Sugarcane fire : तोडणीला आलेला ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी, 39 शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख-रांगोळी

| Updated on: Feb 07, 2022 | 12:25 PM

भोकरदन तालुक्यातील पळसखेडा शिवारातील तब्बल 65 एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. ही घटना देखील शॉर्टसर्किटमुळेच झाल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा घटनांमध्ये वाढ झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

Sugarcane fire : तोडणीला आलेला ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी, 39 शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख-रांगोळी
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात शार्टसर्किटमुळे तब्बल 65 एकरातील ऊस जळाला आहे.
Follow us on

जालना : मराठवाड्यातही ऊस गळीत हंगाम जोमात सुरु आहे. शिवाय या सर्वात मोठ्या (Cash Crop) नगदी पिकाची मोठी लागवड यंदा मराठवाड्यात झाली आहे. नैसर्गिक संकटाचा केवळ ऊसावर परिणाम झाला नाही पण गेल्या 15 दिवसांमध्ये ऊसाच्या फडाला आग ह्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आठ दिवसांपूर्वीच लातूर शहरा लगतच्या भिसे वाघोली येथील घटेनत 50 एकरातील ऊस जळाला होता. तर रविवारी (Jalna) जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पळसखेडा शिवारातील तब्बल (Sugarcane fire) 65 एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. ही घटना देखील शॉर्टसर्किटमुळेच झाल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा घटनांमध्ये वाढ झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. येथील ऊस हा तोडणीला आला होता. काही दिवसांमध्येच तोडणीही होणार होती पण शॉर्टसर्किटमुळे 39 शेतकऱ्यांचा 65 एकरातील ऊस जळाला आहे. यामध्ये वावरातील इतर साहित्यही जळाले आहे.

अशी मिळवा आर्थिक मदत

महावितरणच्या गलथान कारभारामुळे ऊस जळाला असेल तर शेतकऱ्याला महावितरणच्या विभागीय कार्यालयात संबंधित कागदपत्रे ही अर्जासोबत जमा करावी लागतात. यामध्ये मागील तीन वर्षाचा सातबारा उतारा, महसूल विभागाचा आणि पोलीसांनी केलेला पंचनामा, किती क्षेत्रावरील ऊस जळाला आहे त्याचे फोटो, ऊसाबरोबरच त्या क्षेत्रातील ठिंबक किंवा पाणीपुरवठा करणारे इतर साहित्य हे या घटनेत जळाले असेल तर त्याचे बील. तर साखर कारखान्यांची मागच्या तीन वर्षांची बीलंही अर्जासोबत जोडावी लागणार आहेत. शिवाय किती एकरावरचे नुकसान झाले आहे यासंदर्भात कृषी विभागाचा अहवाल. यामध्ये अंदाजे किती रुपयांपर्यंतचे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे याचा उल्लेख असणे गरजेचे आहे. ही सर्व कागदपत्रे शेतकऱ्यांना अर्जासोबत जोडून दाखल करावी लागणार आहेत.

पोषक वातावरणामुळे वाढले क्षेत्र

भोकरदन तालुक्यात रब्बी हंगामात ज्वारी, गहू आणि खरिपात सोयाबीन हेच मुख्य आहेत. मात्र, यंदा पाण्याची उपलब्धता आणि पोषक वातावरणामुळे शेतकऱ्यांनी सर्वात मोठे असलेल्या नगदी पिकाची लागवड केली होती. शिवाय निसर्गाच्या लहरीपणाचा केवळ ऊसावर परिणाम झाला नव्हता. आता तोडणी काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने उत्पन्न पदरी पडेल असा आशावाद शेतकऱ्यांना होता. मात्र, शॉर्टसर्किटमुळे क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले आहे. अंतिम टप्प्यात ऊस असल्याने पाचरटही वाळले असल्याने ही आग पसरली यामध्ये 39 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांचे प्रयत्नही व्यर्थ

पळसखेडा शिवारात ऐन सकाळच्या प्रहरीच आग लागल्याने तो विझवण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकऱ्यांनी मात्र, वाळलेले पाचरट आणि वाऱ्यामुळे ही आग पसरली. दरम्यानच्या काळात ग्रामस्थांनी अग्निशमन दलाशी संपर्क केला मात्र, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सकाळी लागलेली आग ही दुपारी 3 च्या दरम्यान आटोक्यात आली. तोपर्यंत उभ्या ऊसासह इतर साहित्याची राखरांगोळी झाली होती.

संबंधित बातम्या :

Soybean Crop: उन्हाळी सोयाबीनने मिटणार खरिपातला प्रश्न, शेतकऱ्यांना घ्यावी लागणार ‘ही’ काळजी..!

आता सातबाराच बंद, राज्य सरकारचा काय आहे निर्णय? वाचा सविस्तर

Photo: रब्बी पिकांनी शिवार बहरला, पोषक वातावरणामुळे उत्पादन वाढीची अपेक्षा