निदर्शनं करु लागल्या. महिलांना संबोधित करु लागल्या. कमला नेहरु यांच्या नेतृत्वाखाली देशातील तरुण मंडळी जमा होऊ लागले. या तरुणांमध्ये फिरोझ गांधीसुद्धा होते. सुरुवातीला बघ्याची भूमिका घेत, फिरोझ फक्त कमला यांच्या आंदोलनांचे निरीक्षण करत. मात्र, पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात कमला जखमी झाल्यानंतर यांचे रक्षण करण्यासाठी फिरोझ धावून गेले आणि येथेच पहिल्यांदा फिरोझ आणि नेहरु घराण्याचा प्रत्यक्ष संबंध आला. फिरोझने कमला यांचे संरक्षण केले. पोलिसांच्या लाठ्या स्वत:च्या अंगावर झेलल्या. फिरोझचा हा स्वभाग कमला यांना आवडला. त्यानंतर आपल्या कुटुंबीयांचा सक्त विरोध असूनही फिरोझ गांधी आनंदभवनात (पूर्वीचे नेहरु यांचे निवासस्थान, मोतीलाल नेहरु यांनी हे घर काँग्रेसला भेट दिल्यानंतर त्याचं नाव स्वराज्यभवन ठेवण्यात आलं) जाऊ लागले. तिथे ते कमला नेहरुंना मदत करु लागले. अशा प्रकारे फिरोझ गांधी यांचा नेहरु घराण्यात प्रवेश झाला.

इंदिरा अजून लहान आहे

इंदिरा आणि फिरोझ यांची पहिली भेट 1931 मध्ये झाली. कुठलातरी फिरोझ नावाचा एक मुलगा माझ्या घरातला सदस्य असल्याप्रमाणे झाला आहे, असं इंदिरेला जाणवू लागलं होतं. कमला म्हणजेच इंदिराच्या आईचा फिरोझवर खूप विश्वास असल्याचंही इंदिरा गांधी यांना जाणवू लागलं. फिरोझ मला बोलण्याचा प्रयत्न करत होता. पण मी त्याच्याकडे लक्ष्य दिलं नव्हतं, त्यावेळी मी फारच बुजरी होते, असं इंदिरेने तिची मैत्रीण पुपुल जयकरला सांगितलेलं आहे. पुपुल जयकर लिखित इंदिरा गांधी या पुस्तकात त्याचे संदर्भ आढळतात.

कमला पहिल्यापासून कृश देहयष्टीच्या होत्या. त्या सतत आजारी असायच्या. या काळात फिरोजने कमला नेहरु यांची चांगली काळजी घेतली. तरीसुद्धा कमला यांची प्रकृती खालावत जात होती. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याकडे संपूर्ण स्वातंत्र्यलढ्याचं नेतृत्व असल्यामुळे त्यांना इंदिरेकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. तर दुसरीकडे इंदिरा वयाने मोठी होऊ लागली होती. इंदेरेचं वाढतं वय लक्षात घेऊन तिची आजी स्वरुपराणी यांनी इंदिरेला स्थळ बघायला सुरुवात केली होती. आजीच्या या स्थळ पाहण्याला तेव्हा इंदिरेनं विरोध केला होता. कमला नेहरुसुद्धा इंदिरेच्या पाठीमागे ठामपणे उभ्या राहत इंदिरा लहान असल्याचे स्वरुपराणी यांना सांगितलं होतं.

इंदिरा गांधी आणि वडील पंडित जवाहरलाल नेहरु

याच काळात फिरोजनेही इंदिरा आपल्याला आवडत असल्याचं कमला यांना सांगितलं. यावेळी मात्र, कुठलाही त्रागा न करता कमला यांनी फिरोजचं म्हणणं ऐकलं. कमला एकाकी असताना, आजारी असताना फिरोजने त्यांच्याशी मैत्री केली होती. फिरोज एक होतकरु, निश्चयी, सामर्थ्याचं प्रतिक असलेला तरुण होता हे कमला यांनी ताडलं होतं. फिरोजची हीच भावना कमला यांनी इंदिरा यांना कळवली. ‘फिरोझला तू आवडतेस’ असं कमला इंदिरेला म्हणाल्या. पण इंदिरा यांना फिरोझमध्ये काही रस नसल्याचं कमला यांना दिसलं आणि इंदिरा अजून खूप लहान आहे, असं उत्तर त्यांनी फिरोझला दिलं.

रविंद्रनाथ टागोर यांच्या शांतीनिकेतनमध्ये 1933 मध्ये असताना इंदिरा सोळा वर्षांची होती. याच काळात फिरोझ गांधी यांनी इंदिरा यांना पत्र लिहून तिला आणखी एकदा लग्नाची मागणी घातली होती. त्याला उत्तर म्हणून मला तुझ्याशी किंवा इतर कोणाशीही लग्न करण्याचा विचार नाही. असं इंदिरा यांनी फिरोझला स्पष्टपणे कळवलं होतं.

