Aamir Khan: आमिर खानला भर कार्यक्रमात अश्रू अनावर, म्हणाला ‘मनावर त्याचं खोलवर दु:ख..’

Aamir Khan: एकीकडे चित्रपटसृष्टीतलं यश आणि दुसरीकडे कुटुंबासाठी वेळ न दिल्याची खंत, या दोन्ही गोष्टींवर आमिरने केलेलं भाष्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याच्या या भावनिक कबुलीमुळे चाहत्यांना अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याची वेगळी बाजू पाहायला मिळाली आहे.

Aamir Khan: आमिर खानला भर कार्यक्रमात अश्रू अनावर, म्हणाला मनावर त्याचं खोलवर दु:ख..
Aamir Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 23, 2026 | 8:47 AM

Aamir Khan: बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान आपल्या अभिनयासाठी आणि चित्रपटांमधील वेगळ्या प्रयोगांसाठी ओळखला जातो. मात्र, नुकताच सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्याच्या आयुष्यातील एका भावनिक पैलूचा उलगडा झाला. तब्बल 30 वर्षे चित्रपटांच्या दुनियेत स्वतःला झोकून देताना कुटुंबासोबत घालवण्याचा महत्त्वाचा वेळ हातातून निसटल्याची खंत आमिरने व्यक्त केली. आपल्या आयुष्यातील या अनुभवाबद्दल बोलताना त्याला अश्रू अनावर झाले. त्याचा हा भावनिक क्षण उपस्थित प्रेक्षकांनाही हेलावून गेला.

‘30 वर्षे काम केलं, पण नाती मागे पडली’

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानला ‘स्क्रीन आयकॉन पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमादरम्यान त्याने आपल्या कारकिर्दीतील चढउतार आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला. कामाच्या बाबतीत आपण नेहमीच प्रचंड मेहनत घेतली, पण त्याचवेळी कुटुंबासाठी पुरेसा वेळ देता आला नाही, अशी कबुली त्याने दिली. आमिरने सांगितलं की, एखाद्या कामासाठी एक-दोन किंवा पाच वर्षं पूर्णपणे झोकून देणं समजू शकतं. मात्र, जेव्हा हीच गोष्ट तब्बल 30 वर्षं सुरू राहते, तेव्हा आयुष्यातील महत्त्वाच्या नात्यांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. मुलं मोठी होतात, आयुष्यात पुढे जातात आणि आपण त्यांच्या आयुष्यातील अनेक क्षण अनुभवण्यापासून दूर राहतो. या जाणिवेमुळे त्याच्या मनात दुःखाची भावना निर्माण झाली. याबद्दल बोलताना तो भावूक झाला आणि काही क्षणांसाठी त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत.

Loading...

आमिर खानने आपल्या आयुष्यातील या बदलाबद्दलही सांगितलं. वयाच्या 56व्या वर्षी ही जाणीव झाल्याबद्दल त्याने समाधान व्यक्त केलं. ही गोष्ट आणखी उशिरा, वयाच्या 86व्या वर्षी लक्षात आली असती, तर कदाचित आयुष्यात बदल घडवण्यासाठी फारसा वेळ उरला नसता, असं त्याला वाटतं. गेल्या चार वर्षांपासून त्याने कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांसोबत वेळ घालवण्याला अधिक महत्त्व दिलं आहे. काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात समतोल राखण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्याने स्पष्ट केलं.

या महोत्सवात आमिरने आपल्या आगामी चित्रपटांबाबतही माहिती दिली. ‘थ्री इडियट्स’ या लोकप्रिय चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चाहत्यांना उत्सुकता आहे. याबाबत बोलताना आमिरने दिग्दर्शक राजकुमार हिरानी या चित्रपटाच्या पटकथेवर काम करत असल्याचं सांगितलं. येत्या काही आठवड्यांत हिरानी त्याला पटकथेची अंतिम आवृत्ती ऐकवू शकतात, असंही त्याने नमूद केलं. त्यामुळे ‘थ्री इडियट्स 2’ पुन्हा चर्चेत आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us