कुस्ती महासंघाची कार्यकारिणी बरखास्त करूनही वाद सुरुच! आता विनेश फोगाटने घेतला मोठा निर्णय

| Updated on: Dec 26, 2023 | 8:36 PM

कुस्ती महासंघातील वाद काही संपताना दिसत नाही. गेल्या वर्षभरापासून हा वाद सुरू आहे. न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले गेले. पुन्हा निवडणुका झाल्या त्यातही बृजभूषण शरण सिंह यांच्या जवळचे संजय सिंह निवडून आले. त्यानंतर पुन्हा एकदा कुस्तीपटूंनी आक्रमक पवित्रा घेतला. क्रीडा मंत्रालयाची यात दखल घ्यावी लागली. आता कुस्तीपटू विनेश फोगाटने मोठं पाऊल उचलत थेट पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे.

कुस्ती महासंघाची कार्यकारिणी बरखास्त करूनही वाद सुरुच! आता विनेश फोगाटने घेतला मोठा निर्णय
कुस्ती कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतरही वाद संपेना! विनेश फोगाटने पंतप्रधानांना पत्र लिहित उचललं असं पाऊल
Follow us on

मुंबई : कुस्ती महासंघाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांसमध्ये लैंगिक छळाचे आरोप असलेले भाजपा खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह निवडून आले. यानंतर खेळाडूंनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला. कोणी कुस्ती सोडण्याचा, तर कोणी पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला. घटनेचं गांभीर्य ओळखून क्रीडामंत्रालयाने तात्काळ कुस्ती महासंघाची कार्यकारिणी बरखास्त केली. तरीही खेळाडूंची राग काही शांत झालेला नाही. साक्षी मलिक आणि बजरंग पुनियानंतर विनेश फोगाटनेही मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुलं पत्र लिहून अर्जुन पुरस्कार आणि खेलरत्न पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. फोगाटने आपल्या पत्रात सर्वच बाजू मांडल्या आहेत. तसेच कशा पद्धतीने महिला कुस्तीपटूंना आयुष्य भोगावं लागतं याचा पाढा वाचला आहे.

“आमचे जीवन फॅन्सी पुस्तकासारखे नाही. गेल्या काही वर्षात महिला कुस्तीपटूंनी खूप काही भोगलं आहे. त्यामुळे किती गुदमरून जगतोय हे कळतं. साक्षीने निवृत्ती घेतली. दुसरीकडे शोषण करण्याऱ्यांनी आपलं वर्चस्व दाखवून दिलं आहे. त्यांनी तर त्याची जाहीरपणे घोषणाचं केली आहे. फक्त पाच मिनिटं काढून त्यांनी मीडियाला दिलेली वक्तव्य ऐका. त्यातूनच सर्वकाही कळून जाईल. महिला कुस्तीपटूंचं वर्णन मंथरा असं केलं आहे. हे अस्वस्थ करणारं आहे. त्यामुळे अनेक महिला कुस्तीपटूंना माघार घ्यावी लागली आहे. हे खूपच भीतीदायक आहे.”, असं विनेश फोगाटने लिहिलं आहे.

“ही घटना विसरणं खरंच सोपं नाही. सर मी जेव्हा तुम्हाला भेटले तेव्हा हे सर्व सांगितलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही न्यायासाठी लढत आहोत. आमची काळजी कोणीही घेत नाही. आमच्या पदकांची किंमत 15 रुपये असल्याचं बोललं जातं. पण ही पदकं आम्हाला प्राणापेक्षा प्रिय आहेत. जेव्हा न्यायासाठी आवाज उठवतो तेव्हा देशद्रोही संबोधलं जातं. मी देशद्रोही आहे का? तुम्हाला काय वाटतं.”, असंही विनेशने आपल्या पत्रात लिहिलं आहे.

“बजरंगने कोणत्या परिस्थितीत पद्मश्री परत करण्याचा निर्णय घेतला असेल माहिती नाही. पण त्याचा फोटो पाहून आतून गुदमरल्यासारखं झालं. मी पुरस्कारांचा तिरस्कार करू लागले. जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हा आईने मिठाई वाटली. तेव्हा तिने माझ्या नातेवाईकांना विनेश टीव्हीवर आली आहे. विनेश पुरस्कार घेताना किती सुंदर दिसते. पण आता टीव्हीवर आमची अशी स्थिती पाहून त्यांना काय वाटत असेल, याचा विचार करून मला भीती वाटते. कोणत्याही आईला आपल्या मुलीची अशी अवस्था व्हावी असं वाटत नाही. मी माझा मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करते. कारण सन्मानाने जगण्याच्या मार्गात पुरस्काराचं ओझं राहू नये.”, असं विनेश फोगाटने शेवटी म्हंटलं आहे.