CA Result 2026 : सीए परिक्षेत महाराष्ट्राचा डंका! इगतपुरीच्या साक्षी चांडकने देशात मिळवला पहिला क्रमांक; मुंबईच्या नील शाहाचीही गरुड झेप

सीए इंटरमीडिएट परीक्षेचा सप्टेंबर २०२६ चा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेच्या निकालात इगतपुरीच्या साक्षी चांडकने मोठे यश मिळवले आहे. मुंबईच्या नील राजेश शाहसोबत तिने देशात संयुक्तपणे पहिला क्रमांक पटकावला आहे.

CA Result 2026 : सीए परिक्षेत महाराष्ट्राचा डंका! इगतपुरीच्या साक्षी चांडकने देशात मिळवला पहिला क्रमांक; मुंबईच्या नील शाहाचीही गरुड झेप
CA Result 2026
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 22, 2026 | 10:04 PM

मोठी बातमी समोर आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) सीए इंटरमीडिएट सप्टेंबर २०२६ परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या निकालात नाशिकच्या साक्षी चांडकने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. अवघ्या १८ व्या वर्षी साक्षीने ५०२ गुण मिळवत हे यश संपादन केले. विशेष म्हणजे, मुंबईच्या नील शाहनेही ५०२ गुण मिळवले असून दोघांनी संयुक्तपणे देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. साक्षीने यापूर्वी सीए फाऊंडेशन परीक्षेतही चमकदार कामगिरी केली होती. गेल्या वर्षी झालेल्या या परीक्षेत तिने देशात चौथा क्रमांक मिळवला होता. आता इंटरमीडिएट परीक्षेत देशात अव्वल स्थान मिळवत तिने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

नाशिकमधील विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी

सीए इंटरमीडिएट परीक्षेत नाशिकमधील इतर विद्यार्थ्यांनीही चांगले यश मिळवले आहे. भूषण ब्रह्मेने ३८३ गुणांसह शहरात दुसरा क्रमांक पटकावला. रोहित वारुडेने ३७६ गुणांसह तिसरा, स्वराज जातेगावकरने ३७० गुणांसह चौथा, तर अझीझुर शेखने ३६५ गुणांसह पाचवा क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे, शहरातील या पाचही विद्यार्थ्यांनी दोन्ही ग्रुप एकाच प्रयत्नात उत्तीर्ण केले आहेत. त्यामुळे त्यांच्या यशाचे विशेष कौतुक होत आहे. नाशिक शाखेतून दोन्ही ग्रुपची परीक्षा एकत्र देणारे ३०२ विद्यार्थी होते. त्यापैकी २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. केवळ ग्रुप १ ची परीक्षा देणाऱ्या ४६९ विद्यार्थ्यांपैकी ९९ विद्यार्थी पास झाले. तर केवळ ग्रुप २ ची परीक्षा देणाऱ्या २३६ विद्यार्थ्यांपैकी ४७ विद्यार्थ्यांनी यश मिळवले.

Loading...

 देशात एकूण किती विद्यार्थी उत्तीर्ण?

दरम्यान, देशपातळीवर चेन्नईच्या श्रुती व्ही. हिने ४९२ गुणांसह दुसरा, तर सुरतच्या प्रेम अग्रवालने ४९० गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला आहे. देशभरातून एकूण १४,८१८ विद्यार्थी सीए इंटरमीडिएट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुले कष्टाशिवाय पर्याय नाही असं म्हणतात ते खरंच आहे. नियमित अभ्यास आणि दररोजचे कष्ट हे या विद्यार्थ्यांना आता मोठ्या यशाच्या शिखरावर घेऊन गेले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us