Hockey Asia Cup: हिशोब चुकता, भारताचा जपानवर 2-1 ने विजय

| Updated on: May 28, 2022 | 7:43 PM

भारताने सुपर 4 स्टेजच्या पहिल्या मॅचमध्ये जपानला 2-1 ने हरवलं. ग्रुप स्टेजमध्ये जपानने भारताचा 2-5 असा पराभव केला होता.

Hockey Asia Cup: हिशोब चुकता, भारताचा जपानवर 2-1 ने विजय
ind vs jap
Image Credit source: HI
Follow us on

मुंबई: भारतीय हॉकी संघाने (Indian Hockey Team)  सुपर 4 स्टेजच्या पहिल्या मॅचमध्ये जपानला 2-1 ने (IND vs JAP) हरवलं. ग्रुप स्टेजमध्ये जपानने भारताचा 2-5 असा पराभव केला होता. आज विजय मिळवून भारताने लीग स्टेजमधल्या पराभवाचा हिशोब चुकता केला. मंजीत आणि पवन या दोघांनी भारतासाठी दोन गोल केले. मंजीतने सातव्या आणि पवनने 34 व्या मिनिटाला गोल केला. जपानसाठी (Japan) ताकुमा नीवाने 17 व्या मिनिटला गोल केला. जपानला या सामन्यात पाच पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण त्यांना फक्त एका पेनल्टी कॉर्नरचं गोलमध्ये रुपांतर करता आलं. भारताला एकमेव पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण त्यांना त्याचं रुपांतर गोलमध्ये करता आलं नाही.

भारताचा पुढचा सामना मलेशियाविरुद्ध

जपानने लीग स्टेजमध्ये आपले सर्व सामने जिंकले होते. पूल ए मध्ये ते टॉपवर होते. भारत आणि पाकिस्तान दोघांचे चार पॉइंट्स होते. भारताने मोठ्या गोल फरकामुळे सुपर 4 मध्ये प्रवेश केला होता. भारताशिवाय सुपर 4 मध्ये जपान, दक्षिण कोरिया आणि मलेशिया हे संघ आहेत. या संघांचे परस्पराविरुद्ध सामने होतील. टॉपच्या दोन टीम्समध्ये फायनल मॅच होईल. भारताचा पुढचा सामना रविवारी मलेशिया विरुद्ध होईल.

बीरेंद्र लाकडा टीमचा कॅप्टन

टीम इंडियाने या स्पर्धेत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. अनुभवी बीरेंद्र लाकडाकडे टीमची कॅप्टनशिप आहे. सरदार सिंह कोचच्या भूमिकेत आहेत. आशिया कपचा मागचा सीजन 2017 मध्ये झाला होता. त्यावेळी भारताने मलेशियाला नमवून तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली होती.

इंडोनेशियावर मिळवला होता मोठा विजय

भारतीय हॉकी टीमने गुरुवारी दमदार खेळ दाखवला होता. शेवटच्या साखळी सामन्यात इंडोनेशियाला धुळ चारली होती. भारताने तब्बल 16-0 ने इंडोनेशियावर मोठा विजय मिळवला होता. या विजयामुळे भारताने सुपर 4 मध्ये प्रवेश करता आला. या सामन्यात भारताला काहीही करुन विजय आवश्यक होता. तो ही 15-0 अशा गोल फरकाने विजय हवा होता. हे अत्यंत अवघड काम होतं. पण भारताच्या युवा हॉकीपटुंनी जे अशक्य वाटत होतं, ते शक्य करुन दाखवलं. त्यांनी मैदानावर गोलचा अक्षरक्ष: पाऊस पाडला.

पाकिस्तान विरुद्ध पहिला सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर जपानने भारताला 2-5 ने नमवलं होतं. त्यामुळे साखळीतच भारताला गाशा गुंडाळावा लागेल, अशी शक्यता निर्माण झाली होती. पाकिस्तान 2023 वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय करु शकला नाही. जपान, दक्षिण कोरिया आणि मलेशिया हे देश पात्र ठरले. भारत यजमान असल्याने क्वालिफाय झाला आहे.