गोल्ड लोन घेण्यापूर्वी सावधान! ‘या’ 5 गोष्टी बँका तुमच्यापासून लपवतात, वाचा सविस्तर माहिती

Gold Loan 5 Hidden Facts: आर्थिक चणचण भासली की पटकन पैसा उभा करण्यासाठी 'गोल्ड लोन' हा एक उत्तम पर्याय मानला जातो. दागिने तारण ठेवले की लगेच कर्ज मिळते, हे जरी खरे असले तरी यात अनेक अशा तांत्रिक गोष्टी आहेत ज्या बँका किंवा कर्ज देणाऱ्या संस्था (Lenders) तुम्हाला स्पष्टपणे सांगत नाहीत. कुठे चूक होऊ शकते, जाणून घेऊया.

गोल्ड लोन घेण्यापूर्वी सावधान! या 5 गोष्टी बँका तुमच्यापासून लपवतात, वाचा सविस्तर माहिती
Gold Loan
Image Credit source: TV9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Apr 09, 2026 | 4:42 AM

Gold Loan 5 Hidden Facts: सोनं तारण ठेवून कर्ज घेणाऱ्यांची संख्या भारतात वेगाने वाढत आहे. पण गोल्ड लोन म्हणजे केवळ सोने दिले आणि पैसे घेतले एवढेच मर्यादित नसते. कर्ज घेताना आपण फक्त व्याजदराकडे लक्ष देतो, मात्र यामागे अनेक छुपे शुल्क आणि कठोर अटी दडलेल्या असतात.

गोल्ड लोन घेण्यापूर्वी तुम्ही खालील 5 महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे:

१. प्रोसेसिंग फी आणि छुपे शुल्क

कर्ज घेताना आपण फक्त ‘व्याजदरा’वर लक्ष देतो. पण बँका यावर अनेक प्रकारचे शुल्क लावतात. यात प्रोसेसिंग फी, डॉक्युमेंटेशन चार्जेस आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘व्हॅल्युएशन फी’ (सोन्याची शुद्धता तपासण्याचे शुल्क) यांचा समावेश असतो. अनेकदा हे शुल्क कर्जाच्या रकमेतून कापून घेतले जाते, ज्यामुळे तुम्हाला अपेक्षित रकमेपेक्षा कमी पैसे हातात मिळतात.

2. सोन्याची शुद्धता आणि मूल्य

बँका तुमच्या सोन्याच्या बाजारभावाच्या 100 टक्के रक्कम कर्ज म्हणून देत नाहीत. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, सोन्याच्या मूल्याच्या जास्तीत जास्त 75 टक्के पर्यंतच कर्ज (LTV – Loan to Value) दिले जाते. शिवाय, दागिण्यांमधील खडे, मोती किंवा इतर धातूंचे वजन वजा करून केवळ निव्वळ सोन्याचे वजन गृहीत धरले जाते. तुमचं सोनं 18 कॅरेट आहे की 22 कॅरेट, यावरही कर्जाची रक्कम ठरते, जी बँका सुरुवातीला स्पष्ट करत नाहीत.

3. व्याजाची गणना करण्याची पद्धत

गोल्ड लोनमध्ये व्याजाचे विविध प्रकार असतात. काही बँका ‘सिंपल इंटरेस्ट’ लावतात, तर काही ‘कंपाउंड इंटरेस्ट’ (चक्रवाढ व्याज). जर तुम्ही मासिक व्याज भरण्यास उशीर केला, तर बँक दंडात्मक व्याज (Penal Interest) आकारते. हे दंडात्मक व्याज मूळ व्याजापेक्षा खूप जास्त असू शकते. त्यामुळे कर्ज घेताना व्याज मासिक भरायचे आहे की कर्जाच्या शेवटी, हे नीट तपासून घ्या.

4. लिलावाचा कठोर नियम

तुम्ही सलग 3 ते 6 महिने कर्जाचे हप्ते किंवा व्याज भरले नाही, तर बँकेला तुमचे सोने लिलावात काढण्याचा पूर्ण अधिकार असतो. बँका लिलावापूर्वी नोटीस पाठवतात, पण अनेकदा ग्राहक त्याकडे दुर्लक्ष करतात. एकदा लिलाव प्रक्रिया सुरू झाली की, तुमचे मौल्यवान दागिने परत मिळवणे अशक्य होते. तसेच, लिलावातून मिळणारी रक्कम कर्जापेक्षा जास्त असेल, तर उरलेले पैसे ग्राहकाला परत मिळणे त्यांचा हक्क असतो, जो अनेक बँका सांगत नाहीत.

5. प्री-पेमेंट पेनलटी

अनेकदा ग्राहकांकडे पैसे आल्यावर ते मुदतीपूर्वीच कर्ज फेडू इच्छितात. मात्र, काही बँका ‘फोरक्लोजर’ किंवा ‘प्री-पेमेंट’ चार्जेस लावतात. म्हणजेच, कर्ज लवकर फेडल्याबद्दल तुम्हाला दंड भरावा लागतो. कर्ज घेताना नेहमी अशा बँका निवडा ज्या मुदतीपूर्वी कर्ज फेडल्यास कोणताही अतिरिक्त चार्ज आकारत नाहीत.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us