माजोरड्या, बिनडोक, दीड शहाण्या लोकांना..; विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्यानंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

गणेशोत्सवात डीजे नको म्हणणाऱ्या विद्यानंद बापट यांच्यावर गुरुवारी एका व्यक्तीने हल्ला केला. या हल्ल्याचा निषेध करत मराठमोळ्या अभिनेत्रीने डीजे आणि ध्वनीप्रदूषणाविरोधातील त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देणारी पोस्ट लिहिली आहे.

माजोरड्या, बिनडोक, दीड शहाण्या लोकांना..; विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्यानंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
विद्यानंद बापट
Image Credit source: Tv9
| Updated on: Sep 04, 2026 | 12:50 PM

गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. डीजेच्या मोठ्या आवाजाला आणि ध्वनीप्रदूषणाला विरोध करणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. अभिनेत्री आणि विनोदी कलाकार आरती सोलंकीने सोशल मीडियावर पोस्ट करत बापट यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. आरती सोलंकीने तिच्या पोस्टमध्ये विद्यानंद बापट यांना उद्देशून उपरोधिक शैलीत लिहिलं, ‘फार स्पष्ट मराठी बोलू नका.’ डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात बापट बोलत असले तरी काही लोकांना त्यांच्या भूमिकेचा चुकीचा अर्थ लागत असल्याचं तिने म्हटलंय.

बापट हे गणपती बाप्पा किंवा गणेशोत्सवाच्या विरोधात बोलत नसून त्यांचा आक्षेप मोठ्या आवाजातील डीजे आणि त्यामुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाला आहे. मात्र, त्यांच्या भूमिकेचा विपर्यास करून काही जण त्यांना गणेशोत्सवविरोधी ठरवत असल्याचं आरतीने पोस्टमध्ये नमूद केलं.

आरती सोलंकीची पोस्ट-

‘विद्यानंद बापट यांना कळकळीची विनंती आहे. फार स्पष्ट मराठी बोलू नका. काय आहे की, डीजे आणि ध्वनी प्रदूषण या विरोधात तुम्ही बोलत आहात, पण समोरच्या असुशिक्षित, माजोरड्या, बिनडोक, दीड शहाण्या लोकांना वाटतंय, तुम्ही गणपती बाप्पा आणि गणेशोत्सवबद्दल बोलत आहात. आज तुमच्यावर ज्याने हल्ला केला, त्यावरून त्याचं शिक्षण आणि त्याच्यावर झालेले संस्कार हे दिसून येतात,’ असं तिने लिहिलं आहे.

समोरच्या लोकांना बापट नेमकं काय सांगत आहेत हे समजत नसल्यामुळे त्यांचा रोष गणपती बाप्पा आणि गणेशोत्सवावर असल्याचा गैरसमज निर्माण होत आहे. त्यामुळेच आरतीने उपरोधिकपणे ‘काय आहे की, डीजे आणि ध्वनी प्रदूषण या विरोधात तुम्ही बोलत आहात, पण…’ असं म्हणत बापट यांच्या भूमिकेचं समर्थन केलं. विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करताना आरती सोलंकीने हल्लेखोराच्या वर्तनावरही प्रश्न उपस्थित केला. ‘आज तुमच्यावर ज्याने हल्ला केला, त्यावरून त्याचं शिक्षण आणि त्याच्यावर झालेले संस्कार दिसून येतात,’ असं तिने म्हटलंय. एखाद्या सामाजिक मुद्द्यावर मतभेद असू शकतात, मात्र मतभेद व्यक्त करण्यासाठी हिंसेचा मार्ग स्वीकारणं योग्य नाही, असा संदेश आरतीने तिच्या पोस्टमधून दिला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात डीजे, मोठ्या आवाजातील संगीत आणि ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा दरवर्षी चर्चेत येतो. एका बाजूला उत्सव साजरा करण्याचा अधिकार आणि धार्मिक परंपरा जपण्याची भूमिका मांडली जाते, तर दुसरीकडे ध्वनीप्रदूषणामुळे नागरिकांना होणारा त्रास आणि नियमांचे पालन करण्याची मागणी केली जाते. याच पार्श्वभूमीवर विद्यानंद बापट यांनी डीजेच्या आवाजाविरोधात भूमिका घेतली होती. मात्र, त्यांच्या भूमिकेचा अर्थ गणेशोत्सवाच्या विरोधात असल्याचा काढला जाऊ नये, असा मुद्दा आरती सोलंकीने आपल्या पोस्टमधून अधोरेखित केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us