
मध्य प्रदेशमधील इंदूरच्या राजा रघुवंशी प्रकरणानंतर युवकांमध्ये भय दिसू लागलय. आता मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यात एका चक्रावून टाकणारं प्रकरण समोर आलय. इथे एका युवकाने पोलीस अधीक्षक कार्यालयात अर्ज दिला. त्याने युवतीपासून स्वत:ला वाचवण्याची विनंती केली. त्याने सांगितलं की, ‘जर मला वाचवलं नाही, तर मी पुढचा राजा रघुवंशी असेन’ छतरपूर जिल्ह्यातील नौगांव क्षेत्रातील निवासी लकीने (विकास पटेरिया) सांगितलं की, “इन्स्टाग्रामवर तो एका युवतीच्या संपर्कात आला. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली” लकीच्या म्हणण्यानुसार, ‘मैत्रीचा धागा घट्ट झाल्यानंतर युवती त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकू लागली’ लकीचा दावा आहे की, ‘युवती आधीपासून विवाहित आहे. ती एक ब्लॅकमेलर आहे’ ‘युवकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैशांची मागणी करते’ असं लकीने सांगितलं.
या प्रकरणात युवतीने सुद्धा गंभीर आरोप केल्यानंतर नवीन टि्वस्ट आला. युवती एक युट्यूबर आहे. तिने एसपी कार्यालयात अर्ज देऊन लकीवर गंभीर आरोप केले. तिचा आरोप आहे की, “लकीने लग्नाच आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिला स्वीकारायला नकार दिला” तिने सुद्धा पोलिसांकडे न्यायाची मागणी केली आहे.
कोण खरं बोलतय? कोण खोटं?
या हाय-प्रोफाईल प्रकरणात पोलिसांनी तपास सुरु केला आहे. नौगांव पोलीस ठाणे प्रभारी सतीश सिंह यांनी या प्रकरणात माहिती देताना सांगितलं की, “युवतीवर याआधी सुद्धा ब्लॅकमेलिंगचे आरोप झाले आहेत. त्याचा तपास नौगांव पोलीस करत आहेत. ताज्या प्रकरणात पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. जेणेकरुन सत्य समोर यावं” या प्रकरणाने पुन्हा एकदा सोशल मीडियावर होणारी मैत्री आणि त्याचे धोके समोर आले आहेत. या प्रकरणात कोण खरं बोलतय? कोण खोटं? हे तपासानंतरच समोर येईल.