Karanji Recipe| करंजी गं करंजी, तुझ्या पोटात सुखाचं सारण, वाचा खुसखुशीत करंजीची सोपी रेसिपी!

| Updated on: Oct 18, 2022 | 1:37 PM

महाराष्ट्रातील पारंपरिक मावा सारण करंजीची रेसिपी पाहुयात...

Karanji Recipe| करंजी गं करंजी, तुझ्या पोटात सुखाचं सारण, वाचा खुसखुशीत करंजीची सोपी रेसिपी!
Image Credit source: social media
Follow us on

सुख-समृद्धी वैभावाचं प्रतीक असलेली करंजी (Karanji) लक्ष्मी पूजनाला नैवेद्यासाठी केली जाते. गरीब असो की श्रीमंत, लेक-जावयाचं कौतुक करायचं असेल किंवा घरात आनंदाचा सण असेल करंजीचा मान वेगळाच. महाराष्ट्रात करंजी (Maharashtrian Karanji) म्हणतात तर इतर राज्यांमध्ये साहित्य, पारीचा आकार वेगळा करत इतरही नावाने करंजी प्रसिद्ध आहे. गुजिया, चंद्रकला या पाकात बुडवून करतात. आतल्या सारणानुसारही असंख्य प्रकार केले जातात. करंजीची पाती रवा किंवा मैद्याची बनवली जाते. सध्या सारणात भाजलेलं बेसन (Besan Karanji) घालून केलेली करंजी चवीने खाल्ली जातेय.  इथे आपण मैद्याची खुसखुशीत आणि पारंपरिक पद्धतीची करंजी कशी करायची हे पाहुयात-

साहित्य-

पारीसाठी- 2 कप मैदा (पाव किलो), 1 टेबलस्पून रवा, पाव कप (50 ग्राम) तूप, 2 टेबलस्पून दूध, पाणी

सारणासाठी – अर्धा कप खवा, अर्धा कप बारीक रवा, अर्धा कप पिठी साखर, पाव कप बारीक किसलेलं सुकं खोबरं, 1 टेबल स्पून बदाम, 1 टेबलस्पून चारोळी, 1 टेबलस्पून काजू, 1 टेबलस्पून मनुका, विलायची पावडर, आणि तूप

कृती

  •  एका परातीत मैदा आणि रवा नीट मिक्स करून घ्यावा.
  •  रव्यामुळे करंजीचं बाहेरचं आवरण खुसखुशीत होतं.
  •  मोहन टाकण्यासाठी तूप हलकेच गरम करून घ्यायचं. पिठात टाकावे.
  •  दोन्ही हातांनी चांगलं मळून घ्यावं. अर्धा कप कोमट पाण्याने पीठाचा गोळा बनवावा. घट्ट. अर्धा तास हा गोळा झाकून ठेवावा.
  •  सारण तयार करण्यासाठी एका कढईत 2 टेबलस्पून तूप गरम करून त्यात रवा सोनेरी रंग येईपर्यंत भाजावा.
  • त्यानंतर त्यात काजू, बदाम, चारोळी टाकून 2-3 मिनिटं भाजावे.
  • हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमधून त्याची जाडसर पूज करुन घ्यावी.
  • सुकं खोबरं हलकं भाजून घ्यावं. रंग बदलू देऊ नये.
  •  खव्याचा गोळा असेल तर तो हाताने आधी कुस्करुन मग 5  मिनिटं मंद आचेवर भाजावा. तो कोरडा झाला की गॅस बंद करावा.
  •  एका मोठ्या भांड्यात खवा, रवा आणि सुकं खोबरं एकत्र करून घ्यावं. त्यात सुक्या मेव्याची पावडर, विलायची पूड, मनुका, पिठीसाखर मिसळून सारण तयार करावे.
  • पारीचा गोळा अर्धा तास भिजल्यानंतर पोळपाटावर पुरीच्या आकाराची पारी लाटून घ्यावी.
  • कडांना दुधाचे किंवा पाण्याचे बोट लावाले. मध्यभागी चमचाभर सारण घालावे.
  • सारण घालताना कडापर्यंत पोहोचू देऊ नये. नंतर ही पारी अर्धचंद्राकृती आकारात दुमडून कडा नीट दाबून बंद कराव्यात
  • करंजीच्या कडांना मुरड घालावी. किंवा कटरच्या सहाय्याने चंद्राकृती आकारात कापून घ्यावी.
  • एकेक करंजी झाली की कापडाखाली झाकून ठेवावी. म्हणजे ती वातड होत नाही.
  • कढईत तेल किंवा तूप टाकून गरम करावे. तेल मध्यम प्रमाणात गरम असताना मंद आचेवर सोनेरी रंगात करंज्या तळून घ्याव्यात.
  • तेल-तूप निथळून झाल्यावर करंज्या हवा बंद डब्यात ठेवाव्यात.