फक्त 6 लाखात घरी आणा Tesla ची ही कार, भारतीयांसाठी खास ऑफर
टेस्ला कंपनीने भारतीयांसाठी खास ऑफर दिली आहे. या ऑफरअंतर्गत टेस्ला Model Y चा प्रभावी मासिक मालकी खर्च 19,990 रुपये असल्याचा कंपनीचा दावा आहे.

भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेस्लाने तीन दिवसांच्या खास ऑफरची घोषणा केली आहे. कंपनीचा ‘स्विच अँड सेव्ह कार्निव्हल’ हा उपक्रम 23 ते 25 ऑक्टोबरदरम्यान सुरू आहे. या ऑफरअंतर्गत टेस्ला Model Y चा प्रभावी मासिक मालकी खर्च 19,990 रुपये असल्याचा कंपनीचा दावा आहे. मात्र, ही रक्कम प्रत्यक्ष मासिक ईएमआय नसून इंधन आणि देखभालीवरील संभाव्य बचत वजा केल्यानंतर मोजलेली आहे.
या ऑफरनुसार टेस्ला Model Y खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 6 लाख रुपयांचे डाउन पेमेंट करावे लागेल. त्यानंतर 8.5 टक्के वार्षिक व्याजदराने सात वर्षांसाठी दरमहा 39,990 रुपयांचा ईएमआय असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
टेस्लाच्या गणितानुसार, पेट्रोल किंवा डिझेल कारच्या तुलनेत इंधन आणि देखभालीवर दरमहा सुमारे 20 हजार रुपयांची बचत होऊ शकते. ही बचत ईएमआयमधून वजा केल्यानंतर प्रभावी मासिक खर्च 19,990 रुपये असल्याचे कंपनी सांगते.
महत्त्वाचे- ग्राहकाला प्रत्यक्षात दरमहा 39,990 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. 19,990 रुपये ही बचत गृहीत धरून मोजलेली प्रभावी रक्कम आहे; ती प्रत्यक्ष हप्ता नाही.
20 हजार रुपयांच्या बचतीचे गणित काय?
टेस्लाने ही बचत मोजण्यासाठी काही गृहीतके वापरली आहेत. इलेक्ट्रिक कारसाठी 100 किलोमीटर प्रवासाला 14.3 kWh वीज लागते आणि विजेचा दर प्रति युनिट 7 रुपये असल्याचे गृहीत धरले आहे. दुसरीकडे, पेट्रोल किंवा डिझेल कारचे सरासरी मायलेज 8 किलोमीटर प्रति लिटर आणि देखभालीचा खर्च प्रति किलोमीटर 2 रुपये असल्याचे गणित मांडले आहे.
या तुलनेत पारंपरिक इंधनावरील खर्च आणि देखभालीचा खर्च वाचू शकतो असा कंपनीचा दावा आहे. मात्र, प्रत्यक्ष बचत वाहनाचा वापर, इंधनाचे दर, चार्जिंगचा खर्च, प्रवासाचे अंतर आणि देखभालीच्या गरजांनुसार बदलू शकते. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाचा मासिक खर्च 19,990 रुपयेच असेल असे नाही.
Tesla Model Y आणि Model Y L ची किंमत किती?
भारतीय बाजारपेठेत टेस्ला Model Y ची एक्स-शोरूम किंमत 50.89 लाख रुपयांपासून सुरू होते. या मॉडेलची दावा केलेली रेंज 500 किलोमीटरपर्यंत आहे. तर सहा आसनी Model Y L ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 61.99 लाख रुपये असून, कंपनीने या मॉडेलसाठी 681 किलोमीटरपर्यंतची रेंज सांगितली आहे.