राघव चढ्ढांबाबतच्या कारवाईवर कुमार विश्वास यांनी खूप आधीच केलं होतं भाकीत, म्हणाले त्याने परिणीती चोप्रासोबत लग्न केलं अन्…

आपने खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवलं आहे. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून, याचदरम्यान प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांचा एका पॉडकास्टमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

राघव चढ्ढांबाबतच्या कारवाईवर कुमार विश्वास यांनी खूप आधीच केलं होतं भाकीत, म्हणाले त्याने परिणीती चोप्रासोबत लग्न केलं अन्...
Raghav Chadha
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 04, 2026 | 4:28 PM

आम आदमी पार्टीचे (APP) खासदार राघव चढ्ढा यांच्यावर आपकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे, त्यांना राज्यसभेच्या उपनेते पदावरून डच्चू देण्यात आला आहे. राघव चढ्ढा यांची उपनेतेपदावरून उचलबांगडी केल्यानंतर राघव चढ्ढा चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांच्या कामाच्या पद्धतीवरून देखील जोरदार चर्चा सुरू आहे. राघव चढ्ढा यांना उपनेतेपदावरून हटवण्यात आल्यानंतर काही जणांनी त्यांना सपोर्ट केला आहे, तर काही जणांकडून त्यांच्यावर टीका होत आहे. याचदरम्यान आता प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांचा दीड वर्षांपूर्वीचा एका पॉडकास्टमधील व्हिडीओ व्हायरल होत आहे. कुमार विश्वास हे आपचे संस्थापक सदस्य देखील आहेत. त्यांनी आपल्या या मुलाखतीमध्ये राघव चढ्ढा यांच्यावरील कारवाईबाबत भविष्यवाणी केली होती आणि आता ती खरी ठरली आहे.

काय म्हटले होते कुमार विश्वास?

आम आदमी पार्टीमध्ये पुढची कारवाई कोणावर होणार? पुढची कारवाई त्या बालकावर होणार आहे, ज्या बालकाचं स्वत:चं असं काहीही कर्तुत्व नाही. तो फक्त लोकप्रिय झाला आहे. त्याने अभिनेत्री परिणीती चोप्रा सोबत लग्न केलं आहे. त्याचे सोशल मीडियावर रील दिसत आहेत, असं व्हायला नको होतं. त्याचं जेव्हा लग्न झालं होतं, तेव्हाच मी म्हटलं होतं की, आता हा गेला, आता याला हे लोक सोडणार नाहीत, असं कुमार विश्वास यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे, पुढे त्यांनी याच व्हिडीओमध्ये केजरीवाल यांच्यावर देखील नाव न घेता हल्लाबोल केला आहे. तुम्ही एवढे घाबरलेले आहात की तुम्हाला कोणाचीही प्रसिद्धी सहन होत नाही असं त्यांनी म्हटलं.

दरम्यान राघव चढ्ढा यांना उपनेतेपदावरून हटवल्यानंतर त्यांनी ट्विट करत आपली नाराजी जाहीर केली होती. ज्यांनी माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे, त्या लोकांना मी सांगू इच्छितो की माझ्या गप्प बसण्याला माझी हार समजू नका, असं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे राघव चढ्ढा यांच्या आरोपांवर आपच्या नेत्यांकडून जोरदार पलटवार करण्यात आला आहे. आपचे खासदार संजय सिंह, दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी राघव चढ्ढा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राघव चढ्ढा हे भाजपला भीत असल्याचं आपच्या नेत्यांनी म्हटलं आहे.

 

Follow Us