महाराष्ट्र हादरला! 56 वर्षीय शिक्षकाकडून विद्यार्थिनींसोबत नको ते कृत्य, गावकऱ्यांनी बेकार चोपला
वाशिममध्ये 56 वर्षीय शिक्षकाकडून विद्यार्थिनींसोबत धक्कादायक कृत्य केल्याची घटना घडली आहे. या प्रकारानंतर गावकऱ्यांनी शिक्षकाला चोपून पोलिसांच्या स्वाधीन केलं.

महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महिलानंतर आता चिमुकल्या मुलींसोबत अत्याचाराच्या घटना घडू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी नवी मुंबईत एका बस चालकाने चिमुकल्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता वाशिममध्ये शिक्षक पेशाला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. एका 56 वर्षीय शिक्षकानेच वर्गातील विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने पालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम तालुक्यातील सरकारी शाळेत ५६ वर्षीय शिक्षकानेच चिमुकल्या मुलींचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. वाशिम पोलीस स्टेशन अंतर्गत नराधम शिक्षकावर रात्री उशिरा पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करत शिक्षकाला अटक केली आहे. दिलीप नावाच्या नराधम शिक्षकाने तिसरी आणि चौथीतील अनेक विद्यार्थिनींना मांडीवर बसवून अश्लील चाळे केल्याचा आरोप आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याची माहिती पीडित मुलीने पालकांना दिली. घाबरलेल्या चिमुकलीनं काल एका शिक्षिकेकडं आपली व्यथा सांगितल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. ही घटना समोर येताच संतप्त ग्रामस्थांनी आरोपी शिक्षकाला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं. या प्रकरणी पोलिसांनी पीडित आणि इतर मुलींचे इन-कॅमेरा जबाब नोंदवले आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
भिवंडीत फळ विक्रेत्याची हत्या
भिवंडीत भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला. त्यानंतर एका फळ विक्रेत्याला एका महिलेने केलेल्या मारहाण केली. या मारहाणीत फळ विक्रेत्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कथितरीत्या महिलेने केलेल्या मारहाणीनंतर फळ विक्रेत्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मोहम्मद याकूब रुस्तुम अली सिद्दीकी (वय 47) असे मृत्यू झालेल्या फळ विक्रेत्याचे नाव असल्याची माहिती मिळतेय. या प्रकरणी पोलिसांनी लक्ष्मीबाई नाईक या महिलेला अटक केली आहे. मोहम्मद हा जुना ठाणा रोड येथे रस्त्याच्या कडेला हातगाडीवर फळे विकण्याचा व्यवसाय करायचा. आरोपी महिलेने विक्रेत्याकडून पैसे उधार घेतले होते. याच पैशांच्या देवाणघेवाणीवरून महिलेचा त्यांच्याशी वाद झाला. या वादातून महिलेने त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीतून मोहम्मद याचा मृत्यू झाला.