पॅरिसमध्ये इंदिरा यांचा फिरोझला होकार

इंदिरांच्या सोळाव्या वर्षीच फिरोझ यांनी तिला लग्नाची मागणी घातली होती. असे असले तरी इंदिरा फिरोझला टाळतच आल्या होत्या. मात्र, पॅरिसमधील साक्रेकरच्या चर्चसमोर फिरोझच्या आयुष्यात इंदिराचा प्रवेश झाला. इंदिरा यांनी फिरोझ यांना पॅरिसमधील साक्रेकरच्या चर्चसमोर होकार दिला. आम्हाला पूर्ण पॅरिस नगरी आनंदाने आणि यौवणाने फुलून गेल्याचा भास होत होता, असं इंदिरा यांनी नंतर 1960 मध्ये आपल्या मैत्रीणीला सांगितलं होतं. दोघांचीही मनं जुळल्यानंतर दोघेही पॅरिसमध्ये मनसोक्त फिरले होते. पुस्तकांच्या दुकानातून त्यांनी फेरफटका मारला होता. दोघांनीही पॅरिसमध्ये कॅफेत बसून गप्पा मागल्या, नाटकं पाहिली होती. हा काळ इंदिरा-फिरोझसाठी गुलाबी काळ होता.

नेहरुंचा लग्नाला विरोध

वडिलांनी देशकार्याला वाहून घेतल्यामुळे तिच्या आईची झालेली परवड इंदिरा यांनी पाहिली होती. त्यामुळे इंदिरा लग्न करण्यावर ठाम होती. तिला लग्न करायचं होतं. तिला मुलंबाळं हवी होती. एखाद्या सामान्य मुलीप्रमाणे इंदिरा यांना मुलांची, नवऱ्याची काळजी घ्यायची होती. त्यांना सगळ्या गर्दीपासून दूर जाऊन संसार थाटण्याची इच्छा होती. ही इच्छा तिने आपले वडील पंडित नेहरु यांना बोलून दाखवली होती. फिरोझ आणि इंदिरा लग्न करण्यावर ठाम होते. त्यांच्या या निर्णयामुळे सगळीकडे चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर ‘इंदिरा आणि फिरोझ यांना लग्न करायचं आहे, असं समजल्यावर मी लगेच त्यांना परवानगी दिली,’ असं नेहरुंनी लिहून ठेवलेलं आढळतं. मात्र, असं असलं तरी मुळात नेहरु इंदिरा-फिरोझच्या लग्नावरुन असमाधानी होते, असं म्हटलं जातं. फिरोझ पारशी समाजातील नेहरुंच्या परिचयाच्या उच्चपदस्थांतील नसून तो वेगळ्याच स्तरातील होता, याचं दु:ख नेहरुंना होतं असं म्हटलं जातं. तशी नोदं पुपुल जयकर यांनी आपल्या पुस्तकात केलेली आहे.

लहानगी इंदिरा गांधी आई कमला नेहरु यांच्यासोबत

दोघांच्या लग्नाबद्दल बोलताना संपूर्ण देश आमच्या लग्नाच्या विरोधात आहे, असं इंदिरा यांनी म्हटलं होतं. दरम्यान, इंदिरा-फिरोझ यांनी 16 मार्च 1942 रोजी रामनवमीच्या दिवशी लग्न केलं होतं. त्यानंतर इंदिरा-फिरोझ काश्मीरला मधूचंद्रासाठी गेले होते. हिमालयाच्या पर्वतराजीत इंदिरा आणि फिरोज यांनी दोन महिने घालवले. तिथे दोघे मनसोक्त भटकले.

दरम्यान कालांतराने राजकीय अहंभाव, फिरोझ यांना मिळाणारे दुय्यमत्व तसेच काहीशा मतभेदामुळे इंदिरा आणि फिरोझ यांच्यातील संबंध बिघडत गेले होते. अनेक वेळा दोघांमध्ये वादही झाल्याची नोंद अनेक लेखकांनी केलेली आहे. फिरोझ-इंदिरा यांच्या बिघडत गेलेल्या संबंधांवर एक स्वतंत्र लेख होईल. मात्र, भारतीय राजकारणातला हा एक प्रेमाचा अध्याय अगदीच रम्य आणि तितकाच खडतर होता. भविष्यात या प्रेमाने अनेक वळणं घेतले होते. त्याबद्दल कधीतरी स्वतंत्र लेख….!

आणखी काही स्पेशल स्टोरी :

Special Story | जिगरबाज IPS ऑफिसर विश्वास नांगरे पाटील यांचं अरेंज ते लव्ह मॅरेज

Special Story | तुम्हाला फिल्म बनवायची आहे? तर ‘या’ गोष्टी कराव्या लागतील

(love story of Indira Gandhi and Feroze Gandhi)

(वरील लेख हा लेखिका पुपुल जयकर लिखित ‘इंदिरा गांधी’ या पुस्तकातील माहितीवर आधारित असून या पुस्तकाचा मराठी अनुवाद अशोक जैन यांनी केला आहे. वरील फोटो त्यांच्याच पुस्तकातून घेतलेले आहेत.)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें