महाराष्ट्रासह देशातून गाढवं गेली कुठे? चिनी लोकांना आवडी गाढवं, मोठ्या प्रमाणात तस्करीचा संशय, कशासाठी वापर करतायत?

| Updated on: Dec 23, 2021 | 8:36 AM

चीनचा आता आपल्या गाढवांवरही डोळा आहे की काय असा संशय व्यक्त करायला जागा आहे. ब्रुक इंडियानं केलेल्या पहाणीत गाढवांबद्दलची ही गंभीर बाब उघड झालीय. तसा अहवालही ब्रुक इंडियानं भारत सरकारला सादर केलाय.

महाराष्ट्रासह देशातून गाढवं गेली कुठे? चिनी लोकांना आवडी गाढवं, मोठ्या प्रमाणात तस्करीचा संशय, कशासाठी वापर करतायत?
भारतीय गाढवांची चीनला तस्करी होत असल्याचा संशय-फोटो प्रातिनिधिक
Follow us on

गेल्या काही काळात महाराष्ट्रासह देशात गाढवांची संख्या झपाट्यानं कमी होत असल्याचं उघड झालंय. गाढवांची कत्तल करुन लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी त्याचं मास खाल्लं जात असल्याच्याही काही घटना समोर आल्या होत्या. ह्या घटना विशेषत: आंध्र प्रदेशातल्या होत्या. पण गाढवांची आता तस्करी केली जात असल्याचा संशयही व्यक्त केला जातोय आणि विशेष म्हणजे ही तस्करी चीनला होत असल्याची दाट शंका आहे. म्हणजेच जो चीन भारताविरोधात सीमेवर (Donkey Smuggling in India) कुरापती करतोय त्याच चीनचा आता आपल्या गाढवांवरही डोळा आहे की काय असा संशय व्यक्त करायला जागा आहे. ब्रुक इंडियानं केलेल्या पहाणीत गाढवांबद्दलची ही गंभीर बाब उघड झालीय. तसा अहवालही ब्रुक इंडियानं (Brook India) भारत सरकारला सादर केलाय.

का होतेय चीनला तस्करी?
चीन हा एक एवढा मोठा देश आहे की तिथं कशाची तस्करी होईल भरोसा नाही. ज्या किड्या मुंग्यांकडे बघवतही नाही ते खाण्याचे चीनमध्ये उत्सव भरवले जातात. तिथल्या कुत्र्याच्या मास खाण्याचा बाजार तर जगप्रसिद्ध आहे. त्यासाठी कुत्र्यांच्या केल्या जाणाऱ्या कत्तलीवरही वेळोवेळी टीका झालीय पण त्याचा चीनला काही फरक पडताना दिसत नाही. कोरोनासारख्या रोगांची उत्पत्तीही चीनच्या अशाच कुरापतींनी झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आता त्यातच चीनमध्ये मोठ्या प्रमाणात गाढव तस्करी (China Donkey Smuggling) होतेय हे उघड झालंय. म्हणजेच भारतातून जी गाढवं झपाट्यानं कमी होतायत, त्याला चीनमध्ये होणाऱ्या गाढवांची तस्करी हे मुख्य कारण असल्याचा संशय ब्रुक इंडियाच्या अहवालात व्यक्त करण्यात आलाय. ब्रुक इंडिया ही घोडे, गाढवांच्या संवर्धनासाठी, हक्कासाठी लढणारी संघटना आहे. याच ब्रुक इंडियानं भारतातल्या गाढवांच्या कमी होणाऱ्या संख्येवर अहवाल तयार केलाय. तो भारत सरकारला सादर करण्यात आलाय. चीनमध्ये विविध रोगांवर उपाय म्हणून जी पारंपारीक तशीच आधूनिक औषधं वापरली जातात, त्यात गाढवाच्या कातडीचा वापर केला जातो. त्यासाठीच त्यांची कातडी तसच जीवंत गाढवांची चीनला तस्करी होत असल्याचा संशय आहे.

