IND vs ENG | एका कसोटी सामन्याचं भारतीय खेळाडूंना लाखांमध्ये मानधन, वन डे, टी-20 चाही लाखांतच आकडा

| Updated on: Feb 28, 2024 | 3:08 PM

टीम इंडिया आणि इंग्लंडमधील मालिका सुरू असताना काही खेळाडू कसोटी खेळणं टाळत असल्याचं समोर आलं आहे. पण तुम्हाला माहित आहे का जगातील श्रीमंत क्रिकेट मंडळ अशी ओळख असलेल्या बीसीसीआय एका सामन्याचे किती लाख रूपये देते? जाणून घ्या.

IND vs ENG | एका कसोटी सामन्याचं भारतीय खेळाडूंना लाखांमध्ये मानधन, वन डे, टी-20 चाही लाखांतच आकडा
Follow us on

मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडची मालिका सुरू असताना एक गोष्ट समोर आली आहे. काही खेळाडू ठरवून कसोटी क्रिकेट खेळणं टाळत आहेत. आयपीएलमध्ये खेळाडू जीव ओतून खेळताना दिसतात. मात्र देशांतर्गत क्रिकेटमधील स्पर्धा किंवा इतर दुसऱ्या टूर्नामेंटकडे खेळाडू कानाडोळा करत आहेत. बीसीसीआय आता कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत दिसत आहे. आयपीएल खेळायची असेल तर त्याआधी देशांतर्गत क्रिकेटचे दोन सामने खेळायला हवेत. खेळाडू का टाळाटाळ करत आहेत माहित नाही. जर मानधनाबद्दल बोलायचं झालं तर बीसीसीआय मजबूत पैसा देतं.

बीसीसीआय कसोटी क्रिकेटमध्ये मानधन म्हणून प्रत्येकी एका सामन्याचे पंधरा लाख देतं. एक कसोटी सामना खेळल्यावर खेळाडू लखपती होत असतील तर अजून काय हवंय. पैशाचा विषय सोडला तर मग कसोटी क्रिकेट टाळाटाळ करण्याचं कोणतंही रास्त कारण दिसत नाही. आघाडीवर इशान किशन याचं नाव आहे. आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेत निवड होऊनही त्याने वैयक्तिक कारण देत तो बाहेर पडला होता.

सर्व फॉरमॅटमधील एका सामन्याचं मानधन

बीसीसीआय एका वन डे सामन्यासाठी खेळाडूंना 6 लाख रूपये आणि टी-20 सामन्यासाठी 3 लाख रूपये देते. बीसीसीआयच्या करारामध्ये चार ग्रेड आहेत. A+, A, B आणि C ग्रेड असे आहेत. A+ श्रेणीतील खेळाडूंना 7 कोटी रुपये, A श्रेणीतील खेळाडूंना 5 कोटी रुपये, B श्रेणीतील खेळाडूंना 3 कोटी रुपये आणि C श्रेणीतील खेळाडूंना 1 कोटी रुपये देण्यात येतात.

इशान किशन बाहेर पडला पण त्यानंतर तो बडोद्यामध्ये हार्दिक पंड्यासोबत सराव करताना दिसला होता. आगामी आयपीएलसाठी खेळाडू सराव करत आहेत. पण देशासाठी खेळायचं म्हटलं की वैयक्तिक कारण देत वेळ काढूपणा करत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. टीम इंडियाचा भावी कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याचे याचे तरी लाड का केले जात आहेत.

वन डे वर्ल्ड कपमधून दुखापत झाली म्हणून तो बाहेर पडला होता. तेव्हापासून त्याने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. आता आयपीएलसाठी तो मैदानात एकदम फिट होऊन उतरेल. याचा अर्थ तुम्हाला आयपीएलमध्ये मजबूत पैसा मिळतो म्हणून तुम्ही आयपीएलसाठी स्वत:ला फिट ठेवता. पण तेच टीम इंडियासाठी खेळायचं म्हटलं की तुमच्याकडे कारणं पुढे करता.

बीसीसीआयनेही आता यावर विचार करत तशी काही नियमावली तयार करायला हवी. बीसीसीआय काही कमी पैसे मोजत नाही. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ अशी ओळख असलेल्या बीसीसीआयचे खेळाडू असं करत असतील तर अवघड आहे.