thane Crime : रोज एकेक करून चोरले कोट्यवधींचे दागिने, ज्वेलर्सच्या दुकानात नोकरानेच केला हात साफ !

| Updated on: Mar 30, 2024 | 3:55 PM

ठाण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली. ठाण्यातील नामवंत ज्वेलर्समध्ये कोट्यवधी रुपयांची चोरी झाली होती. आता त्या चोरीप्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या ज्वेलर्सच्या दुकानाता चोरी करणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून त्याच दुकानात काम करणारा नोकर होता.

thane Crime : रोज एकेक करून चोरले कोट्यवधींचे दागिने, ज्वेलर्सच्या दुकानात नोकरानेच केला हात साफ !
ठाण्यात ज्वेलर्सच्या दुकानात कोट्यवधींची चोरी
Follow us on

ठाण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली. ठाण्यातील नामवंत ज्वेलर्समध्ये कोट्यवधी रुपयांची चोरी झाली होती. आता त्या चोरीप्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या ज्वेलर्सच्या दुकानाता चोरी करणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून त्याच दुकानात काम करणारा नोकर असल्याचं समोर आलं आहे. राहुल मेहता असं आरोपीचं नाव असून नौपाडा पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याने तब्बल १ कोटींपेक्षा अधिक किमतीच्या दागिन्यांवर डल्ला मारत ते दुसऱ्या दुकानात नेऊन विकले होते. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

दारू आणि मौजमजेसाठी रोज चोरायचा एकेक दागिना

ठाण्यातील राजवंत ज्वेलर्समध्ये कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल याला अटक करण्यात आली. राहुल हा याच दुकानात काम करत होता. मात्र त्याला दारू पिण्याचा शौक होता. दारूसाठी आणि मौजमजेसाठी पैसे हवेत म्हणून राहुल हा चलाखी करून रज दुकानातील एकेक दागिन्याची चोरी करायचा. आणि ते दागिने त्याच्या ओळखीच्या इतर ज्वेलर्समध्ये जाऊन विकायचा. त्या पैशांनी तो स्वत:चे शौक पूर्ण करायचा.

चोरले तब्बल दीड कोटींचे दागिने

राहुल याची ही चोरी अनेक दिवस सुरू होती. त्याने दुकानातून 38 सोन्याचे हार , 24 कानातले, 3 सोन्याच्या चेन , 5 बाजूबंद असा एकूण 70 दागिन्यांचा ऐवज चोरला. त्या दागिन्यांची आजच्या घडीला किंमत तब्बल 1 कोटी 5 लाख 55 हजार 766 रुपये इतकी आहे. हळूहळू करत असे कोट्यवधींचे दागिने चोरल्यानंतर राहुलने अचानक कामावर येणं बंद केलं. चोरीचे जागिने घेऊन तो पसारच झाला. तो कामावर न आल्याने राजवंत ज्वेलर्सच्या मालकाला संशय आला आणि त्याने नीट चौकशी , तपास केला असता दुकानातील कोट्यवधींचे दागिने गायब असल्याचे त्याच्या लक्षात आले. राहुलनेच ही चोरी केली असावी असा संशय आल्याने मालकाने ताबडतोब नौपाडा पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आणि खबऱ्यांनी दिलेली माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे त्यांनी दुकानात काम करणारा राहुल मेहता याला शोधून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपणच दागिने चोरल्याचे सांगत गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्याच्याकडून आत्तापर्यंत 26 हार , 21 कानातले, 3 चेन हस्तगत केल्या. एकूण 62 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जमा केला आहे. उर्वरित दागिन्यांचे त्याने काय केले, कोणत्या दुकानात जाऊन विकले याचा अधिक तपास नौपाडा पोलिस करत आहे. मात्र या घटनेमुळे ठाणे शहरात एकच खळबळ माजली आहे.