Chilly : तेलंगणाच्या बाजारपेठेत गडचिरोलीतील मिरचीचा ‘ठसका’, उत्पादनात घट होऊन बळीराजा समाधानी

| Updated on: May 31, 2022 | 8:02 AM

उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांचे एक ना अनेक प्रयोग सुरु असतात. असे असले अर्थकारण हे बाजारपेठेवर अवलंबून आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, अहेरी,भामरागड, मुलचेरा, व एटापल्ली तालुक्यात मिरचीचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे योग्य अशी बाजारपेठे न मिळाल्याने दरात सुधारणा झाली नव्हती.

Chilly : तेलंगणाच्या बाजारपेठेत गडचिरोलीतील मिरचीचा ठसका, उत्पादनात घट होऊन बळीराजा समाधानी
Follow us on

गडचिरोली : उत्पादनात कमी-जास्तपणा झाला तरी शेतकऱ्यांचे अर्थकारण हे तसे बाजारपेठेतील दरावरच अवलंबून असते. यापूर्वी कापसाबाबत याचा प्रत्यय आला आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे कापूस उत्पादनात कमालीची घसरण झाली पण विक्रमी दरामुळे शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन मिळाले. आता (Chilly) मिरचीबाबतही असेच घडताना पाहवयास मिळत आहे. सध्या (Gadchiroli) गडचिरोलीतील मिरचीला तेलंगणा आणि (Nagpur Market) नागपूरच्या बाजारपेठेत चांगला दर मिळत असल्याने उत्पादन घटूनही शेतकऱ्यांना वाढीव दरामुळे दिलासा आहे. वातावरणातील बदलाचा परिणाम केवळ मुख्य पिकांवरच झाला असे नाही तर मिरचीचेही उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. असे असताना तेलंगणा बाजारपेठेत 20 हजार रुपये क्विंटल असा दर मिळत आहे.

दोन वर्षातील विक्रमी दर

उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांचे एक ना अनेक प्रयोग सुरु असतात. असे असले अर्थकारण हे बाजारपेठेवर अवलंबून आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, अहेरी,भामरागड, मुलचेरा, व एटापल्ली तालुक्यात मिरचीचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे योग्य अशी बाजारपेठे न मिळाल्याने दरात सुधारणा झाली नव्हती. पण यंदा चित्र बदलत आहे. नागपूर आणि तेलंगणा बाजारपेठेत मिरचीला 200 रुपये किलो असा दर मिळत आहे. शिवाय आवक अशीच घटली तर भविष्यात दरात आणखीन वाढ होईल असा अंदाज आहे.

शेतकऱ्यांना दोन बाजारपेठाचा आधार

उत्पादनानंतर सर्वात महत्वाची असते ती बाजारपेठ. गडचिरोली जिल्ह्यातील एक नव्हे तर दोन बाजारपेठाचा आधार मिळत आहे. यामध्ये नागपूर आणि तेलंगणाच्या बाजारपेठाचा समावेश आहे. स्थानिक बाजारपेठेत 17 हजार रुपये क्विंटल असा दर मिळत आहे तर तेलंगणामध्ये याच मिरचीला 20 हजार रुपये क्विंटल दर आहे. त्यामुळे उत्पादन घटले तरी वाढीव दराने शेतकऱ्यांचे उत्पादनात झालेले नुकसान भरुन काढले आहे.

हे सुद्धा वाचा

हंगाम अंतिम टप्प्यात, तिसरी तोड सुरु

गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागामध्ये विशेषत: धान आणि कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यंदा पीक पध्दतीमध्ये बदल करुन शेतकऱ्यांनी मिरची लागवडीचा प्रयोग केला. रोगराईमुळे उत्पादनात घट झाली असली तरी वाढत्या दराचा दिलासा आहे. आतापर्यंत मिरचीच्या दोन तोड झाले असले तरी तिसरा तोड हा बाकी आहे. पहिल्या दोन्हीही तोडणीतील मिरचीला 20 हजार रुपये क्विंटल असाच दर मिळाला आहे. आता तिसऱ्या तोडणीतील मिरचीला यापेक्षा अधिकचा दर मिळेल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे.