महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यावर 16 वार करून हत्या, वीजेचं बिल जास्त आल्याने संतप्त ग्राहकाचा हल्ला

| Updated on: Apr 25, 2024 | 11:12 AM

घरात वीजेचे बिल जास्त येते यामुळे संतापलेला एक ग्राहक जाब विचारण्यासाठी महावितरणाच्या कार्यालयात गेला आणि संतापाच्या भरात त्याने तेथील महिला कर्मचाऱ्यावर हल्ला करून तिची हत्या केली. बारामतीमधील मोरेगाव हा अतिशय खळबळजनक प्रकार घडल्याचे उघडकीस आले असून त्यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण आहे

महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यावर 16 वार करून हत्या, वीजेचं बिल जास्त आल्याने संतप्त ग्राहकाचा हल्ला
महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यावर ग्राहाकाचा हल्ला
Follow us on

घरात वीजेचे बिल जास्त येते यामुळे संतापलेला एक ग्राहक जाब विचारण्यासाठी महावितरणाच्या कार्यालयात गेला आणि संतापाच्या भरात त्याने तेथील महिला कर्मचाऱ्यावर हल्ला करून तिची हत्या केली. बारामतीमधील मोरेगाव हा अतिशय खळबळजनक प्रकार घडल्याचे उघडकीस आले असून त्यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण आहे. अभिजीत पोते असे आरोपीचे नाव असून त्याने महिला कर्मचाऱ्यावर एक, दोन नव्हे तर तब्बल 16 वेळा वार केले. यामुळे रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळलेली महिला कर्मचारी रिंकू गोविंद बनसोडे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. अभिजीत पोते या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधि तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीपासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरगाव येथे ही दुर्दैवी घटना घडली. मृत महिला रिंकू बनसोडे ही गेल्या दहा वर्षांपासून वीज वितरण कंपनीत काम करत होत्या. घटनेच्या वेळी ती कार्यालयात एकटीच होती. त्यावेळी आरोपी अभिजीत हा तेथे आला. त्याच्या घरी गेल्या काही दिवसांपासून वीजबिल जास्त येत होते. त्यासंदर्भात जाब विचारण्यासाठीच तो महावितरणाच्या कार्यालयात आला.

संतापच्या भरात कोयत्याने केले वार

सकाळी ११च्या सुमारा अभिजीत कार्यालयात आला आणि त्याने कर्मचारी रिंकू हिच्याकडे जास्त आलेल्या वीजबीलासंदर्भात विचारणा केली. तो तिच्याशी हुज्जत घालू लागला, हळूहळू त्यांचा वाद वाढला. त्याचदरम्यान अभिजीतने हातातील कोयत्याने रिंकू हिच्या हातापायांवर एकामागोमाग एक असे 16 वार केला. काही कळायच्या आतच ती रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली, बराच वेळ ती कार्यालयात तशीच पडून होती.

आजूबाजूच्या लोकांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी मदतीसाठी धाव घेत रिंकू हिला तातडीने पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. रिंकू बनसोडे हिच्या मृत्यूने महावितरणमधील कर्मचाऱ्यांवर शोककळा पसरली आहे. या घटनेचा कर्मचाऱ्यांसह सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. या घटने माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी अभिजीत पोटे याला अटक केली असून अधिक तपास करत आहेत.

वीज बिलात गडबड नाही

या घटनेनंतर वीज विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ज्या बिलासाठी आरोपी अभिजीतने महिला कर्मचाऱ्याची हत्या केली त्या बिलात काहीच चूक नसल्याचे विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आरोपींने एप्रिलमध्ये 63 युनिट वीज वापरली, परिणामी 570 रुपये वीज बिल आले. उष्णतेमुळे या महिन्यात विजेचा वापर 30 युनिटने वाढला असून, त्यामुळे वीज वापरानुसार 570 रुपये बिल आले असे अधिकाऱ्यांनी सांगितले.