…जेव्हा इंदिरा गांधी आणि राजीव गांधींचीही ऑफर अहमद पटेलांनी नाकारली!

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कार्यकाळापासून अहमद पटेल राजकारणात होते. पटेल आतापर्यंत 8 वेळा खासदार राहिले आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:13 AM, 25 Nov 2020

नवी दिल्ली : काँग्रेसचं पहिल्या फळीतील मोठं नेतृत्व आणि गांधी घराण्याचे विश्वासू, ज्येष्ठ नेते अहमद पटेल (Ahmed Patel) यांचं आज पहाटेच्या सुमारास दु:खद निधन झालं. अहमद पटेल यांना 1 ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण (Corona Positive) झाली होती. 15 नोव्हेंबरला प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात (Medanta Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, शरिरातील अनेक अवयव निकामी झाल्यामुळे आज पहाटे 3.30 वा. त्यांची प्राणज्योत मालवली. ते 71 वर्षांचे होते. अहमद पटेल यांच्या मृत्यूची माहिती त्यांचा मुलगा फैजल पटेल यांनी ट्विटरद्वारे दिली. (Ahmed Patel passes away)

अहमद पटेल हे सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय आणि अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जायचे. सोनिया गांधींना राजकारणात स्थिरावण्यासाठी पटेल यांनी मोठी मदत केली. गांधी कुटुंबासह काँग्रेसविषयी खडान्-खडा माहिती अहमद पटेल यांना होती. तसंच जेव्हा पक्षहिताचा प्रश्न यायचा, तेव्हा सोनिया गांधी अहमद पटेल यांचा सल्ला अंतिम मानायच्या. एकूणच गांधी कुटुंब आणि काँग्रेसमध्ये अहमद पटेल यांना मानाचं स्थान होतं. त्यांच्या जाण्याने काँग्रेसची मोठी हानी झालीये. देशभरात काँग्रेसची पिछेहाट होताना त्यांच्या अकाली जाण्याने काँग्रेस नेत्यांना तसंच कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. ट्विटर, फेसबुकद्वारे नेते, कार्यकर्ते पटेल यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त करत आहेत. (Know all about congress leader Ahmed Pate)

अहमद पटेल माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कार्यकाळापासून राजकारणात होते. पटेल आतापर्यंत 8 वेळा खासदार राहिले आहेत. त्यात संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजे राज्यसभेत 5 तर लोकसभेत 3 वेळा त्यांनी काँग्रेसचं प्रतिनिधित्व केलं. वयाच्या 26 व्या वर्षी त्यांनी गुजरातच्या भरुच जिल्ह्यातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. पटेल यांची ऑगस्ट 2018 मध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. पटेल यांनी इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळापासून काँग्रेसमध्ये संघटनात्मक कमान सांभाळण्याचं मोठं काम केलं आहे.

इंदिरा गांधी आणि राजीव गांधींनी दिलेली ऑफर अहमद पटेलांनी नाकारली!

1977 च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींच्या काळात काँग्रेसला मोठी हार पत्करावी लागली होती. त्यावेळी काँग्रेसच्या मुठभर विजयी उमेदवारांमध्ये अहमद पटेल यांचं नाव होतं. पुढे 1980 मध्ये काँग्रेसनं दमदार पुनरागमन केलं. त्यावेळी इंदिरा गांधी अहमद पटेल यांना मंत्रिमंडळात घेण्यास इच्छुक होत्या. त्यांनी पटेल यांना मंत्रीपदाची ऑफर दिली. परंतु पटेल यांनी आपण संघटना मजबूत करण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगत पक्षासाठी काम करणं पसंत केलं. त्यानंतर राजीव गांधी यांनीही 1984 च्या निवडणुकीनंतर पटेल यांना मंत्रिपदाची ऑफर दिली. तेव्हाही पटेल यांनी ती ऑफर विनम्रपणे नाकारत पक्षासाठी काम करण्यालाच पसंती दिली. राजीव गांधी यांच्या काळात अहमद पटेल यांनी काँग्रेसमध्ये युवकांचं संघटन बांधलं. त्याचा मोठा फायदा पुढे सोनिया गांधी यांना झाला.

पटेल यांचा राजकीय प्रवास

अहमद पटेल यांचा जन्म गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वरमध्ये झाला. 1977 मध्ये त्यांनी आपली पहिली लोकसभा निवडणूक लढली आणि जवळपास 62 हजार मतांनी ते विजयी झाले. 1980 मध्ये त्यांनी 82 हजार मतांनी विजय मिळवला. तर 1984च्या निवडणुकीत त्यांचा तब्बल 1 लाख 23 हजार मतांनी विजय झाला. पुढे 1993 पासून अहमद पटेल राज्यसभेचे खासदार राहिले.

1977 ते 1982 दरम्यान पटेल यांनी गुजरात युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. तर 1983 ते 1984 असं एक वर्ष त्यांनी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचं जॉईंट सेक्रेटरी पद सांभाळलं. पुढे 1985 मध्ये जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान पटेल माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे संसदीय सचिव राहिले. जानेवारी 1986 मध्ये त्यांच्यावर गुजरात काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. 1991 मध्ये नरसिंह राव पंतप्रधान झाल्यानंतर पटेल यांना काँग्रेस वर्किंग कमिटीचा सदस्य बनवण्यात आलं. 1996 मध्ये त्यांना ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचं कोषाध्यक्ष बनवण्यात आलं होतं. पण काही कारणांमुळे त्यांनी ते पद सोडलं. पुढे 2000 साली सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून पटेल यांनी कारकिर्द गाजवली. संघटनेसोबतच पटेल यांनी नागरी उड्डाण मंत्रालय, मनुष्यबळ विकास मंत्रालय, पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे बनवण्यात आलेल्या कमिटीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.

संबंधित बातम्या:

अहमद पटेल यांचं दु:खद निधन, गुजरात युवक काँग्रेसचे अध्यक्ष ते काँग्रेसचे ‘चाणक्य’ पर्यंतचा प्रवास

Ahmed Patel Passes Away | काँग्रेस पक्षाचा आधारस्तंभ हरपला, राहुल गांधी हळहळले

अहमद भाईंनी आयुष्यात अनेक वर्षे समाजसेवा केली; त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, पंतप्रधान मोदींची श्रद्धांजली

(When Ahmed Patel turned down the offers of Indira Gandhi and Rajiv Gandhi too, Know all about congress leader)