आजपासून ‘या’ बँकेचे कर्ज झाले महाग; ईएमआयमध्येही होणार वाढ

| Updated on: May 10, 2022 | 12:28 PM

भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केल्याने अनेक बँकांनी आपल्या कर्जावरील व्याज दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांची कर्ज महाग झाल्याने कर्जाचा हफ्ता देखील वाढला आहे.

आजपासून या बँकेचे कर्ज झाले महाग; ईएमआयमध्येही होणार वाढ
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

मुंबई : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयने (RBI) काही दिवसांपूर्वीच रेपो रेटमध्ये (Repo rate) वाढ केली आहे. आरबीआयने रेपो रेट 0.40 टक्क्यांनी वाढवून 4.40 टक्के एवढा केला आहे. दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्याज दरात वाढ करताच अनेक बँकांनी आपल्या व्याज दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी एचडीएफसी बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि करून वैश्य बँक यांनी आपल्या व्याज दरात वाढ केली, तर आजापासून इंडियन ओव्हरसीज बँकेचे (Indian Overseas Bank) कर्ज महाग झाले आहे. बँकेने आपल्या कर्जाचा व्याज दर 7.25 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. कर्ज महाग झाल्यामुळे याचा अतिरिक्त बोजा हा ग्राहकांवर पडणार आहे. कर्जावरील व्याज दर वाढल्याने ईएमआयमध्ये देखील वाढ होणार आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेप्रमाणेच खासगी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने देखील कर्जावरील व्याज दर वाढवला आहे.

पीएबीचे लोन झाले महाग

सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने देखील आपल्या कर्जावरील व्याज दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने कर्जावरील व्याज दरात 0.40 टक्क्यांची वाढ केली आहे. पूर्वी बँकेचा व्याज दर 6.50 टक्के इतका होता. आता तो 0.40 टक्क्यांनी वाढून 6.90 टक्के इतका झाला आहे. नवे दर येत्या एक जूनपासून लागू होणार असल्याची माहिती बँकेच्या वतीने देण्यात आली आहे. कॅनरा बँकेने देखील आपल्या कर्जावरील व्याज दरात वाढ केली असून, बँकेने आपला व्याज दर 7.30 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. कॅनरा बँकेचे नवे व्याज दर सात मे लागू झाले आहेत.

ईएमआयमध्ये वाढ

आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या कर्जावरील व्याज दर वाढवले आहेत, त्यामुळे आता याचा फटका हा ग्राहकांना बसणार आहे. ईएमआयमध्ये वाढ होणार आहे. मात्र जरी ईएमआयमध्ये वाढ होणार असली तरी ज्या ग्राहकांची बँकेत एफडी आहे, अशा ग्राहकांना फायदा होणार आहे. अनेक बँकांनी रेपो रेट दरवाढीनंतर एफडीच्या व्याज दरात देखील वाढ केली आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांची बँकेत एफडी आहे अशा ग्राहकांना आला आपल्या गुंतवणुकीवर अधिक व्याज मिळणार आहे. बँकांकडून वेगवेगळ्या कालावधिंच्या एफडींवर वेगवेगळ्या रेटने व्याज वाढवण्यात आले आहे.