#HappyBirthdaySachin : ‘कोरोना’ला फटकावण्याचा संदेश, सचिन तेंडुलकरच्या ‘जबरा फॅन’ची कलाकृती

| Updated on: Apr 24, 2020 | 5:00 PM

ज्याप्रमाणे सचिन क्रिकेटमध्ये फटके लगावून बॉलला झोडपून काढतो, त्याच आशयाची 'लढूया कोरोना विरुद्ध' असा संदेश देणारी कलाकृती अभिषेक साटम या तरुणाने तयार केली आहे. (Sachin Tendulkar Birthday Special Fight against Corona artwork)

#HappyBirthdaySachin : कोरोनाला फटकावण्याचा संदेश, सचिन तेंडुलकरच्या जबरा फॅनची कलाकृती
Follow us on

मुंबई : क्रिकेटला धर्म आणि ‘विक्रमादित्य’ सचिन तेंडुलकरला ‘देव’ मानणाऱ्या क्रिकेट भक्तांसाठी आजचा दिवस सणावारापेक्षा कमी नाही. 24 एप्रिल हा दिवस प्रत्येक ‘सचिन’प्रेमीच्या काळजावर कोरुन ठेवलेला. सचिनने आज वयाची 47 वर्ष पूर्ण केली. ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर सचिनने आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे, तरी जगभरातील क्रीडारसिकांनी आपापल्या परीने हा दिवस साजरा केला आहे. (Sachin Tendulkar Birthday Special Fight against Corona artwork)

मुंबईत राहणारा सचिनचा ‘जबरा फॅन’ अभिषेक साटम हा तरुण दरवर्षी सचिनच्या वाढदिवशी त्याला अनोखी सलामी देतो. यावर्षी संपूर्ण जगावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे सचिनच्या वाढदिवसाला आपल्याला दरवर्षी प्रमाणे मोठं आर्ट वर्क करता येणार नाही, याची खंत अभिषेकला होती. थोडा विचार करुन त्याने घरातच काहीतरी आयडिया लढवण्याचा ध्यास घेतला. यासाठी त्याला साथ लाभली आबासाहेब शेवाळे आणि प्रतीक घुसळे या मित्रांची.

‘लढूया कोरोना विरुद्ध’

घरात ज्या वस्तू आहेत त्या वापरुन कलाकृती सादर करायची, असं त्यांचं ठरलं. कलेची आवड असल्याने घरात वेगवेगळ्या रंगाचे कागद होतेच. मग अभिषेकने ठरवलं की अशी कलाकृती करुया, ज्या मधून ‘कोरोना’बद्दल संदेश देता येईल.

अभिषेकने निवडलेला फोटो सध्याच्या परिस्थितीशी मिळता जुळता आहे. ज्याप्रमाणे सचिन क्रिकेटमध्ये फटके लगावून बॉलला झोडपून काढतो, तसंच आता सगळ्यांनी कोरोनाला फटकावण्याची गरज आहे. याच आशयाचं ‘लढूया कोरोना विरुद्ध’ असा संदेश देणारं 5.6 x 3 फुटांचं चित्र त्याने तयार केलं.

या चित्रात अर्ध्या इंचाच्या आकाराचे चौकोन वापरण्यात आले आहेत. त्यासाठी काळा, निळा, पिवळा, पांढरा, हिरवा, लाल, पोपटी या रंगाच्या चौकोनांचा वापर केला आहे. एकूण 9 हजार 637 चौकोनांचा वापर करुन 5.6 x 3 फुटांची कलाकृती अभिषेकने 15 तासात साकारली.

पाहा व्हिडिओ :


अभिषेक गेली आठ वर्ष समुद्र विज्ञान विषयावर संशोधन करत आहे. त्याच विषयात पीएचडीचं शिक्षणही सुरु आहे. सध्या तो मुंबईतील ‘राणीचा बाग’ जिजामाता उद्यान येथे जीवशास्त्रज्ञ म्हणून काम करतो. वडील कलाकार असल्यामुळे कलेची आवड त्याला उपजतच होती. लालबागसारख्या भागात लहानाचा मोठा झाल्यामुळे ती आवड वाढत गेली आणि बहरतही गेली. (Sachin Tendulkar Birthday Special Fight against Corona artwork)

सचिनचा ‘जबरा फॅन’

गेली 18 वर्ष तो सचिन तेंडुलकरबद्दल छापून आलेली वर्तमानपत्रातील कात्रणे, मासिक, पुस्तक, गोळा करत आहे. सचिनबद्दल जे काही मिळेल त्याचा संग्रह करण्याचा छंद त्याला लहानपणीच लागला. सचिनने क्रिकेटमध्ये जशी मेहनत घेतली, तीच आपण आपल्या करिअरमध्ये घेतली तर आपण आपल्या क्षेत्रातील सचिन तेंडुलकर होऊ, असं अभिषेकला वाटतं.

2017 मध्ये सचिनच्या 44 व्या वाढदिवसाला आपल्या कलेतून काहीतरी भेट द्यावी म्हणून 44 X 24 फुटांची रांगोळी त्याने काढली. त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड USA इथे झाली. 2018 च्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड च्या टॉप 100 मध्ये त्याच्या रेकॉर्डची नोंद झाली. या कलाकृतीची दाखल खुद्द सचिन तेंडुलकरने घेतली. याचा व्हिडिओ आणि फोटो सचिनने 100MB या आपल्या अॅपवर अपलोड केले आहेत.