संकटाच्या काळात मदत… हा आहे इलॉन मस्क यांचा खरा मित्र, आज दोघेही मालामाल
Elon Musk Antonio Gracias : इलॉन मस्क यांच्या कंपनीच्या स्पेसएक्सच्या आयपीओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या आयपीओ सोबत मस्क यांचे बिझनेस पार्टनर आणि मित्र अॅटोनिओ ग्रासियास यांचीही चर्चा रंगली आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती इलॉन मस्क यांच्या कंपनीच्या स्पेसएक्सच्या आयपीओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा आयपीओ बाजारात आल्यानंतर इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती 1 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा अधिक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आयपीओ सोबत मस्क यांचे बिझनेस पार्टनर आणि मित्र अॅटोनिओ ग्रासियास यांचीही चर्चा रंगली आहे. मस्क यांनी त्यांना आपल्या कठीण काळातील खरा साथीदार म्हटले आहे. स्पेसएक्सच्या आयपीओमुळे अँटोनियो ग्रेसियास यांनाही मोठा आर्थिक फायदा होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
स्पेसएक्सच्या 1.77 ट्रिलियन डॉलर्सच्या संभाव्य आयपीओ मूल्यांकनानुसार, अँटोनियो ग्रेसियास यांच्या गुंतवणूक कंपनी ‘वेलर इक्विटी सेंट्स’ आणि त्यांच्या नियंत्रणाखालील संस्थांकडे असलेली हिस्सेदारी 5.4 लाख कोटी रुपये होण्याची शक्यता आहे. यामुळे व्हॅलर इक्विटी पार्टनर्स ही इलॉन मस्क यांच्यानंतर स्पेसएक्समधील दुसरी सर्वात मोठी शेअर्स असलेली संस्था ठरेल.
संकटाच्या काळातील मित्र
55 वर्षीय अँटोनियो ग्रेसियास आणि इलॉन मस्क यांची मैत्री आणि व्यावसायिक संबंध दोन दशकांहून अधिक जुने आहेत. 2000 च्या सुरुवातीच्या काळात पेपाल मध्ये काम करत असतानाच दोघांची ओळख झाली होती. ग्रेसियास यांनी अशा काळात मस्क यांच्या कंपन्यांवर विश्वास दाखवला होता, जेव्हा त्यांच्या भवितव्याबाबत मोठी अनिश्चितता होती. 2005 मध्ये व्हॅलर इक्विटी पार्टनर्स ही मस्क यांच्या टेस्ला या इलेक्ट्रिक वाहन कंपनीतील सुरुवातीच्या संस्थात्मक गुंतवणूकदारांपैकी एक ठरली होती.
मस्क यांना दिले होते कर्ज
2008 मध्ये टेस्ला आणि स्पेसएक्स या दोन्ही कंपन्या गंभीर आर्थिक संकटाचा आणि जागतिक मंदीचा सामना करत असताना, अँटोनियो ग्रेसियास यांनी इलॉन मस्क यांना 10 लाख डॉलर्स (सुमारे 8.3 कोटी रुपये) कर्जरूपाने दिले होते. अलीकडेच मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ग्रेसियास यांचे कौतुक करताना लिहिले होते की, “जेव्हा स्पेसएक्स पूर्णपणे अपयशी ठरेल असे वाटत होते, त्या कठीण काळात त्यांनी आमची साथ दिली.”
प्रत्यक्ष कामातही मदत
फक्त आर्थिक मदतच नव्हे, तर टेस्ला कंपनी गंभीर अडचणीत असताना अँटोनियो ग्रेसियास यांनी उत्पादन आणि पुरवठा साखळीतील समस्यांवर मात करण्यासाठी इलॉन मस्क यांना प्रत्यक्ष कामात साथ दिली होती. ग्रेसियास हे टेस्ला आणि स्पेसएक्स या दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळावर सदस्य म्हणूनही कार्यरत राहिले आहेत. याशिवाय 2022 मध्ये मस्क यांनी ट्विटरचे अधिग्रहण करताना त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.