Prakash Ambedkar | सावरकरांवरील माझा लेख मोहन भागवतांनी वाचला नसावा, भारतरत्नच्या मागणीवरून प्रकाश आंबेडकरांची टीका!
“दुर्दैवाने मोहन भागवत यांनी सावरकरांवरील माझा लेख वाचलेला नाही. वाचला असता तर त्यांना सावरकरांचे दोन चेहरे लक्षात आले असते. एक क्रांतिकारी सावरकर आणि दुसरे ब्रिटिशांना मदत करणारे सावरकर.” सावरकर हे क्रांतिकारक होते, हे सर्वांनी मान्य केले पाहिजे, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार दिल्यास त्या पुरस्काराचा सन्मान वाढेल, असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडेच केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडीचे पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “दुर्दैवाने मोहन भागवत यांनी सावरकरांवरील माझा लेख वाचलेला नाही. वाचला असता तर त्यांना सावरकरांचे दोन चेहरे लक्षात आले असते. एक क्रांतिकारी सावरकर आणि दुसरे ब्रिटिशांना मदत करणारे सावरकर.” सावरकर हे क्रांतिकारक होते, हे सर्वांनी मान्य केले पाहिजे, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले. मात्र जेलमधून सुटल्यानंतर सावरकरांची जी संघटना होती, म्हणजेच हिंदू महासभा, तिने महाराष्ट्रातील पत्री सरकारच्या लढवय्यांना पकडून ब्रिटिशांच्या ताब्यात देण्याचे काम केले, असा गंभीर आरोप त्यांनी केला. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या भागांमध्ये आजही अशा घटनांची उदाहरणे मिळतात, ज्यामध्ये सावरकरांचे समर्थक असल्याचे सांगणाऱ्यांनी स्वातंत्र्यसैनिकांना पकडून दिल्याचे आंबेडकर यांनी नमूद केले. याच पार्श्वभूमीवर अशा व्यक्तींना भारतरत्न देणे मला मान्य नाही, असे ठाम मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.

