India vs Sri Lanka : भारताची श्रीलंकेवर 78 धावांनी मात, 2020 ची विजयी सुरुवात

| Updated on: Jan 10, 2020 | 11:28 PM

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2020 ची सुरुवात विजयाने केली (IND vs SL T-20) आहे.

India vs Sri Lanka : भारताची श्रीलंकेवर 78 धावांनी मात, 2020 ची विजयी सुरुवात
Follow us on

पुणे : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2020 ची सुरुवात विजयाने केली (IND vs SL T-20) आहे. भारत विरुद्ध श्रीलंका या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेवर 78 धावांनी मात केली. विशेष म्हणजे या विजयामुळे भारताने ही मालिका 2-0 ने जिंकली. भारताने श्रीलंकेला विजयासाठी 202 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाने सर्व बाद 123 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून नवदिप सैनीन 3 विकेट्स (IND vs SL T-20) घेतल्या.

शार्दूल ठाकूर हा सामान्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला. तर नवदिप सैनी याला मॅन ऑफ सीरिज हा किताब मिळाला.

भारत-श्रीलंका मालिकेतील शेवटचा टी-20 सामना पुण्यात खेळवण्यात आला. या सामन्यात नाणेफेक जिंकत श्रीलंकेचा कर्णधार लसिथ मलिंगाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने श्रीलंकेला विजयासाठी 202 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेने खराब सुरुवात केली. श्रीलंकेचे पहिले चारही फलंदाज फक्त 26 धावा करत माघारी परतले. यानंतर मैदानात उतरलेल्या अँजेल मॅथ्यूज आणि डी-सिल्वा यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. पण ही जोडी माघारी परतल्यानंतर श्रीलंकेचा डाव पुन्हा कोलमडला. भारताकडून नवदीप सैनीने 3, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 2, तर जसप्रीत बुमराहने 1 विकेट घेतला.

भारताकडून श्रीलंकेला 202 धावांचे लक्ष

तर भारताने धडाकेबाज फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. सलामीवीर लोकेश राहुलने 36 चेंडूत 54 धावा केल्या. तर शिखर धवनने 36 चेंडूत 52 धावांची खेळी केली. यानंतर मात्र मैदानात उतरलेल्या भारतीय फलदांजाना मोठी मजल मारता आली नाही. टीम इंडियाने 20 षटकात 6 विकेट गमावत 201 धावा केल्या. सहाव्या क्रमांकावर मैदानात उतरलेल्या विराट कोहलीने 17 चेंडूत 26 धावा केल्या. तर मनीष पांडेने 18 चेंडूत नाबाद 31 धावा करत पाचव्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली.  श्रीलंकेकडून लक्षन संदकनने 3, लहिरु कुमारा आणि डी-सिल्वाने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

पुण्यात खेळवण्यात आलेल्या या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला 78 धावांनी मात दिली. यामुळे नवीन वर्षातील भारतीय संघाचा हा पहिला विजय ठरला. भारत विरुद्ध श्रीलंका हा पहिला सामना पावसामुळे वाया गेला होता. मात्र त्यानंतरच्या दोन्ही सामन्यात भारताने विजयी सलामी (IND vs SL T-20) दिली.