Yuzvendra Chahal : मला दारूचं व्यसन लागलं, 26 दिवस मी…युझवेंद्र चहलनं सांगितला कठीण काळ
Yuzvendra Chahal : युझवेंद्र चहलनं नुकत्याच एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल सांगितलं आहे.

टीम इंडियाचा लेग-स्पिनर युझवेंद्र चहलनं त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एका कठीण काळाबद्दल एक महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. दारूच्या व्यसनाशी झुंज देत असताना तो २६ दिवस एका पुनर्वसन केंद्रात होता, असं चहलनं सांगितलं. घटस्फोटानंतर चहलच्या मानसिक स्थितीवर खूप परिणाम झाला होता आणि त्याला पॅनिक अटॅकचा त्रास होऊ लागला होता. माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांच्या ‘बाइट अँड बाउल’ या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत युझवेंद्र चहलनं त्याच्या आयुष्यातील कठीण काळ सांगितला आहे.
चहलने सांगितला कठीण काळ
चहलने सांगितलं की, एके वेळी त्याची दारू पिण्याची सवय असह्य झाली होती. त्यानं मदत घेण्याचा निर्णय घेतला आणि २६ दिवस पुनर्वसन केंद्रात घालवले. चहल म्हणाला, ‘मी एका पुनर्वसन केंद्रात गेलो, जिथे मी २६ दिवस राहिलो. आता मला माहित आहे की, माझी दारू पिण्याची सवय कशी सांभाळायची, काय करायचं आणि गोष्टी कशा चालतात. यामुळे माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यातही, मला गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजू लागल्या आहेत. माझ्या भावना थोड्या अधिक स्थिर झाल्या आहेत. म्हणजे, भावना अजूनही आहेत, पण त्या प्रत्येक लहानसहान गोष्टीवरून बाहेर पडत नाहीत. आता मी गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतो.’
चहलनं खुलासा केला की, त्याला दारू पिण्याची सवय आयपीएलच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये लागली. २०११ मध्ये आयपीएलमध्ये सामील झाल्यानंतर, तरुण खेळाडूंमध्ये पार्ट्या करणं सामान्य होतं. पण, त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील समस्या वाढल्यामुळे, त्याची दारू पिण्याची सवयही वाढली.
पॅनिक अटॅकबद्दल बोलताना चहल म्हणाला की, ‘स्ट्रेसमुळे हृदय वेगानं धडधडू लागतं असं वाटतं. पॅनिक अटॅक दरम्यान, माझा चेहरा आक्रसून जायचा. मी बोलूही शकत नव्हतो. कधीकधी, माझे ओठ इतके घट्ट आणि पिळवटून जायचे की माझ्यासोबत काहीतरी चुकीचं घडत आहे हे कोणालाही सहज कळायचं.’
दरम्यान, चहलने डिसेंबर २०२० मध्ये धनश्री वर्माशी लग्न केलं. मार्च २०२५ मध्ये त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर चहलची मानसिक स्थिती चांगली नव्हती. घटस्फोटाबद्दल बोलताना चहल म्हणाला की, ‘याचा माझ्या क्रिकेटवर फारसा परिणाम झाला नाही, पण माझ्या वैयक्तिक आयुष्यावर त्याचा खूप नकारात्मक परिणाम झाला. म्हणून मी ठरवलं की, आता ही गोष्ट मागे टाकण्याची वेळ आली आहे. मी आता आनंदी आहे. मी आयुष्याचा आनंद घेतो, मजा करतो, बाहेर फिरतो, गो-कार्टिंग करतो आणि गोल्फ खेळतो. मी आता पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या स्थितीत आहे.’