कोणत्या राज्यातून जास्त गाढवगळती?
आपल्या देशात सर्वाधिक गाढवांची संख्या ही उत्तर प्रदेशात आहे. त्यानंतर गुजरात, राजस्थान, बिहार, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र ह्या राज्यांचा नंबर लागतो. उत्तर प्रदेशची लोकसंख्या आणि आकारमान पहाता तिथं गाढवं जास्त असणार यात शंका नाही. पण तस्करीही त्यामुळेच तिथून जास्त असल्याची माहिती उघड झालीय. त्यानंतर इतर राज्यांचा नंबर लागतो.  2012 सालच्या तुलनेत 61.23 टक्के एवढी गाढवांच्या संख्या कमी झाल्याचं अहवालात नमुद करण्यात आलंय. 2019 ला देशात पशुगणना करण्यात आली. त्यात देशात 0.12 दशलक्ष एवढेच गाढवं शिल्लक आहेत. सर्वाधिक गाढवं हे उत्तरप्रदेशातून नामशेष झालीयत, त्याची टक्केवारी 71.72 एवढी आहे. त्या खालोखाल गुजरात, राजस्थान आहेत. तिथून अनुक्रमे 70.94 आणि 71.31 टक्के एवढी गाढवं कमी झालीत. सर्वात कमी गाढवं गायब झालीयत ती महाराष्ट्रातून. इथली घट होण्याची आकडेवारी 39.69 टक्के एवढी आहे. महाराष्ट्रानंतर आंध्रातून 53 टक्के गाढवं कमी झालीयत तर बिहारमध्ये घट झालेली टक्केवारी 47.31 एवढी आहे.

लैगिंक क्षमता वाढवण्यासाठी गाढवाचं मांस
आंध्र प्रदेश, तेलंगणातून मोठ्या प्रमाणात गाढवांच्या कत्तली केल्या जात असल्याच्या घटना काही दिवसांपूर्वी उघड झाल्या होत्या. एक मोठा वर्ग लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी गाढवाचं मांस खात असल्याचही लक्षात आलं होतं. गाढवाचं मांस (Donkey meat for power) हे प्रती किलो 600 रुपये इतक्या किंमतीचं असल्याचा अंदाज आहे. अर्थातच हे सगळं उघड उघड केलं जात नाही. लपून छपून गाढवाची कत्तल केली जाते आणि नंतर त्याची मांस विक्री. त्यामुळे त्याचा नक्की भाव कळणं कठिण आहे. गाढवं जी कमी झालीयत, त्यासाठीचा मुख्य आधार त्यांची, तसच त्यांच्या अवयवांची होत असलेली तस्करी हेच रिपोर्टमध्ये सांगितलं गेलंय. एका गाढवाची किंमत ही 10 ते 20 हजाराच्या दरम्यान असते. महाराष्ट्रात आजही काही जत्रांमध्ये गाढवांचा बाजार भरतो, त्यांच्या धावण्याच्या शर्यतीही लावल्या जातात. गाढवांचा वापर आधी ओझे वाहून नेण्यासाठी प्रामुख्यानं केला जायचा. पण आता आधूनिक साधनं उपलब्ध झाल्यानं तसे ते निरोपयोगी झालीयत. काही ठिकाणी अजूनही बांधकामाचं साहित्य वाहून नेण्यासाठी त्यांचा वापर होतो. पण काळाच्या ओघात आता ह्याच गाढवांची तस्करी होतेय. विशेष म्हणजे चीनमध्ये फक्त भारतातूनच नाही तर आफ्रिकन देशातूनही तस्करी होते. त्यासाठीही ब्रूक इंडिया काम करतंय. त्यांच्या साईटवर जाऊन त्याबद्दलची तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता.

हे सुद्धा वाचा:

धक्कादायक! तुझ्यावर कोणीतरी जादूटोणा केला म्हणत पतीने पत्नीला भोसकले; घटनेनंतर आरोपी फरार

Nanded : तिन्ही सांजेला सांजवातीने नदी उत्सवाची सांगता, त्रिकुट येथे रिव्हर्स ऑफ इंडिया अंतर्गत उपक्रमाचा समारोप!

Happy Birthday Ravi Dubey | मालिकेच्या सेटवर भेट झाली अन् अभिनेत्रीच्या प्रेमातच पडला! वाचा रवी दुबेचे लव्हस्टोरी…