भारतात 343 किमी रेंज देणारी इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, फीचर्सही जबरदस्त, किंमत किती?

Ultraviolette X-47 Venom इलेक्ट्रिक बाइक भारतात लॉन्च. एका चार्जमध्ये धावणार 343 किमी. फीचर्स देखील सर्वात जबरदस्त. किती आहे या बाईकची किंमत?

भारतात 343 किमी रेंज देणारी इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, फीचर्सही जबरदस्त, किंमत किती?
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 24, 2026 | 2:42 PM

इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी Ultraviolette ने भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल X-47 Venom लॉन्च केली आहे. या बाइकची सुरुवातीची किंमत 2.65 लाख रुपये ठेवण्यात आली असून, ही किंमत पहिल्या 5000 ग्राहकांसाठी लागू असेल. त्यानंतर बाइकची किंमत 3 लाख रुपये होईल. कंपनीने 22 ऑक्टोबर 2026 पासून बुकिंग सुरू केली असून, नोव्हेंबर 2026 पासून डिलिव्हरी सुरू होण्याची अपेक्षा आहे.

X-47 Venom ही कंपनीच्या नवीन VX-100 प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेली पहिली मोटरसायकल आहे. या प्लॅटफॉर्ममध्ये बॅटरी, मोटर आणि कंट्रोलरमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. बाइकचे वजन 180 किलो असून, मागील जनरेशनच्या तुलनेत ती 20 किलोपर्यंत हलकी असल्याचा कंपनीचा दावा आहे.

Loading...

या इलेक्ट्रिक बाइकमध्ये 7 kWh आणि 11 kWh असे दोन बॅटरी पर्याय मिळतात. 11 kWh बॅटरी असलेल्या मॉडेलची IDC प्रमाणित रेंज 343 किलोमीटरपर्यंत आहे. 7 kWh मॉडेलची रेंज कंपनीने अद्याप जाहीर केलेली नाही.

बाइकमध्ये 30 kW म्हणजेच सुमारे 40 bhp क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, ही बाइक अवघ्या 2.7 सेकंदांत 0 ते 60 किमी प्रतितास आणि 5.9 सेकंदांत 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठू शकते. तिचा कमाल वेग 155 किमी प्रतितास आहे.

रडार तंत्रज्ञानामुळे मिळणार अतिरिक्त सुरक्षा

या बाइकचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कंपनीची Hypersense सुरक्षा प्रणाली. यात 77 GHz रिअर रडार देण्यात आला आहे. हा रडार मागील बाजूच्या हालचालींवर 200 मीटरपर्यंत लक्ष ठेवू शकतो, असा कंपनीचा दावा आहे.

या प्रणालीमुळे ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, लेन बदलताना अलर्ट, ओव्हरटेक अलर्ट आणि मागून वाहनाची टक्कर होण्याचा धोका असल्यास चेतावणी मिळू शकते. संभाव्य धोका जाणवल्यास बाइकचे हॅझर्ड दिवेही आपोआप सुरू होऊ शकतात.

7 इंचांची टचस्क्रीन आणि स्मार्ट फीचर्स

X-47 Venom मध्ये Interface X प्रणालीवर चालणारी 7 इंचांची टचस्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये Mappls नेव्हिगेशन, मागील कॅमेऱ्याच्या मदतीने पार्किंग असिस्ट आणि क्रूझ कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

याशिवाय, सॉफ्टवेअर अपडेट्स आणि VIOLETTE AI अलर्टची सुविधाही मिळते. बाइक हलवली गेल्यास, पडल्यास, टो केली गेल्यास किंवा अपघातासारखी घटना घडल्यास हे अलर्ट सूचना देऊ शकतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us